रसायन आणि खते मंत्रालय
मनसुख मांडवीय यांनी गुजरातमधील अंकलेश्वर येथे उत्पादित कोवॅक्सिनच्या पहिल्या बॅचचे केले उद्घाटन
अंकलेश्वरच्या कंपनीत दर महिन्याला कोवॅक्सिन लसीच्या 1 कोटींहून अधिक मात्रांचे उत्पादन करण्याची क्षमता आहे आणि हे उत्पादन आज सुरु झाले आहे : मनसुख मांडवीय
Posted On:
29 AUG 2021 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2021
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी गुजरातमधील अंकलेश्वर येथील भारत बायोटेक कंपनीच्या चिरॉन बेहरिंग लसनिर्माण सुविधेमध्ये उत्पादित कोवॅक्सिनच्या पहिल्या व्यावसायिक साठ्याचे उद्घाटन केले.
अंकलेश्वर येथील कंपनीत निर्माण झालेला कोवॅक्सिनचा पहिला साठा देशाला अर्पण करताना केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले की भारताच्या कोविड-19 विरुद्धच्या लढ्याच्या प्रवासातील हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे.कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या उत्पादनांची क्षमता वाढविल्यामुळे, भारतातील लसीकरणाचा वेग वाढण्यासाठी अधिक चालना मिळेल. भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला या दोन कंपन्यांच्या लसींचे संशोधन आणि उत्पादन भारतात होत आहे ही आपणा सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे असे त्यांनी पुढे सांगितले. अंकलेश्वरच्या कंपनीत दर महिन्याला कोवॅक्सिन लसीच्या 1 कोटींहून अधिक मात्रांचे उत्पादन करण्याची क्षमता आहे आणि हे उत्पादन आज सुरु झाले आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली.
भारतातील कोवॅक्सिन उत्पादनाच्या परिस्थितीबाबत बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की भारत बायोटेकने कंपनीच्या हैदराबाद, मालूर, बेंगळूरू आणि पुणे येथील एककांमध्ये या आधीच अनेक स्तरांवर लसीचे उत्पादन सुरु केले आहे आणि आता अंकलेश्वरच्या चिरॉन बेहरिंग लसनिर्माण सुविधेमुळे कोवॅक्सिन लसीच्या उत्पादन क्षमतेत आणखी वाढ होणार आहे.
M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1750187)
Visitor Counter : 295