पंतप्रधान कार्यालय
कोविडविषयक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद
राज्यांनी केलेले सहकार्य, एकत्रित प्रयत्न आणि सहयोग यांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
या परिस्थितीत शक्य ती सर्व मदत केल्याबद्दल उपस्थित मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे मानले आभार
महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांमधील रुग्णसंख्येचा वाढता कल हा चिंतेचा विषय : पंतप्रधान
चाचण्या, रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध, उपचार आणि लस ही तपासलेली आणि सिध्द झालेली रणनीती आहे : पंतप्रधान
विविध राज्यांतील, विशेषतः ग्रामीण भागातील आरोग्य क्षेत्राच्या पायाभूत सुविधांमधील कमतरता भरून काढावी : पंतप्रधान
कोरोना अद्याप संपलेला नाही, अनलॉकनंतरचे वर्तन दर्शवणारी छायाचित्रे चिंताजनक : पंतप्रधान
Posted On:
16 JUL 2021 3:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जुलै 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक,ओदिशा, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत कोविड बाबतच्या परिस्थितीबाबत चर्चा केली. केंद्रीय गृह मंत्री आणि आरोग्य मंत्रीही यावेळी उपस्थित होते. कोविडशी लढा देण्यासाठी देण्यात येत असलेल्या सर्वतोपरी सहाय्यासाठी या मुख्यमंत्र्यांनी, पंतप्रधानांचे आभार मानले. आपापल्या राज्यात, कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचलण्यात आलेली पावले आणि लसीकरणाची प्रगतीची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. लसीकरण धोरणाबाबतही त्यांनी प्रतिसाद दिला.
वैद्यकीय पायाभूत सुविधाना चालना देण्यासाठीच्या उपाययोजनाची माहिती देत भविष्यात जर रुग्ण संख्येत वाढ झाली तर अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी सूचनाही केल्या. कोरोनातून बरे झालेल्यामध्ये उद्भवणाऱ्या काही समस्या आणि या संदर्भात सहाय्य करण्यासाठी उचलण्यात येणाऱ्या पावलांची यावेळी चर्चा झाली. संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
जुलै महिन्यात, एकूण रुग्ण संख्येपैकी 80 टक्यापेक्षा जास्त रुग्ण या सहा राज्यात आढळल्याचे तर यापैकी काही राज्यात केलेल्या एकूण चाचण्यांमध्ये रुग्ण कोरोनाबाधित होण्याचा पॉझीटीव्हिटी दरही जास्त असल्याचे केंद्रीय गृह मंत्र्यांनी नमूद केले.
केंद्रीय आरोग्य सचिवानी यावेळी देशातल्या कोविड रुग्णस्थिती बाबत चर्चा केली आणि कोविडला प्रतिबंध करणारे वर्तन दृढ करण्याची आणि ज्या जिल्ह्यात रुग्ण संख्या जास्त आहे अशा ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना बळकट करण्याची आवश्यकता व्यक्त केली. श्रेणीबद्ध आणि टप्याटप्याने जिल्ह्यामधले व्यवहार सुरु करण्याची सूचना त्यांनी केली.
कोरोनाविरोधातल्या लढ्यात परस्पर सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी राज्य सरकारांची प्रशंसा केली. आपण सर्व जण अशा ठिकाणी आहोत जिथे तिसऱ्या लाटेची शक्यता सातत्याने वर्तवण्यात येत आहे. रुग्ण संख्येचा आलेख घसरता असल्याने तज्ञ सकारात्मक संकेत देत असले तरीही काही राज्यातली वाढती रुग्ण संख्या चिंताजनक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. गेल्या आठवड्यातल्या रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण आणि 84 टक्के मृत्यू हे आजच्या बैठकीला उपस्थित असलेल्या राज्यांमधले आहेत याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. ज्या राज्यांमध्ये दुसरी लाट उत्पन्न झाली तिथे आधी परिस्थिती सामान्य होईल असा अंदाज तज्ञांनी सुरवातीला व्यक्त केला, मात्र केरळ आणि महाराष्ट्रात वाढती रुग्ण संख्या चिंतेचे मोठे कारण असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
दुसऱ्या लाटेपुर्वी, जानेवारी-फेब्रुवारी मध्ये असाच कल दिसून आल्याचे सांगून पंतप्रधानांनी सावधगिरीचा इशारा दिला. म्हणूनच ज्या राज्यांमध्ये रुग्ण संख्या वाढत आहे अशा राज्यांमध्ये आपल्याला तत्पर उपाययोजना हाती घेत तिसऱ्या लाटेची शक्यता रोखायला हवी असे ते म्हणाले .
