आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची आढावा बैठक संपन्न


देशात उत्तम दर्जाचे वैद्यकीय शिक्षण, पारदर्शी परीक्षांची पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवा सुविधा उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध: मनसुख मांडवीय

Posted On: 30 JUL 2021 4:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 जुलै 2021

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे एनएमसी अर्थात  राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

एनएमसीच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, मार्गदर्शक  योजनेनुसार 2023 च्या पहिल्या सहामाहीत नेक्स्ट अर्थात राष्ट्रीय निकास चाचणी घेतली जाण्याची सुनिश्चिती करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या परीक्षा प्रक्रियेची प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्यासाठी तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता दूर करण्यासाठी या परीक्षेची एक मॉक चाचणी परीक्षा तयार करण्याची आणि 2022 मध्ये ही चाचणी घेण्याची योजना सरकार आखत आहे. नेक्स्ट चाचणी (टप्पा 1 व 2)तून हाती येणारे निकाल खालील गोष्टींसाठी वापरण्याबद्दल देखील बैठकीत चर्चा करण्यात आली.

  1. अंतिम एमबीबीएसच्या परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी.
  2. भारतात आधुनिक वैद्यकक्षेत्राचा व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळविण्यासाठी.
  3. मंडळाच्या विशेष शाखांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागांचे गुणवत्तेवर आधारित वितरणासाठी.

नेक्स्ट परीक्षेला जागतिक दर्जाच्या मानाची परीक्षा बनविण्यासाठी अनुसरण्याच्या मार्गांची देखील या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली आणि त्यावर उहापोह झाला.  भारतात किंवा भारताबाहेर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या  प्रत्येक वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यासाठी एकच नेक्स्ट परीक्षा असेल. त्यामुळे परदेशात वैद्यकीय शिक्षण घेतलेले विद्यार्थी किंवा परस्पर मान्यता अभ्यासक्रमातील विद्यार्थी यांच्या समस्या सोडविता येतील. या बैठकीला संबोधित करताना केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले की देशात उत्तम दर्जाचे  वैद्यकीय शिक्षण, पारदर्शी परीक्षांची पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवा सुविधा उभारण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे आणि हे ध्येय गाठण्यासाठी सर्व संबंधितांना सोबत घेऊन अथक प्रयत्न करत आहे.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाविषयी (NMC):

संसदेच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा, 2019 या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची स्थापना करण्यात आली. आणि या आयोगाचे कार्य 25 सप्टेंबर2020 पासून सुरु झाले. उत्तम दर्जाच्या आणि परवडण्याजोग्या खर्चात वैद्यकीय शिक्षण घेण्यात सुलभता आणणे, भारताच्या सर्व भागांमध्ये पुरेशा प्रमाणात आणि उच्च दर्जाचे वैद्यकीय व्यावसायिक तयार होतील याची सुनिश्चिती करणे आणि त्यांच्या माध्यमातून न्याय्य आणि सार्वत्रिक आरोग्य सुविधा देशात उपलब्ध करून देणे हे या आयोगाच्या स्थापनेमागचे उद्देश आहेत.

स्वायत्त मंडळांच्या निर्णयांबाबत निर्णय घेण्याचे कायदेशीर अधिकार देखील NMCला दिलेले आहेत. तसेच या संदर्भातील धोरणे आखणे, वैद्यकीय व्यवसायात व्यावसायिक नितीमत्ता पाळली जात आहे याची सुनिश्चिती करण्यासाठी नियमावली निश्चित करणे आणि वैद्यकीय व्यावसायिकांकडून सेवा देताना नैतिक वागणुकीच्या पालनाला प्रोत्साहन देणे ही कामेदेखील NMC कडे दिलेली आहेत.

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1740731) Visitor Counter : 329