पंतप्रधान कार्यालय

वाराणसीमध्ये विविध विकास प्रकल्पांच्या उद्‌घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 15 JUL 2021 5:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जुलै 2021

भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। हर-हर महादेव!

खूप दिवसांनी तुम्हा सगळ्या लोकांना  प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली आहे.  काशीच्या सर्व लोकांना नमस्कार. समस्त जनतेचे दुःख दूर करणारे भोलेनाथ, माता अन्नपूर्णाच्या चरणी देखील मी नतमस्तक होत आहे.

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल, उत्तर प्रदेशचे  यशस्वी, ऊर्जावान आणि कर्मयोगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ , उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री, आमदार आणि बनारसच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ,

आज काशीच्या विकासाशी संबंधित पंधराशे कोटीहून अधिक रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि  लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली आहे. बनारसच्या विकासासाठी जे काही होत आहे , ते सगळे महादेवाचे आशीर्वाद आणि बनारसच्या जनतेच्या प्रयत्नांमुळे सुरु आहे. कठीण काळातही  काशीने दाखवून दिले आहे की ती थांबत नाही, ती थकत नाही.

बंधू आणि भगिनींनो,

गेले काही महिने आपणा सर्वांसाठी, संपूर्ण मानवजातीसाठी खूप कठीण होते. कोरोना विषाणूच्या बदलत्या आणि धोकादायक रूपाने पुन्हा एकदा  संपूर्ण ताकदीनिशी हल्ला केला. मात्र काशीसह उत्तर प्रदेशाने पूर्ण सामर्थ्याने एवढ्या मोठ्या संकटाचा सामना केला. देशातील सर्वात मोठे राज्य, ज्याची लोकसंख्या जगातील डझनभर मोठमोठ्या देशांपेक्षाही जास्त आहे, तिथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान उत्तर प्रदेशने ज्या पद्धतीने कोरोना संसर्ग रोखला, ते अभूतपूर्व आहे. कारण उत्तर प्रदेशच्या जनतेने तो काळ देखील पाहिला आहे, जेव्हा मेंदूज्वर , इन्सेफ्लाइटिस सारख्या आजारांचा सामना करताना इथे किती अडचणी आल्या होत्या.

पूर्वीच्या काळी आरोग्य सुविधांची कमतरता आणि इच्छाशक्तीचा अभाव यामुळे छोटी छोटी संकटे देखील उत्तर प्रदेशात विक्राळ रूप धारण करायची आणि ही तर  100 वर्षात संपूर्ण जगावर ओढवलेली सर्वात मोठी आपत्ती आहे, सर्वात मोठी महामारी आहे. म्हणूनच कोरोनाविरुद्ध लढाईत उत्तर प्रदेशचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. मी काशीच्या माझ्या सहकाऱ्यांचा, इथल्या  शासन-प्रशासनापासून  कोरोना योद्धा यांच्या  संपूर्ण टीमचा विशेष आभारी आहे. तुम्ही दिवस -रात्र एक करून ज्याप्रकारे काशीमध्ये व्यवस्था उभ्या केल्या , ती खूप मोठी सेवा आहे.

मला आठवतंय, की अर्ध्या रात्रीही जेव्हा मी इथल्या व्यवस्थेशी संबंधित लोकांना फोन करायचो, तेव्हा ते कर्तव्य बजावत असायचे. कठीण काळ होता, मात्र तुम्ही प्रयत्नांमध्ये कसूर केली नाही. तुम्हा सर्वांच्या अशा कार्याचा परिणाम आहे ज्यामुळे आज उत्तर प्रदेशात परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येत आहे.

आज उत्तर प्रदेश, कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या करणारे राज्य आहे. आज उत्तर प्रदेश संपूर्ण देशात सर्वात जास्त लसीकरण करणारे राज्य आहे.  मोफत लसीकरण अभियानाच्या माध्यमातून सर्वांना  गरीब, मध्यम वर्ग,शेतकरी-युवक, सर्वाना सरकार द्वारा मोफत लस दिली जात आहे.

