शिक्षण मंत्रालय

उच्च शिक्षणविषयक अखिल भारतीय सर्वेक्षण अहवाल (AISHE) 2019-20 ला केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मंजुरी


केंद्र सरकारने सातत्याने उच्च शिक्षणाला दिलेल्या महत्वाचे अहवालात प्रतिबिंब

विद्यार्थी पटसंख्येत 2015-16 पासून 2019-20 पर्यंतच्या काळात 11.4% ची वाढ

उच्च शिक्षणात 2015-16 पासून 2019-20 पर्यंतच्या काळात मुलींच्या पटसंख्येत 18.2% ची वाढ

वर्ष 2019-20 मध्ये उच्च शिक्षणात सकल नोंदणी गुणोत्तर (GER) 27.1%

Posted On: 10 JUN 2021 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जून 2021

 

वर्ष 2019-20 साठीच्या उच्चशिक्षण विषयक अखिल भारतीय सर्वेक्षण अहवालाला, आज केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी मंजुरी दिली आहे. या अहवालात देशातील उच्चशिक्षणाच्या सद्यस्थितीविषयी माहिती असून, महत्वाच्या क्षेत्रांमधील कामगिरीचा ठळक उल्लेख करण्यात आला आहे.

 

 

2015-16 ते 2019-20 या पाच वर्षांच्या काळात, विद्यार्थी पटसंख्येत (नोंदणीत) 11.4% ची वाढ झाली. याच काळात उच्चशिक्षणात  मुलींच्या पटसंख्येत 18.2% ची वाढ झाली आहे, असे पोखरीयाल यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार उच्च शिक्षणावर सातत्याने भर देत असून, त्यातही मुली, महिलांचे शिक्षण  तसेच सामाजिक दृष्ट्या मागास वर्गांच्या सक्षमीकरणाकडे विशेष लक्ष देत आहे. सरकारच्या विविध उपायांमुळेच,उच्च शिक्षणात, महिला, अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांचा सहभाग वाढला असून त्याचेच प्रतिबिंब या अहवालात पडल्याचे दिसते, असे पोखरीयाल यांनी सांगितले. 

या अहवालात काढण्यात आलेले निष्कर्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चशिक्षण क्षेत्रात लागू केलेली धोरणे यशस्वी ठरल्याचेच निदर्शक आहे, असे शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यावेळी म्हणाले. या अहवालामुळे धोरणकर्त्यांना देशातील उच्च शिक्षणाची परिस्थिती आणखी सुधारण्यासाठी मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 

उच्चशिक्षण विभागाचे सचिव अमित खरे यांनी या अहवालाविषयी माहिती देतांना सांगितले की, हा उच्च शिक्षणविषयक अखिल भारतीय सर्वेक्षण अहवाल (AISHE) दरवर्षी शिक्षण मंडळातर्फे प्रकाशित केला जात असून, यंदाचा हा दहावा अहवाल आहे. आपल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चाच भाग म्हणून, शिक्षणाची उपलब्धता सुधारणे, समानता आणि गुणवत्ता ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी  विद्यार्थी पटसंख्येत आणि शैक्षणिक संस्थांमध्ये  वाढ, लिंगभाव समानता या उपाययोजना केल्या जात आहेत, असे त्यांनी पुढे सांगितले.

उच्च शिक्षणविषयक अखिल भारतीय सर्वेक्षण अहवाला 2019-20 ची(AISHE)ठळक वैशिष्ट्ये

1. वर्ष 2019-20 मध्ये उच्च शिक्षणात एकूण विद्यार्थी नोंदणी (पटसंख्या) 3.85  कोटी इतकी होती. वर्ष 2018-19 मध्ये ही संख्या 3.74  कोटी इतकी होती. म्हणजेच एकूण पटसंख्येत 11.36  लाखांची वाढ झाली आहे. वर्ष 2014-15 मध्ये एकूण पटसंख्या 3.42  कोटी इतकी होती

2. सकल नोंदणी गुणोत्तर, म्हणजेच पात्र वयोगटातील एकूण मुलांपैकी उच्च शिक्षणासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण, वर्ष 2019-20 मध्ये 27.1% इतके होते. वर्ष 2018-19 मध्ये ते  26.3% आणि  2014-2015 मध्ये 24.3% इतके होते.

3. उच्च शिक्षणातील लैंगिक समानता निर्देशांक वर्ष 2019-20 मध्ये 1.01 होता,वर्ष 2018-19 मध्ये तो 1.00 होता. यात झालेली सुधारणा, उच्च शिक्षण क्षेत्रात पुरुष विद्यार्थ्यांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शक आहे.

4. उच्च शिक्षणात वर्ष 2019-20 मध्ये विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर 26 इतके आहे.

5. वर्ष 2019-20: विद्यापीठे: 1,043 (2%); महाविद्यालये: 42,343(77%) आणि स्वतंत्र संस्था,  : 11,779(21%).

    

6. 3.38 कोटी विद्यार्थ्यांनी पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केली आहे. यापैकी, सुमारे 85% विद्यार्थी (2.85 कोटी)  यांनी सहा महत्वाच्या विद्याशाखा, जसे की मानव्यशास्त्रे, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान-कॉम्पुटर अशा अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केली आहे.

7. वर्ष 2019-20 मध्ये पीएचडी अध्ययन करण्यासाठी 2.03 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, वर्ष 2014-15 ही संख्या 1.17 लाख इतकी होती.

8. देशात उच्च शिक्षणक्षेत्रातल्या एकूण शिक्षकांची संख्या 15,03,156 इतकी असून त्यात 57.5% पुरुष आणि 42.5% महिला आहेत.

संपूर्ण अहवाल वाचण्यासाठी खाली क्लिक करा :

 

* * *

Jaydevi PS/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1725996) Visitor Counter : 436