शिक्षण मंत्रालय

शाळा बंद असताना आणि नंतरही विद्यार्थ्यांच्या घरगुती अध्ययनात पालकांच्या सहभागासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून मार्गदर्शक नियमावली जारी


शिकण्यासाठी सुरक्षित, गुंतवून ठेवणारे आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण राखण्यावर भर

Posted On: 19 JUN 2021 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 जून 2021


केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने शाळा बंद असताना आणि नंतरही विद्यार्थ्यांच्या घरगुती अध्ययनात पालकांच्या सहभागासंदर्भात मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे.

महामारीच्या काळात या पूर्णपणे नवीन परंतु हळूहळू सवयीच्या होऊ लागलेल्या परिस्थितीमध्ये बालकांचा विकास आणि शिक्षण यामध्ये पालकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे मानून, शाळा बंद  असताना बालकांच्या अध्ययनात कोणतीही शैक्षणिक पात्रता असलेल्या पालकांना सहभागी होता यावे आणि त्यासाठी  ‘का’, ‘कशासाठी’ व ‘कशा प्रकारे’ याबाबत माहिती देण्याच्या उद्देशाने ही नियमावली तयार करण्यात आली आहे, असे केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.

 

घरी राहून शिकण्यासाठीच्या नियमावलीने यासाठी सुरक्षित, गुंतवून ठेवणारे आणि शिकण्यासाठी सकारात्मक प्रभाव टाकणारे वातावरण ठेवणे, पाल्याकडून अवास्तव अपेक्षा न ठेवणे, तसेच आरोग्याची काळजी घेणे, पौष्टिक खाणे यासोबतच मुलांसोबत मौजमजेसाठी वेळ देणे या बाबींवर भर देण्यात आला आहे. ही नियमावली केवळ पालकांसाठी नसून अन्य काळजीवाहू , कुटुंबातील इतर सदस्य, आजी-आजोबा, समाजातील इतर घटक तसेच मुलांच्या विकासात हातभार असणारी त्यांची मोठी भावंडे यांनाही मार्गदर्शन करते.

पालकांनी तसेच इतरांनी मुलांना सहकार्य करण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या अनेक महत्वाच्या बाबी या नियमावलीत समाविष्ट आहेत.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शालेय शिक्षणाच्या विविध स्तरांनुसार या सूचना आहेत. वयोगटानुसारच कृतीआराखडे हे 5+3+3+4 व्यवस्थेवर म्हणजेच 3 ते 8 वर्षे हा पायाभूत स्तर, 8 ते 11 वर्षे हा प्राथमिक स्तर, 11 ते 14 हा मध्यस्तर व 14 ते 18 हा पौंगडावस्था ते प्रौढ वयोगट हा माध्यमिक स्तर  अशा वयोगटानुसार या नियमावलीत आहेत.  हे कृती आराखडे सोपे व सूचक स्वरूपाचे आहेत त्यामुळे त्यात स्थानिक परिस्थिती ,आवश्यकता व संदर्भानुसार बदल करता येतील. विद्यार्थ्यावरील ताण कमी करणे वा त्यांना परिस्थितीच्या धक्क्याची जाणवणारी तीव्रता सौम्य करणे  यासाठी   कलाविषयक उपक्रमांची भूमिका महत्वाची असल्याचे या नियमावलीत नमूद केले आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पडलेला खंड जाणून घेऊन त्यानुसार त्यांच्या शिकण्यात सुधारणा करणे यावर या नियमावलीचा भर आहे. पाल्याचे शिक्षण हे पालक आणि शिक्षकांसाठी सारखेच महत्वाचे असल्यामुळे पालकांनी शिक्षकांच्या संपर्कात राहून विद्यार्थ्याची प्रगती नोंदवण्यात सहकार्य द्यावे.

मुलांना गृहपाठातील सहकार्य आणि  अभ्यासासोबतच अभ्यासक्रमाशी संबधीत इतर बाबी, निर्णय प्रक्रीया, नियोजन आदी विषयांबाबतही माहिती देउन शाळांनीही पालकांना सहभागी करून घ्यावे.  असा सल्ला या नियमावलीत देण्यात आला आहे. शालापत्रिका, ई-मेल, मेमो य़ा अश्य़ा अनेक माध्यमातून पालकांना संसाधने पुरवण्यात यावी.

विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संसाधने देता येतील .पालकांनाही त्याचा शोध घेता येईल तसेच या संदर्भातील मार्गदर्शनासाठी त्यांना शिक्षकांशी संवाद साधता येईल. इतर मार्गदर्शक एजन्सीजसुद्धा ही संसाधने देउ शकतील त्या माहितीसाठी शाळा व्यवस्थापन समित्या (SMCs), ग्रामपंचायती, शाळा व्यवस्थापन याच्या कडेही पालकांना विचारणा करता येईल.

कमी शिक्षण असणाऱ्या वा अशिक्षित पालकांसाठी या नियमावलीत विशेष सूची समाविष्ट आहे. शाळा, शिक्षक आणि स्वयंसेवकांनी या सूचना कमी शिक्षित पालकांना सहकार्य करण्यासाठी उपयोगी पडतील.

 

नियमावलीसाठी येथे क्लिक करा.

* * *

S.Patil/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1728549) Visitor Counter : 575