बंधू आणि भगिनींनो,

स्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित ज्या पायाभूत सुविधा उत्तर प्रदेशात तयार होत आहेत, त्या भविष्यात देखील कोरोनाविरुद्ध लढाईत खूप मदत करणार आहेत. आज उत्तर प्रदेशात गावातील आरोग्य केंद्र असेल, वैद्यकीय महाविद्यालय असेल, एम्स असेल, वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व सुधारणा होत आहेत. 4 वर्षांपूर्वीपर्यंत जिथे उत्तर प्रदेशात डझनभर वैद्यकीय महाविद्यालये होती, त्यांची संख्या आता सुमारे  4 पटीने वाढली आहे. अनेक वैद्यकीय महाविद्यालयांचे बांधकाम विविध टप्प्यात सुरु आहे. आता उत्तर प्रदेशात सुमारे साडे पाचशे ऑक्सीजन संयंत्र उभारण्याचे काम देखील वेगाने सुरु आहे. आज बनारस मध्येच  14 ऑक्सीजन संयंत्राचे  लोकार्पण देखील करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात मुलांसाठी विशेष ऑक्सीजन आणि   ICU  सारख्या सुविधा निर्माण करण्याचा विडा उत्तर प्रदेश सरकारने उचलला आहे तो प्रशंसनीय आहे. कोरोनाशी संबंधित नवीन आरोग्य सुविधांच्या निर्मितीसाठी अलिकडेच  केंद्र सरकारने 23 हजार कोटी रुपयांचे  विशेष पैकेज घोषित केले आहे. याचाही खूप मोठा  लाभ उत्तर प्रदेशला होणार आहे.

मित्रांनो,

काशी नगरी आज पूर्वांचल क्षेत्राचे खूप मोठे वैद्यकीय केंद्र बनत आहे. ज्या आजारांच्या उपचारांसाठी कधी दिल्ली आणि मुंबईला जावे लागायचे, त्यावरील उपचार आज काशीमध्येही उपलब्ध आहेत. इथे वैद्यकीय पायाभूत विकासात आज आणखी काही सुविधा जोडल्या जात आहेत. आज महिला आणि मुलांच्या आरोग्याशी संबंधित नवीन रुग्णालय काशीला मिळत आहे. यापैकी 100  खाटांची क्षमता  बीएचयू (BHU) मध्ये तर 50 खाटा जिल्हा रुग्णालयात जोडल्या जात आहेत. या दोन्ही प्रकल्पांची पायाभरणी करण्याचे सौभाग्य मला लाभले होते, आज त्यांचे  लोकार्पण देखील होत आहे. बनारस हिंदू विद्यापीठ BHU येथे ही जी नवी सुविधा तयार होत आहे, थोड्या  वेळाने मी ती पहायला देखील जाणार आहे. मित्रानो, आज BHU मध्ये प्रादेशिक नेत्र संस्थेचे देखील लोकार्पण करण्यात आले. या संस्थेत लोकांच्या डोळ्यांशी संबंधित आजारांवर सर्व  आधुनिक उपचार मिळू शकतील.

बंधू आणि भगिनींनो,

मागील सात वर्षांमध्ये काशी, आपली  मौलिक ओळख कायम ठेवत विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे. सर्वच क्षेत्रात , मग ते राष्ट्रीय महामार्गाचे काम  असेल, उड्डाणपूल असतील, किंवा  रेलवे ओवरब्रिज असेल, किंवा तारांचे जंजाळ दूर करण्यासाठी जुन्या काशीत अंडर ग्राउंड वायरिंगची व्यवस्था असेल,  पेयजल आणि  सांडपाण्याच्या समस्येवर उपाय असेल, पर्यटनाला चालना देण्यासाठी  विकास कामे असतील, सर्वच बाबतीत अभूतपूर्व कार्य झाले आहे. आताही या क्षेत्रात सुमारे  8 हज़ार कोटी रुपयांच्या प्रकल्पांवर काम सुरु आहे. नवे प्रकल्प, नव्या संस्था काशीच्या  विकास गाथेला अधिक जीवंत बनवत आहेत.

