वस्त्रोद्योग मंत्रालय
पुढील 3 वर्षात हातमाग उत्पादन सध्याच्या 60,000 कोटी रुपयांवरून दुपटीने वाढवून 1,25,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याची गरज - गोयल
हातमाग निर्यात सध्याच्या 2,500 कोटी रुपयांवरून चौपट म्हणजेच 10,000 कोटी रुपयांवर नेण्याची वेळ आली आहे.- गोयल
राष्ट्रीय हातमाग दिन देशभरात साजरा केला जात आहे
Posted On:
07 AUG 2021 9:10PM by PIB Mumbai
केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे की हातमाग क्षेत्राची उत्पादन क्षमता 3 वर्षात सध्याच्या 60 हजार कोटी रुपयांवरून एक लाख 25 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढवण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. आज नवी दिल्लीत 7 व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त एका कार्यक्रमाला संबोधित करताना गोयल म्हणाले की, हातमाग वस्तूंची निर्यात सध्याच्या 2,500 कोटी रुपयांवरून पुढील तीन वर्षांत 10,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य निश्चित करायला हवे.
हातमाग क्षेत्राची सर्वांगीण प्रगती सुधारण्यासाठी आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपाय आणि साधनांची शिफारस करण्यासाठी सर्व विणकर, प्रशिक्षक, उपकरणे निर्माते, विपणन तज्ञ आणि इतर हितधारकांची एक समिती स्थापन केली जाईल असे त्याही घोषित केले.
आपल्या सांस्कृतिक वारशात हातमाग क्षेत्राचे अनन्यसाधारण स्थान असल्याचे त्यांनी नमूद केले. शतकानुशतके, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे विणकाम आणि रचना कौशल्य हस्तांतरित होत असल्यामुळे ते टिकून आहे. ते म्हणाले की, 07 ऑगस्ट 1905 रोजी कोलकाता टाउन हॉलच्या बैठकीत देशांतर्गत उत्पादने आणि उत्पादन प्रक्रिया पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशाने स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली होती. गोयल पुढे म्हणाले की, या ऐतिहासिक प्रसंगाचे स्मरण करण्यासाठी आणि आपली हातमाग परंपरा जोपासण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून घोषित केला होता. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना भारतीय हातमाग उत्पादने खरेदी करण्याचे आणि #MyHandloomMyPride या हॅशटॅग शी संलग्न होऊन त्यांची भव्यता दाखवण्याचे आवाहन केले होते. विणकर आणि हातमाग क्षेत्राला चालना देण्यासाठी लोकांनी कमीतकमी एक हातमाग वस्तू खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
संबंधित राज्य सरकारांच्या सहकार्याने कोवालम, तिरुअनंतपुरम, केरळ, मोहपारा गाव, जिल्हा गोलाघाट, आसाम आणि कनिहामा, बडगाम, श्रीनगर येथे तीन हातमाग कला ग्राम स्थापन केल्याबद्दल एनएचडीसीचे अभिनंदन करताना, गोयल म्हणाले की हे केवळ देशी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी अतिरिक्त आकर्षण ठरणार नाही तर या क्षेत्रातील सुप्रसिद्ध हातमाग आणि हस्तकला उत्पादनांना देखील प्रोत्साहन देईल ज्यामुळे विणकरांचे उत्पन्न वाढेल.
यावेळी गोयल आणि दर्शना जरदोश यांनी संयुक्तपणे कांचीपुरम, तामिळनाडू येथे डिझाईन रिसोर्स सेंटर आणि छत्तीसगडमधील रायगड येथील विणकर सेवा केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन केले. राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळातर्फे आभासी ग्राहक विक्रेता मेळावा देखील आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना वस्त्रोद्योग आणि रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी सांगितले की, हे एक असे क्षेत्र आहे जे थेट महिलांच्या सक्षमीकरणाशी संबंधित आहे. सर्व विणकर आणि संलग्न कामगारांपैकी 70 % महिला आहेत.
वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सचिव यू. पी. सिंह यांनी आपल्या भाषणात सांगितले की, हातमाग विणकर आणि हस्तकला कारागीरांसाठी डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनच्या (MEITY अंतर्गत) समन्वयाने एक ई-कॉमर्स पोर्टल विकसित केले जात आहे. यामुळे आपले विणकर आणि कारागीर थेट ग्राहकांना वस्तू विकू शकतील
राष्ट्रीय हातमाग दिन समारंभात सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विणकरांशी गोयल आणि दर्शना जरदोश यांनी संवाद साधला.
पंतप्रधानांच्या राष्ट्रीय स्तरावरील आवाहनाच्या अनुषंगाने - 7 वा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यासाठी राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळतर्फे "माय हँडलूम माय प्राइड एक्स्पो" चे आयोजन 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2021 दरम्यान दिल्ली हाट, आयएनए , नवी दिल्ली येथे केले जात आहे. भारतातील काही विशेष ठिकाणांहून आणलेली हातमाग उत्पादने या प्रदर्शनात पाहण्यासाठी आणि विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
***
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1743719)
Visitor Counter : 298