पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी भारतीय विद्यापीठ संघटनेच्या 95 व्या वार्षिक बैठकीला आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय चर्चासत्राला संबोधित केले


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चार पुस्तकांचे केले प्रकाशन

बाबासाहेबांनी पुढे जाण्यासाठी आणि भारताचा लोकशाही वारसा बळकट करण्यासाठी मजबूत पाया रचला : पंतप्रधान

बाबासाहेबांचे समान संधी आणि समान हक्कांचे स्वप्न सरकारी योजना पूर्ण करत आहेत : पंतप्रधान

आम्हाला सर्व विद्यापीठे बहु-शाखीय, विद्यार्थ्यांना लवचिकता देणारी हवी आहेत : पंतप्रधान

Posted On: 14 APR 2021 3:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 एप्रिल 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारतीय विद्यापीठ संघटनेच्या 95 व्या वार्षिक बैठकीला आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय  चर्चासत्राला संबोधित केले.  किशोर मकवाना यांनी लिहिलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित चार पुस्तकांचे प्रकाशनही त्यांनी केले. गुजरातचे  राज्यपाल, मुख्यमंत्री आणि  शिक्षणमंत्री आणि केंद्रीय शिक्षणमंत्री यावेळी उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, अहमदाबाद यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पंतप्रधानांनी भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कृतज्ञ देशाच्या वतीने आदरांजली वाहिली आणि म्हणाले  की देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच्या  काळात त्यांची जयंती आपल्याला नवी ऊर्जा देते.

भारत ही जगात लोकशाहीची जननी आहे आणि लोकशाही हा आपल्या संस्कृतीचा  आणि आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक आहे यावर मोदींनी भर दिला. बाबासाहेबांनी भारताची लोकशाही परंपरा मजबूत करताना पुढे जाण्यासाठी भक्कम पाया रचला, असे पंतप्रधान म्हणाले.

बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, डॉ. आंबेडकरानी ज्ञान, स्वाभिमान  आणि विनम्रता यांना  तीन पूजनीय देवता मानले होते.. स्वाभिमान ज्ञानाबरोबर येतो आणि व्यक्तीला त्याच्या हक्कांची जाणीव करुन देतो. समान हक्कांच्या माध्यमातून सामाजिक समरसता उदयाला येते  आणि देश प्रगती करतो.  बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गावर देशाला पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या शिक्षणपद्धतीची आणि विद्यापीठांची आहे, असेही मोदी म्हणाले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत  पंतप्रधान म्हणाले की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही विशिष्ट क्षमता असतात. या क्षमता विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर तीन प्रश्न निर्माण करतात. एक-  ते काय करू शकतात? दोन - जर त्यांना योग्यरित्या शिकवले  तर त्यांची क्षमता काय आहे? आणि तीन -  त्यांना काय करायचे आहे? पहिल्या प्रश्नाचे उत्तर  विद्यार्थ्यांची आंतरिक शक्ती आहे. मात्र जर  संस्थात्मक  ताकदीची त्या आंतरिक  सामर्थ्याला  जोड मिळाली तर त्यांचा विकास विस्तारेल  आणि त्यांना जे करायचे आहे ते  करू शकतील. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार मांडताना पंतप्रधान म्हणाले की, डॉ.राधाकृष्णन यांचे शिक्षणाचे स्वप्न  पूर्ण करण्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट  आहे जे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विकासात भाग घेण्यासाठी मुक्त करते आणि सक्षम बनवते . संपूर्ण जगाला एक संस्था  म्हणून समोर ठेवताना भारतीय शिक्षणावर  लक्ष केंद्रित करणारे  शिक्षण व्यवस्थापन हाती घेतले पाहिजे.

उदयोन्मुख आत्मनिर्भर  भारत मधील कौशल्यांच्या वाढत्या मागणीबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, बिग डेटा, थ्रीडी प्रिंटिंग, व्हर्च्युअल रिअल्टी आणि रोबोटिक्स, मोबाइल तंत्रज्ञान, भौगोलिक माहिती, स्मार्ट आरोग्यसेवा आणि संरक्षण क्षेत्र याचे भावी केंद्र म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. कौशल्याची गरज भागवण्यासाठी, देशातील तीन मोठ्या महानगरांमध्ये  भारतीय कौशल्य संस्था स्थापन केल्या  जात आहेत. मुंबईत भारतीय कौशल्य संस्थेची पहिली तुकडी आधीच सुरू झाली आहे. 2018 मध्ये फ्यूचर स्किल्स इनिशिएटिव्हची स्थापना नॅसकॉम बरोबर करण्यात आली, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. ते म्हणाले की आम्हाला सर्व विद्यापीठे बहु-शाखीय हवी आहेत  कारण आम्हाला विद्यार्थ्यांना लवचिकता द्यायची आहे. त्यांनी कुलगुरूंना हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी  काम करण्याचे  आवाहन केले.

सर्वांना समान हक्क आणि समान संधीबाबत  बाबासाहेबांची दृढ निष्ठा याबाबत मोदींनी विस्तृतपणे भाष्य केले. जनधन खात्यांसारख्या योजनांमुळे प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक समावेशीकरण  होते आणि डीबीटीच्या माध्यमातून पैसे थेट त्यांच्या खात्यांमध्ये जमा होतात यावर पंतप्रधानांनी भर  दिला. बाबासाहेबांचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा  पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. बाबासाहेबांच्या जीवनाशी संबंधित मुख्य स्थाने पंचतीर्थ म्हणून विकसित करणे हे त्या दिशेने एक पाऊल आहे. ते म्हणाले की, जल जीवन मिशन, मोफत घरे , मोफत वीज, महामारीदरम्यान सहाय्य आणि महिला सबलीकरणासाठी उपक्रम  यासारखे उपाय बाबासाहेबांची स्वप्ने साकारत आहेत.

किशोर मकवाना यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी  लिहिलेल्या पुढील चार पुस्तकांचे प्रकाशन पंतप्रधानांनी केले.

  1. डॉ.आंबेडकर जीवन दर्शन,
  2. डॉ.आंबेडकर व्यक्ती दर्शन,
  3. डॉ.आंबेडकर राष्ट्र दर्शन, आणि
  4. डॉ.आंबेडकर आयाम दर्शन

पंतप्रधान म्हणाले की ही पुस्तके आधुनिक अभिजात पुस्तकांपेक्षा  कमी नाहीत आणि यातून बाबासाहेबांची वैश्विक दृष्टी दिसून येते.  अशी पुस्तके महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांकडून  मोठ्या प्रमाणात वाचली जातील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

 

* * *

Jaydevi PS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1711758) Visitor Counter : 209