आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड पॉझिटीव्ह रुग्णांसाठी “गृह विलगीकरणातील औषधे आणि घ्यावयाची काळजी” या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन

Posted On: 15 MAY 2021 1:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई,15 मे 2021

 

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या उत्कृष्ठता  केंद्राकडून (सेंटर ऑफ एक्सलन्स) कोविड पॉझिटीव्ह रुग्णांसाठी “गृह विलगीकरणातील औषधे आणि घ्यावयाची काळजी या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. एम्स दिल्ली येथील डॉ मनीष, डॉ नीरज निश्चल यांनी या वेबिनारमध्ये तज्ञ म्हणून मार्गदर्शन केले.

डॉ. मनीष यांनी 'सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी उपचारासंदर्भातील सुधारित मार्गदर्शक सूचना' तर 'गृह विलगिकरणातील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी औषधांचे व्यवस्थापन' यासंदर्भात डॉ. नीरज यांनी मार्गदर्शन केले.

ताप, खोकला, थकवा, वास किंवा चव जाणे ही कोविड पॉझिटीव्ह रुग्णांची सर्वसामान्य लक्षणे आहेत. तर, घसा खवखवणे (दुखणे), डोकेदुखी, अंगदुखी, अतिसार (जुलाब), त्वचेवर पुरळ येणे, डोळे लाल होणे ही साधारणतः रुग्णांमध्ये कमी प्रमाणात  दिसून येणारी लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसून येताच रुग्णांनी तातडीने अलगीकरण करुन घ्यावे, असे डॉ नीरज निश्चल यांनी सांगितले.

कोविड रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण अति सौम्य लक्षणं असलेली असतात. कोविड चाचणी केल्यानंतर जर चाचणी निगेटीव्ह आली असेल आणि तरीही लक्षणे दिसून येत असतील तर पुन्हा चाचणी करावी. पॉझिटीव्ह रुग्णांना त्यांच्या आजाराच्या तीव्रतेनुसार रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घ्यावा, असे डॉ नीरज निश्चल म्हणाले.

कोविड काळात कोणती औषधं घ्यायची याबद्दल माहिती असते पण त्या औषधांचा योग्य वेळी योग्य वापर महत्वपूर्ण आहे, योग्य औषध योग्य वेळी घेतल्यास रुग्णांना खरा लाभ होतो, असे डॉ. नीरज यांनी यावेळी स्पष्ट केले.

60 वर्षांवरील रुग्ण, उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन), मधुमेह, ह्रदयाचे विकार, किडनी, फुप्फुसाचे विकार असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गृह विलगीकरणा निर्णय घ्यावा, असे डॉ नीरज यांनी सांगितले.  

कोविड पॉझिटिव्ह रुग्णांनी नियोजनाचा भाग म्हणून काही तयारी करणे देखील आवश्यक आहे.

नियमित लागणारी औषधे, निर्जंतुकिकरणासाठीच्या वस्तू, वैद्यकीय दर्जाचे मास्क, इत्यादी आणून ठेवणे, घरात रोज लागणाऱ्या सामानासाठी नियोजन करणे, आरोग्य विषयक माहितीसाठी डॉक्टर,आरोग्य कर्मचारी, हॉट लाईन नंबरची यादी करणे तसेच ऐन वेळेला लागणाऱ्या मदतीसाठी  कुटुंबातील सदस्य, मित्रपरिवार, शेजारी यांचे संपर्कही तयार ठेवणे, लहान मुले असल्यास त्यांची काळजी घेण्यासाठी योग्य व्यवस्था करणे आदी गोष्टींचा यात समावेश आहे, असे डॉ. नीरज निश्चल यांनी नमूद केले.

सौम्य आणि अतिसौम्य लक्षणे असलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांनी गृह विलगीकरण करुन घ्यावे. अशा रुग्णांनी कुटुंबातील सदस्यांपासून विशेषतः बालकांपासून अंतर ठेवून राहिले पाहिजे. नियमित लागणारी औषधे जवळ बाळगावी. उपचार सुरु असलेल्या किंवा संपर्कात असलेल्या डॉक्टरांसोबत नियमित संवाद ठेवावा. गृह विलगीकरणात असलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांनी नियमितपणे तीन पदरी मास्क वापरावा. 8 तासानंतर मास्कची योग्य विल्हेवाट लावावी. रुग्णाशी संबंधित काम करताना  रुग्णाची काळजी घेणारी व्यक्ती  आणि  रुग्ण यांनी दोघांनी ही  N-95 मास्क वापरावा.

पल्स ऑक्सिमीटरचा वापर अतिशय व्यवस्थितरित्या करावा. नेल पॉलिश आणि कृत्रिम नखे असतील तर ती काढावी आणि हात जर थंड असेल तर थोडा उबदार करुन घ्यावा. नियमित चाचणी करण्यापूर्वी पाच मिनिटे विश्रांती घ्यावी. पाच सेकंद जर नोंद बदलली नाही तर ती नोंद तुमची त्यावेळची ऑक्सिजन पातळी दाखवत असते. रेमडेसिवीरचा वापर घरी करु नये. रुग्णांनी सकारात्मक राहावे, नियमित व्यायाम करावा, असे डॉ नीरज निश्चल म्हणाले.

कोविड व्यवस्थापनाचा सध्या आपल्याकडे केवळ एक वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळे उपचाराविषयी कोणत्याही निष्कर्षाला येणे उचित नाही, असे डॉ मनीष यांनी सांगितले. ऑक्सिजन पातळी 94 पेक्षा कमी असल्यास रुग्णालयात दाखल व्हावे, असा सल्ला त्यांनी दिला. ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी रुग्णाचे वय, जुनाट व्याधी या लक्षात घेणे आवश्यक आहे.

आयव्हरमेक्टीन (Ivermectin) देण्याविषयीचा  निर्णय हा रुग्णांची प्रतिकारशक्ती, इतर बाबी यावर अवलंबून आहे. तीच बाब पॅरासिटेमोल बाबतही आहे. त्यामुळे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच  कुठलीही औषधे घ्यावी, असे डॉ मनीष यांनी सांगितले.

फॅबीफ्लूबाबत माहिती देताना ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारच्या नियमावलीत फॅबीफ्लू घेण्याविषयी सांगण्यात आले आहे. ग्लेनमार्कने 150 रुग्णांचा अभ्यास केला, त्यानुसार फॅबीफ्लूची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, यातून आयव्हरमेक्टीन वगळण्यात आले आहे.

अनेकदा रुग्णांकडून अझिथ्रोमायसीनची मागणी केली जाते, मात्र नियमावलीत स्पष्टपणे सांगिले आहे की, या गोळ्या वापरु नका. अशीच सूचना रेवीडॉक्स (Revidox) बाबतही आहे. गृह विलगीकरणात झिथ्रोमायसीन आणि रेवीडॉक्स (Revidox)  या औषधाचा वापर करु नये. 

चर्चे दरम्यान  दोन्ही तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, गृह विलगीकरणात कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.

 

***

Jaydevi PS/S. Tupe /S.Thakur/C.Yadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1718788) Visitor Counter : 607