मित्रांनो,

काशीची, गंगा नदीची स्वच्छता आणि  सुंदरता, आपल्या सर्वांची आकांक्षा देखील आहे आणि प्राथमिकता देखील आहे. यासाठी रस्ते, सांडपाणी प्रक्रिया, उद्याने अन घाटांचे सुशोभीकरण अशा प्रत्येक आघाडीवर काम सुरु आहे.  पंचकोशी मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाल्यामुळे भाविकांना देखील सोयीचे होईल  आणि या मार्गावरच्या डझनभर गावांचे जीवन देखील सुलभ होईल. वाराणसी-गाज़ीपुर मार्गावर जो पूल आहे, तो खुला झाल्यानंतर  वाराणसी शिवाय प्रयागराज, गाजीपुर, बलिया, गोरखपुर आणि  बिहारला येणाऱ्या-जाणाऱ्यांची देखील मोठी सोय होईल.  गौदौलिया येथे बहुस्तरीय दुचाकी  पार्किंग बनल्यामुळे किती  ‘किचकिच’ कमी होईल, हे बनारसच्या लोकांना चांगलेच माहित आहे. तसेच लहरतारा ते चौका घाट उड्डाणपुलाच्या खाली देखील  पार्किंग आणि अन्य जनसुविधांचे काम लवकरच पूर्ण होईल. बनारसच्या , उत्तर प्रदेशच्या कुठल्याही बहिणीला, कुठल्याही कुटुंबाला  शुद्ध पाण्यासाठी पायपीट करावी लागू नये यासाठी ’हर घर जल अभियान’ वर वेगाने काम सुरु आहे .

मित्रांनो,

उत्तम  सुविधा, उत्तम  कनेक्टिविटी, सुंदर गल्ल्या आणि  घाट, ही प्राचीन  काशीची नवी अभिव्यक्ति आहे. शहरातील  700 पेक्षा अधिक ठिकाणी प्रगत टेहळणी कॅमेरा बसवण्याचे काम देखील वेगाने सुरु आहे. शहरात जागोजागी उभारण्यात येत असलेल्या मोठमोठ्या LED स्क्रीन्स आणि घाटांवर लावण्यात येत असलेले तंत्रज्ञानाने युक्त माहिती फलक , हे काशीला भेट देणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील. काशीचा इतिहास, वास्तु, शिल्प, कला, अशी प्रत्येक माहिती आकर्षक ढंगात सादर करणाऱ्या या सुविधा भाविकांसाठी उपयोगी ठरतील. मोठ्या स्क्रीन्सच्या माध्यमातून गंगा नदीच्या घाटावर आणि काशी विश्वनाथ मंदिरात होणाऱ्या आरतीचे  प्रसारण संपूर्ण शहरात करणे शक्य होईल.

आजपासून जी रो-रो सेवा आणि क्रुझ बोट सुरु झाली आहे, त्यामुळे वाराणसीतल्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. एवढेच नाही, तर गंगा माईच्या सेवेत असलेल्या आमच्या नावाडी मित्रांना देखील उत्तम सुविधा दिल्या जात आहेत. डीझेलवर चालणाऱ्या नावांना सीएनजी मध्ये रुपांतारीत केले जात आहे. यामुळे त्यांचा खर्च वाचणार आहे, पर्यावरणालाही फायदा होणार आहे आणि पर्यटक देखील आकर्षित होणार आहेत. यानंतर मी थोड्याच वेळात, ‘रुद्राक्ष’ – हे आंतरराष्ट्रीय कन्वेन्शन सेंटरचे देखील लोकार्पण करणार आहे. वाराणसीचे जागतिक दर्जाचे साहित्यिक, संगीतकार आणि इतर कलांच्या दिग्गज कलाकारांचा जगभरात बोलबाला आहे. मात्र, प्रत्यक्षात काशी इथे या कलांच्या प्रदर्शनासाठी जागतिक दर्जाची काहीही सुविधा नव्हती. आज मला अत्यंत आनंद आहे की काशीच्या कलाकारांना- गुणवंताना आपले कला कौशल्य सादर करण्यासाठी एक आधुनिक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

मित्रांनो,

वाराणसीच्या प्राचीन वैभवाची समृद्धी, ज्ञानगंगेशी देखील जोडलेली आहे. अशा वेळी, काशीचा, आधुनिक ज्ञान आणि विज्ञानाचे केंद्र म्हणूनही सातत्याने विकास होणे गरजेचे आहे. योगी जी यांचे सरकार आल्यानंतर तर, या दिशेने जे प्रयत्न होत होते, त्यांना अधिकच गती मिळाली आहे. आजदेखील मॉडेल स्कूल, आयटीआय, पॉलिटेक्निक अशा अनेक संस्था आणि नव्या सुविधा काशी शहराला मिळाल्या आहेत. आज सीपेटच्या सेंटर फॉर स्कीलिंग अँड टेक्निकल सपोर्ट या केंद्राची कोनशिला ठेवण्यात आली. हे केंद्र केवळ काशीच नाही तर संपूर्ण उत्तरपूर्व भागातल्या औद्योगिक विकासाला चालना देईल. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी युवकांना कौशल्य प्रशिक्षित करण्यात अशा संस्थांची मोठी मदत होऊ शकेल. मी बनारसच्या युवकांचे, विद्यार्थ्यांचे  सीपेट केंद्राच्या स्थापनेबद्दल विशेष अभिनंदन करतो.

