पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची बैठक


या दशकातीलच नव्हे तर पुढील दशकातील गरजांच्या दृष्टीने सज्ज असणे आवश्यक : पंतप्रधान

Posted On: 04 JUN 2021 5:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जून 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची बैठक दूरसंवाद पद्धतीने पार पडली.

कोरोना महामारी हे या शतकातील एक मोठे आव्हान म्हणून सामोरे आले असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. या पूर्वी सुद्धा जेव्हा जेव्हा मानवी अस्तित्वाला धोका निर्माण झाला  तेव्हा तेव्हा विज्ञानाने भविष्यकाळ सुकर करणारे मार्ग शोधले. संकटावर उपाय शोधून किंवा सर्व शक्यता आजमावून बळकट होणे हा विज्ञानाचा मूलभूत गुणधर्म आहे असे त्यांनी नमूद केले.

महामारीतून मानवी जीवन वाचवण्यासाठी गेल्या वर्षभरात  वेगाने लसींवर संशोधन करुन तत्परतेने त्या उपयोगात आणल्या याबद्दल त्यांनी वैज्ञानिकांची प्रशंसा केली.  इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर असे पहिल्यांदाच घडले आहे असेही ते म्हणाले. याआधी इतर देशांमध्ये संशोधन होत असे व ते भारतात येण्यासाठी वाट बघावी लागत असे मात्र आता भारतातील संशोधक सुद्धा इतर देशांतील संशोधकांएवढेच वेगाने आणि त्यांच्या बरोबरीने काम करत आहेत असे त्यांनी नमूद केले. कोरोना विरोधी लढ्यात देशाला निदान चाचण्या संच, वैद्यकीय उपकरणे, परिणामकारक नवीन औषधे तसेच कोविड-19 वरील लसींच्या बाबतीत स्वयंपूर्ण केल्याबद्दल त्यांनी वैज्ञानिकांचे आभार मानले. विज्ञान आणि तंत्रज्ञानात विकसित देशांची बरोबरी केल्यामुळे उद्योग आणि बाजारपेठेला लाभ होईल असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. आपल्या देशात विज्ञान, समाज आणि उद्योग यांना एका रेषेत आणण्यासाठी  वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद संस्थात्मक पातळीवर काम करते.

या संस्थेच्या प्रमुख पदी असलेल्या शांतीस्वरूप भटनागर यांच्या सारखे अनेक बुद्धिवान व वैज्ञानिक संस्थेने देशाला दिले. संशोधन आणि पेटंट यांची परिणाम कारक पद्धत या संस्थेकडे आहे. देशासमोर असलेल्या अनेक समस्यांवर मार्ग काढण्यासाठी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद काम करत आहे, असेही ते म्हणाले.

देशाचे ध्येय आणि देशवासीयांच्या नजरेत असलेले एकविसाव्या शतकाचे स्वप्ने यांना मजबूत पाया लाभला आहे. आजचा भारत स्वयंपूर्ण आणि प्रत्येक क्षेत्रात मजबूत होऊ पाहणारा आहे. जैवतंत्रज्ञान ते बॅटरी तंत्रज्ञान, कृषी ते अवकाश, आपत्ती व्यवस्थापन ते संरक्षण व्यवस्थापन, लस ते व्हर्च्युअल तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रात भारताला सशक्त व्हायचे आहे. शाश्वत ऊर्जा आणि स्वच्छ ऊर्जा या प्रकारांमध्ये भारत जगाचा मार्गदर्शक बनला आहे. आज सॉफ्टवेअर पासून सॅटेलाईटपर्यंत सर्वच क्षेत्रात भारत वेगाने प्रगती करत आहे आणि जगाच्या प्रगतीचे इंजिन म्हणून काम करत आहे असे पंतप्रधान म्हणाले. म्हणूनच भारताने याच दशकातील नव्हे तर पुढच्या दशकातील गरजांच्या दृष्टीने सज्ज असले पाहिजे असेही ते म्हणाले.

जगभरातील वैज्ञानिक हवामान बदलावर चिंता व्यक्त करत आहेत. यासंदर्भात शास्त्रज्ञ आणि संस्थांनी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून तयार राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्बन कॅप्चर ते ऊर्जा साठवण आणि हरित हायड्रोजन तंत्रज्ञान या प्रत्येक पातळीवर पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेला केले. उद्योग आणि समाज यांना एकत्र आणण्याचे आवाहन त्यांनी परिषदेला केले. आपल्या सल्ल्यानुसार लोकांकडून सूचना मागवल्या बद्दल त्यांनी परिषदेचे कौतुक केले. 2016 मधील अरोमा मिशन मध्ये योग्य भूमिका निभावल्याबद्दल त्यांनी परिषदेची प्रशंसा केली. आज देशातील हजारो शेतकरी फुलशेतीच्या माध्यमातून आपले भविष्य उज्वल करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. हिंगासाठी निर्यातीवर अवलंबून असलेल्या भारतात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने हिंगाचे  स्वदेशी उत्पादन घेण्यास मदत केल्याबद्दलही त्यांनी  परिषदेची  प्रशंसा केली.

एक विशिष्ट ध्येय घेऊन त्यासाठी मार्ग आखण्याची सुचना त्यांनी परिषदेला केली. कोरोनामुळे विकासाच्या गतीवर परिणाम झाला असला तरी आत्मनिर्भर भारताचे स्वप्न  साकार करायचे आहे. देशात उपलब्ध असलेल्या संधींचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शेतीपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना आणि स्टार्टअपना वाव आहे. कोविड संकटाशी झुंज देताना मिळवलेल्या यशाची सर्व शास्त्रज्ञ व संस्थांनी पुन्हा उजळणी करावी असेही त्यांनी सुचवले.

 

* * *

S.Tupe/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1724443) Visitor Counter : 342