पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी घेतली वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा आणि उपलब्धता याबाबत उच्चस्तरीय बैठक

Posted On: 22 APR 2021 5:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 एप्रिल 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील सध्या होत असलेल्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी तसेच ऑक्सीजनची उपलब्धता वाढविण्याचे मार्ग आणि उपाय यांच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज एक उच्च स्तरीय बैठक घेण्यात आली. गेल्या काही आठवड्यांमध्ये ऑक्सीजनचा पुरवठा सुधारण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांबद्दल अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.

ऑक्सिजनचे उत्पादन वाढविणे, ऑक्सिजनच्या वितरणाचा वेग वाढविणे आणि आरोग्य सुविधा केंद्रांना ऑक्सीजनचा पुरवठा करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करणे अशा विविध पैलूंबाबत वेगाने काम करण्याची गरज पंतप्रधानानी या बैठकीत व्यक्त केली.

विविध राज्यांची ऑक्सीजनची मागणी ओळखून त्यानुसार त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारांशी समन्वय साधून विशेष प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. देशातील 20 राज्यांच्या प्रतिदिन 6,785 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनच्या सध्याच्या मागणीला प्रतिसाद म्हणून प्रत्यक्षात भारत सरकार त्या राज्यांना प्रतिदिन 6,822  मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा करीत आहे.

सरकारी तसेच खासगी पोलाद कारखाने, उद्योग, ऑक्सिजन उत्पादक यांच्याकडून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात मिळालेल्या योगदानामुळे तसेच जिथे ऑक्सिजनची अत्यावश्यक गरज नाही अशा उद्योगांना होत असलेला ऑक्सिजनचा पुरवठा थांबविण्यात आल्यामुळे, गेल्या काही दिवसांमध्ये, द्रवरूप ऑक्सिजनच्या उपलब्धतेत प्रतिदिन 3,300 मेट्रिक टन इतकी वाढ झाली आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे.

मंजूर झालेले PSA ऑक्सिजन प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी राज्यांसोबत एकत्रितपणे काम करीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली.

विविध राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा सुलभतेने आणि सुरळीतपणे होत आहे याची खात्री करून घेण्याचे निर्देश पंतप्रधानांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यामध्ये उद्भवलेल्या समस्या सोडविण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर सोपविण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली. विविध मंत्रालयांनी ऑक्सिजनचे उत्पादन आणि पुरवठा वाढविण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण मार्ग शोधून काढावे अशा सूचना पंतप्रधानांनी दिल्या.

नायट्रोजन आणि ओर्गोन टँकर्सचे ऑक्सिजन टँकर्समध्ये   रुपांतर करणे, टँकर्सची आयात तसेच हवाई वाहतूक करणे तसेच त्यांचे उत्पादन करणे यांसह क्रायोजेनिक टँकर्सची उपलब्धता वेगाने वाढविण्याचे विविध उपाय करण्यात येत आहेत. 

राज्यांच्या दिशेने ऑक्सिजनची वाहतूक अधिक वेगाने होण्याची गरज आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. लाबं पल्ल्याच्या अंतरावर ऑक्सिजनच्या टँकर्सच्या जलद आणि विनाथांबा वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर केला जात आहे यावर बैठकीत चर्चा झाली. 105 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनची आणण्यासाठी मुंबईहून निघालेली पहिली रेल्वेगाडी विशाखापट्टणम येथे पोहोचली आहे. त्याच प्रमाणे ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी एका दिशेच्या  मार्गावरील प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी रिकामे ऑक्सिजन टंकर्स हवाई वाहतुकीद्वारे ऑक्सिजन पुरवठादारांकडे पोहोचविले जात आहेत.

उपलब्ध ऑक्सिजनचा न्याय्य पद्धतीने वापर करण्याची गरज वैद्यकीय समुदायाच्या प्रतिनिधींनी या बैठकीत व्यक्त केली. तसेच काही राज्यांमध्ये ऑक्सिजन वापराबाबत बारकाईने झालेल्या परीक्षणामुळे रुग्णांच्या परिस्थितीवर काही वाईट परिणाम न होता ऑक्सिजनच्या मागणीत घट झाली आहे हे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यांनी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा साठा करू नये यावर देखील पंतप्रधानांनी भर दिला.

या बैठकीला मंत्रिमंडळसचिव, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, गृह सचिव,आरोग्य सचिव तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय,रस्ते वाहतूक मंत्रालय, औषध निर्मिती विभाग आणि नीती आयोगाचे अधिकारी उपस्थित होते.

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1713422) Visitor Counter : 363