बंधू आणि भगिनींनो ,

आज जगातील मोठे मोठे गुंतवणूकदार, आत्मनिर्भर भारताच्या महायज्ञात सहभागी झाले आहेत. यातही, उत्तरप्रदेश, देशातील आघाडीचे गुंतवणूक केंद्र म्हणून, पुढे आहे. काही वर्षांपूर्वी ज्या उत्तरप्रदेशात व्यापार-उद्योग करणे कठीण मानले जात होते, तेच उत्तर प्रदेश आज ‘मेक-इन-इंडिया’ साठी लोकांच्या पसंतीचे केंद्र बनले आहे.

याचे सर्वात मोठे कारण आहे, उत्तरप्रदेशात योगीजींच्या सरकारने पायाभूत सुविधांवर दिलेला भर. रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतुकीत इथे झालेल्या अभूतपूर्व सुधारणेमुळे इथले जीवनमान तर सुकर झालेच आहे, त्याशिवाय व्यापार-उद्योगातही अधिक सुविधा मिळत आहेत. उत्तरप्रदेशातील कानाकोपऱ्याला रुंद आणि आधुनिक रस्ते-द्रुतगती मार्गाने जोडण्याचे काम इथे जलद गतीने होत आहे. मग संरक्षण मार्गिका असो, पूर्वांचलचा द्रुतगती मार्ग असो किंवा बुंदेलखंड द्रुतगती मार्ग, गोरखपूर लिंक वे असो किंवा गंगा द्रुतगती मार्ग, या दशकात, हे सगळे उत्तरप्रदेशाच्या विकासाला नव्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे. या मार्गांवरून फक्त गाड्याच चालणार नाहीत, तर त्यांच्या आजूबाजूला आत्मनिर्भर भारताला ताकद देणारे नवे औद्योगिक समूह देखील तयार होणार आहेत.

बंधू आणि भगिनींनो ,

आत्मनिर्भर भारतात आमच्या शेतीशी संबंधित पायाभूत सुविधा आणि कृषी आधारित उद्योगांची भूमिकाही महत्वाची असणार आहे. अलीकडेच केंद्र सरकारने कृषी पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. देशात आधुनिक कृषी पायाभूत सुविधांसाठी जो एक लाख कोटी रुपयांचा विशेष निधी तयार करण्यात आला आहे, त्याचा लाभ आता आपल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांनाही मिळणार आहे. सरकारी खरेदीशी संबंधित व्यवस्थेला अधिक उत्तम बनवणे आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक पर्याय देण्याला आमचे प्राधान्य आहे. यावर्षी झालेली धान आणि गव्हाची विक्रमी सरकारी खरेदी, त्याचाच परिणाम आहे.

मित्रांनो ,

कृषी क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधांबाबतही उत्तरप्रदेशात सातत्याने काम सुरु आहे. वाराणसी असो की पूर्वांचल,  इथे नाशवंत वस्तूंसाठीचे कार्गो सेंटर, आंतरराष्ट्रीय धान केंद्र, अशा अनेक आधुनिक व्यवस्था आज शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत आहेत. अशाच अनेक प्रयत्नांमुळे आपला लंगडा आणि दशहरी आंबा आज युरोपापासून ते आखाती देशांमध्ये आपला गोडवा पोचवतो आहे. आज ज्या मँगो अँड व्हेजिटेबल इंटिग्रेटेड पॅक हाऊसचे आज भूमिपूजन केले गेले, ती संस्था, या क्षेत्राचा कृषी निर्यात केंद्र म्हणून विकास करण्यात उपयोगी सिध्द होईल. याचा विशेष लाभ, छोटे शेतकरी, जे फळे-भाजीपाल्याची लागवड करतात, त्यांना होणार आहे.

