आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड बाधित बालकांच्या उपचारात आणि त्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही कसर राहू दिली जाणार नाही : निती आयोग


बाधित बालकांपैकी दोन ते तीन टक्के बालकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकते : डॉक्टर वी.के. पॉल

बालकांमधील कोविड संदर्भात नियमावली लवकरच येणार

Posted On: 01 JUN 2021 7:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली/मुंबई, 1 जून 2021
 

बालकांमध्ये होणाऱ्या कोविड-19 संसर्गाचा आढावा घेण्यासाठी तसेच महामारीला सामोरे जाण्यासाठी नवीन पद्धतीचा अवलंब करून त्यासाठी देशाची  सज्जता बळकट करणे यासाठी  राष्ट्रीय पातळीवर तज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे. या महामारी संदर्भात चार पाच महिन्यापूर्वी अस्तित्वात नसलेल्या लक्षणांचा अभ्यासही या समितीने केला आहे.

उपलब्ध डेटा, औषधोपचारासंबंधी तपशील, देशातील अनुभव, संसर्गाची गती, विषाणूचे व महामारीचे स्वरूप या सर्वांचा   साकल्याने विचार करून त्यानुसार या समितीने  नियमावली  तयार केली आहे, ती लवकरच प्रसिद्ध केली जाईल.

निती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य वी. के. पॉल  ज्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या कोविड-19 संदर्भातील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नवी दिल्लीतील राष्ट्रीय माध्यम केंद्र, पीआयबी येथे ही पत्रकार परिषद भरवण्यात आली होती.

"या विषयी वैज्ञानिक घडामोडींचा आढावा आम्ही पद्धतशीरपणे घेत आहोत त्याच वेळी पुढील परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी एक पथक तयार केले आहे "

 

मुलांमधील कोविड19 संसर्ग लक्षात येत असताना ज्या बालकांमध्ये कोविडचा प्रादुर्भाव आढळून येईल त्यांची सर्वतोपरी काळजी घेऊन उपचारात कोणतीही कसर राहू दिली जाणार नाही असे ते म्हणाले. 

"बालकांमधील कोविड-19 चे स्वरूप हे सर्वसाधारणपणे नेहमीच लक्षण-रहित असल्याचे आढळून येते आणि त्यासाठी क्वचितच रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासते. तरीही महामारीच्या बदलत्या स्वरूपाकडे आणि विषाणूंच्या वर्तनातील फरक लक्षात घेता संसर्गाची व्याप्ती वाढू  शकते.

परंतु, यामुळे महामारी संदर्भातील मूलभूत सोयीसुविधांवर कोणताही भार  येण्याची शक्यता नाही. तरीही दोन ते तीन टक्के बालकांना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकेल.

मुलांमध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव दोन प्रकारे होऊ शकतो अशी माहिती वी के पॉल यांनी दिली.

एका प्रकारात संसर्गाच्या स्वरुपात ताप न्युमोनिया यासारखी लक्षणे आढळून येतात काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते.

दुसऱ्या प्रकारात दोन ते सहा आठवडे लक्षण- रहित कोविड झालेला असू शकतो . यापैकी काही बालकांना ताप ,अंगदुखी, डोळे जळजळणे किंवा डोळे आल्यासारखी लक्षणे श्वासाचा त्रास, अतिसार, उलटीची भावना अशा सारखी लक्षणे आढळून येऊ शकतात. मात्र फुफ्फुसांवर परिणाम करणारा न्युमोनिया एवढ्यापुरतेच याचे स्वरूप मर्यादित राहात नाही तर तो संसर्ग शरीराच्या इतर भागात पसरतो याला  मल्टी सिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम  असे म्हटले जाते. ही कोविड पश्चात लक्षणे आहेत. यावेळी शरीरात कोविड-19 विषाणू आढळत नाही आणि त्यामुळे कोविड rt-pcr निदान चाचणी संसर्ग नसल्याचे दाखवते. परंतु प्रतिजन चाचणी नुसार त्या बालकाला  कोविड संसर्ग होऊन गेल्याचे लक्षात येते.

काही बालकांमध्ये आढळून येणाऱ्या अशा  आजारावर उपचारासाठी नियमावली तयार केली आहे ती आणीबाणीच्या प्रसंगी वापरता येईल. यानुसार उपचार हे कठीण नसले तरी ते वेळेवर होणे आवश्यक आहे असे डॉक्टर पॉल यांनी नमूद केले.


* * *

M.Chopade/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1723494) Visitor Counter : 228