आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड लसीकरणानंतर रक्तस्राव / रक्ताच्या गुठळ्या होणे याचे भारतातील प्रमाण अत्यल्प


लसीकरणोत्तर विपरीत परिस्थितीवरील राष्ट्रीय समितीकडून आरोग्य मंत्रालयाकडे अहवाल सुपूर्द

Posted On: 17 MAY 2021 5:40PM by PIB Mumbai

 

नवी दिल्‍ली, 17 मे 2021 

कोविडची लस दिल्यानंतर रक्तस्राव / रक्ताच्या गुठळ्या होणे याचे प्रमाण भारतात अत्यल्प असून, अशा स्थितीची  अपेक्षित आकडेवारीही सुसंगत असेच आहे. राष्ट्रीय ए.इ.एफ.आय. समिती- अर्थात लसीकरणोत्तर विपरीत परिस्थितीविषयक राष्ट्रीय समितीने आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाला दिलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

अस्ट्राझेंका-ऑक्सफर्ड (भारतात- कोव्हीशील्ड) लस घेतल्यानन्तर रक्तप्रवाहात अडथळा येण्याच्या/ रक्ताच्या गुठळ्या होणे या घटनांबद्दल काही देशांमध्ये 11 मार्च 2021 रोजी धोक्याची सूचना देण्यात आली होती. या घटनांच्या संदर्भाने भारतात लसीच्या विपरीत परिणामांचे सखोल विश्लेषण करण्याचा निर्णय ताबडतोब घेण्यात आला.

राष्ट्रीय ए.इ.एफ.आय. समितीने नोंदविलेल्या निरीक्षणांनुसार, 03 एप्रिल 2021 पर्यंत लसीच्या 7,54,35,381 मात्रा देण्यात आल्या. (कोव्हीशील्ड- 6,86,50,819, कोव्हॅक्सिन -  67,84,562). यापैकी पहिल्या मात्रांची संख्या 6,59,44,106 इतकी होती तर दुसऱ्या मात्रांची संख्या 94,91,275 इतकी होती. कोविड-19 प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम सुरु केल्यापासून 23,000 पेक्षा अधिक विपरीत परिणामांची नोंद कोवीन मंचावर झाली. देशातील 753 पैकी 684 जिल्ह्यांमध्ये अशा नोंदी झाल्या. यापैकी केवळ 700 (म्हणजे दर दशलक्ष मात्रांमागे 9.3 ) व्यक्तींची स्थिती गंभीर असल्याचे नोंदले आहे.

अशा 498 गंभीर आणि तीव्र प्रकरणांचा सखोल आढावा ए.इ.एफ.आय. समितीने घेतला असून त्यापैकी 26 व्यक्तींच्या बाबतीत रक्तात गुठळी होण्याची संभाव्यता वर्तविली जात आहे. (ही गाठ रक्तवाहिनीतून वाहत जाऊन दुसऱ्या वाहिनीचा प्रवाहही थांबवू शकते.) कोव्हीशील्ड लस घेतल्यानन्तर असे  परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात असून तसे होण्याचा दर दहा लाख मात्रांमागे 0.61 इतका आहे.

कोव्हॅक्सीन लस दिल्यानन्तर रक्ताच्या गुठळ्या होणे किंवा तशी संभाव्यता असण्याच्या प्रकारांची नोंद झालेली नाही.

ए.इ.एफ.आय.च्या भारतातील आकडेवारीतून असे दिसते की, अशा पद्धतीने रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या धोक्यांची संख्या अत्यल्प असली तरी तसे धोके सुनिश्चित करता येतील असे आहेत. असे प्रकार होण्याचा भारतातील दर दहा लाख मात्रांमागे  0.61 असून, इंग्लंडमध्ये तो 4 तर जर्मनीत 10 इतका आहे.

सर्वसामान्य जनतेमध्ये अशा पद्धतीने रक्तात गुठळ्या होऊ शकतात. वैज्ञानिक लिखाणात असे दिसते की दक्षिण आणि आग्नेय आशियाई वंशांच्या व्यक्तींमध्ये युरोपीय वंशांपेक्षा याचा धोका सुमारे 70 टक्के कमी असतो..

कोणतीही कोविड प्रतिबंधक लस (विशेषतः कोव्हीशील्ड) घेतल्यावर 20 दिवसांत संभाव्य रक्तात गुठळ्या होण्याच्या लक्षणांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आणि लसीच्या लाभार्थ्यांसाठी वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचना जारी करत आहे. तसे झाल्यास जेथून लस घेतली त्या केंद्राला तसे कळविण्याचे आवाहनही यामध्ये करण्यात येत आहे.

लक्षणे

 • श्वास घेता न येणे;
 • छातीत दुखणे;
 • हातापायांमध्ये वेदना/ हातपाय दाबल्यावर दुखणे/ हातापायावर (दण्ड/ पोटरी) यावर सूज;
 • इंजेक्शन घेतल्याच्या जागेपलीकडे टाचणीच्या टोकाएवढे अनेक लाल ठिपके, त्वचेखाली मुकामार लागल्यासारखे दिसणे;
 • उलट्यांसहित किंवा उलट्यांविना सतत पोट दुखणे;
 • फेफरे येण्याचा शारीरिक इतिहास नसतानाही उलट्यांसहित/उलट्यांविना फेफरे येणे;
 • उलट्यांसहित/उलट्यांविना सतत डोकेदुखी (अर्धशिशी किंवा जुनाट डोकेदुखीचा इतिहास नसतानाही);
 • शरीराच्या एखाद्या बाजूच्या हातापायात थकवा वाटणे/ अर्धांगवायू होणे (चेहऱ्यासह);
 • कोणत्याही ठोस कारणाशिवाय सतत उलट्या होणे;
 • धूसर दिसणे किंवा डोळे दुखणे किंवा दोन-दोन दिसणे;
 • मानसिक स्थितीत बदल, संभ्रमावस्था, नैराश्य;
 • अन्य एखादे लक्षण, ज्याबद्दल संबंधित व्यक्तीला किंवा तिच्या कुटुंबियांना काळजी वाटेल

कोव्हीशील्ड या कोविड प्रतिबंधक लसीचे 'धोका-फायदा' गुणोत्तर सकारात्मक / हितावहच असून संसर्ग टाळण्याचे व कोविड मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याचे तिचे सामर्थ्य मोठे आहे हेच साऱ्या जगासाठी व भारतासाठी आजही सत्य आहे. भारतात 27 एप्रिल 2021 पर्यंत कोव्हीशील्ड लसीच्या 13.4 कोटीहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. सर्व कोविड प्रतिबंधक लसींच्या सुरक्षिततेवर केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाचे लक्ष असून संभाव्य विपरीत परिणामांची नोंद करण्याचा मंत्रालयाकडून आग्रह धरला जात आहे.

 * *

Jaydevi PS/J.Waishampayan/D.Rane

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1719364) Visitor Counter : 687