मित्रांनो,

काशी आणि संपूर्ण उत्तरप्रदेशाच्या विकासासाठी सुरु असलेल्या इतक्या सगळ्या कामांची चर्चा मी इतक्या वेळापासून करतो आहे. मात्र ही यादी इतकी मोठी आहे की लवकर संपणार नाही. जेव्हा वेळेची मर्यादा असते, तेव्हा मला अनेकदा विचार करावा लागतो की उत्तरप्रदेशातील कोणत्या विकासकार्यांची चर्चा  करू आणि कोणत्या कामांची चर्चा सोडून देऊ. ही सगळी योगी जींचे नेतृत्व आणि उत्तरप्रदेश सरकारच्या कार्यनिष्ठेची कमाल आहे.

बंधू आणि भगिनींनो ,

असे नाही, की 2017 पूर्वी उत्तरप्रदेशासाठी योजना होत नसत, किंवा पैसा पाठवला जात नसे. जेव्हा 2014 साली आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली, त्यावेळी देखील उत्तरप्रदेशासाठी एवढ्याच गतीने पर्यटन होत होते. मात्र, त्यावेळी, लखनौ मध्ये या प्रयत्नांत अडचणी निर्माण केल्या जात होत्या. आज योगीजी स्वतः जी कठोर परिश्रम करत आहेत ती  काशीचे लोक तर बघतच आहेत की योगी जी सातत्याने इथे येत असतात, एकेका विकास योजनेचा स्वतः आढावा घेत असतात. स्वतःची ऊर्जा खर्च करत, कामांना गती देतात. अशीच मेहनत ते या पूर्ण प्रदेशासाठी करतात. प्रत्येक जिल्ह्यात जातात, प्रत्येक कामात सहभाग घेतात, हेच कारण आहे की उत्तरप्रदेशात परिवर्तनाच्या प्रयत्नांना गती मिळून आज एका आधुनिक उत्तरप्रदेशाची निर्मिती होत आहे.

आज उत्तरप्रदेशात कायद्याचे राज्य आहे. गुंडगिरी आणि दहशतवाद जे बेलगाम पसरत होते, त्यांच्यावर आज कायद्याने अंकुश आणला आहे. आपल्या मुलींच्या सुरक्षिततेविषयी पालकांना सतत जी भीती आणि शंका असे, ती परिस्थिती देखील आता बदलली आहे. आज मुली-स्त्रियांकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या गुन्हेगारांनाही कळले आहे की ते कायद्याच्या कचाट्यातून वाचू शकत नाहीत. आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे, उत्तरप्रदेशात आज भ्रष्टाचार आणि भाऊबंदकी नाही तर विकासाचे राजकारण सुरु आहे. म्हणूनच, आज उत्तरप्रदेशात जनतेसाठीच्या योजनांचा लाभ थेट लोकांपर्यंत पोचतो आहे. म्हणूनच, आज उत्तरप्रदेशात नवनव्या उद्योगांमध्ये गुंतवणूक होत आहे, रोजगाराच्या संधी वाढत आहेत.

मित्रांनो ,

विकास आणि प्रगतीच्या या यात्रेत, उत्तरप्रदेशातील प्रत्येक नागरिकाचे योगदान आहे, यात प्रत्येकाचा सहभाग आहे. आपले हे योगदान, आपले हे आशीर्वाद, उत्तरप्रदेशाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाणार आहेत. आणखी एक मोठी जबाबदारी आपल्या खांद्यांवर आहे, ती म्हणजे आपल्याला कोरोनाला पुन्हा डोके वर काढू द्यायचे नाही.

कारण कोरोना संसर्गाचा दर कमी झाला आहे, मात्र निष्काळजीपणा वाढला, तर पुन्हा एकदा हा संसर्ग लाटेच्या स्वरुपात वाढू शकतो. जगातील अनेक देशांचे अनुभव आज आपल्यासमोर आहेत. आणि म्हणूनच आपल्याला सर्व नियम-कायद्यांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. सर्वांना मोफत लस या अभियानात आपण सर्वांनी सहभागी व्हायचे आहे. लस नक्कीच घ्यायची आहे. बाबा विश्वनाथ आणि गंगामातेचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर कायम राहो, याच शुभेच्छांसह, आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद !

हर-हर महादेव !!

 

Jaydevi PS/S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1735915) Visitor Counter : 265