दीर्घकाळ पर्यंत कोरोना बाधितांच्या संख्येत जर सतत वाढ होत राहिली तर कोरोना विषाणूमध्ये उत्परिवर्तन होण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे या विषाणूची नवनवीन रूपे अस्तित्वात येण्याचा धोका देखील वाढतो, हा तज्ञांनी व्यक्त केलेला दृष्टीकोन पंतप्रधानांनी अधोरेखित केला. ते म्हणाले की, म्हणूनच, आपण सूक्ष्म-प्रतिबंधित विभागांवर विशेष लक्ष केंद्रित करून, चाचण्या, रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध, उपचार आणि लसीकरण या धोरणाची अंमलबजावणी अखंडितपणे सुरु ठेवणे गरजेचे आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये अधिक प्रमाणात रुग्ण सापडत आहेत त्यांच्याकडे विशेषत्वाने लक्ष देणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण राज्यामध्येच चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर मोदी यांनी भर दिला. अधिक संसर्गग्रस्त भागासाठी लस धोरणात्मक साधनाचे काम करू शकेल असे प्रतिपादन करत, मोदी यांनी लसीकरणाच्या परिणामकारक वापराचा आग्रह व्यक्त केला. सध्याच्या काळाचा वापर RT-PCR चाचण्यांची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राज्यांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
अतिदक्षता कक्षातील खाटांची सुविधा आणि चाचण्यांची क्षमता यांसारख्या वैद्यकीय सुविधा वाढविण्यासाठी राज्यांना दिल्या जात असलेल्या आर्थिक मदतीबाबत पंतप्रधानांनी चर्चा केली. नुकत्याच मंजूर करण्यात आलेल्या 23,000 कोटी रुपयांच्या आपत्कालीन कोविड प्रतिसाद पॅकेजचा उल्लेख करून या निधीचा वापर वैद्यकीय सोयीसुविधा बळकट करण्यासाठी करावा असे निर्देश त्यांनी राज्य सरकारांना दिले.
विविध राज्यांतील, विशेषतः ग्रामीण भागातील आरोग्य क्षेत्राच्या पायाभूत सुविधांमधील कमतरता भरून काढण्यासाठी पंतप्रधानांनी राज्यांना प्रोत्साहित केले. सामान्य नागरिकांना सुलभतेने आणि पारदर्शक पद्धतीने स्त्रोत आणि माहिती मिळविता येण्यासाठी आणि रुग्णांना कोणत्याही गडबड गोंधळापासून वाचविण्यासाठी राज्यांनी त्यांच्या माहिती तंत्रज्ञान यंत्रणा, नियंत्रण कक्ष आणि कॉल सेन्टर्स अधिक सशक्त करण्याचा देखील त्यांनी आग्रह धरला. या बैठकीत हजर असलेल्या राज्यांना वितरीत झालेल्या 332 PSA ऑक्सिजन संयंत्रापैकी 53 संयंत्रे कार्यान्वित झाली आहेत असे त्यांनी सांगितले. या संयंत्रांचे काम वेगाने पूर्ण करावे असे पंतप्रधानांनी उपस्थित मुख्यमंत्र्यांना सांगितले. लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्यापासून वाचविण्याच्या गरजेचा विशेष उल्लेख करत यासंदर्भात शक्य असलेल्या सर्व उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत असे ते म्हणाले.
युरोप, अमेरिका तसेच बांगलादेश, इंडोनेशिया, थायलंड आणि जगातील इतर अनेक देशांमध्ये सध्या आढळत असलेया वाढत्या रुग्णसंख्येकडे निर्देश करत पंतप्रधानांनी काळजी व्यक्त केली. हा आपल्यासाठी आणि संपूर्ण जगासाठीच धोक्याचा इशारा आहे असे ते म्हणाले.
कोरोना अजून पूर्णपणे संपलेला नाही याचा पुनरुच्चार करत, पंतप्रधानांनी टाळेबंदी उठविल्यानंतर बघायला मिळत असलेल्या चित्रांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या राज्यांपैकी अनेक राज्यांमध्ये दाट लोकसंख्या असलेली महानगरे आहेत याचा उल्लेख करत या काळात सर्वांनीच नियमावलीचे कडक पालन करण्याच्या आणि गर्दी टाळण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. जनतेमध्ये याबाबत जाणीव निर्माण करण्यासाठी, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांनी सक्रियतेने कार्य करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.
Jaydevi PS/N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1736166)
Visitor Counter : 296
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam