इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

डिजिटल इंडियाच्या सहाव्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी या उपक्रमातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार

Posted On: 30 JUN 2021 2:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जून 2021

 

भारताला डिजिटली सक्षम  समाज आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेत परिवर्तित करण्याच्या दृष्टीकोनातून सुरु करण्यात आलेल्या डिजिटल इंडिया या पथदर्शी उपक्रमाच्या प्रवासाला जुलै 1, 2021.रोजी 6 वर्षे पूर्ण होत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा महत्वाकांक्षी कार्यक्रम जुलै 1, 2015 रोजी सुरू केला होता आणि जो नवीन भारतामधील - सेवा सक्षम करणे, सरकार आणि नागरिकांमधील अंतर कमी करणे , नागरिकांच्या गुंतवणूकीला चालना देणे आणि लोकांना सक्षम बनविणे  ही आजपर्यंतची  सर्वात मोठी यशोगाथा ठरली आहे  .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवडत्या उपक्रमांपैकी एक असलेल्या या उपक्रमाच्या  सहाव्या वर्षपूर्तीनिमित्त केंद्र सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय,पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा दिवस साजरा करणार असून याप्रसंगी पंतप्रधान डिजिटल इंडिया अंतर्गत येणाऱ्या  विविध योजनांच्या लाभार्थ्यांना संबोधित करतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. 

1 जुलै रोजी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची  सुरुवात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान,  कायदा आणि न्याय व दळणवळण मंत्री श्री रविशंकर प्रसाद यांच्या उद्घाटनपर भाषणांनंतर होईल.  

या कार्यक्रमात डिजिटल इंडियाच्या प्रमुख  कामगिरीसंदर्भातील चित्रफीत सादर केली  जाईल. त्यानंतर  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव श्री अजय सावनी यांच्या संचलनाच्या माध्यमातून ,डिजिटल इंडियाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांसह पंतप्रधानांचे परस्पर संवाद सत्र होईल. 

डिजिटल इंडिया महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच  राष्ट्रीय ई - प्रशासन विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंह या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर म्हणाले की ''हे एक अत्यंत  परस्पर संवादी आणि माहिती देणारे सत्र होणार आहे, ज्यात पंतप्रधान देशभरातील डिजिटल इंडियाच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील. पंतप्रधानांकडून आम्हाला मिळालेले मार्गदर्शन आणि  पाठिंबा  अतुलनीय असून  हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.आम्ही त्यांच्या गतिशील नेतृत्वाखाली डिजिटल इंडिया या उपक्रमाला पुढे घेऊन जाण्यासाठी उत्सुक आहोत''

संवादात्मक सत्रानंतर  पंतप्रधानांच्या बहुप्रतिक्षित भाषणात  ते डिजिटल इंडियाच्या कामगिरीची आणि वर्षानुवर्षे लोकांशी जोडले जात असतानाच्या यशोगाथा अधोरेखित करतील. तसेच या योजनेला  पुढे घेऊन जाणाऱ्या  विविध घडामोडी आणि कार्याचा दृष्टीकोनदेखील ते मांडतील. 

या कार्यक्रमात सगळा संवाद आणि संबोधन आभासी माध्यमातून होणार आहे. आम्ही 1 जुलै 2021 रोजी सकाळी 11:00 वाजता https://pmindiawebcast.nic.in च्या  माध्यमातून  आपल्या सर्वांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करू इच्छितो.या कार्यक्रमाचे थेट प्रसारण समाजमाध्यम व्यासपीठावर उदा. डिजिटल इंडियाच्या फेसबुक आणि यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध असेल.


* * *

Jaydevi PS/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1731408) Visitor Counter : 315