पंतप्रधान कार्यालय

रायसीना संवाद 2021 च्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 13 APR 2021 8:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,13 एप्रिल 2021 

सन्माननीय महामहिम!
मित्रांनो, नमस्कार!
रायसीना संवादाची ही आवृत्ती मानवी इतिहासातल्या अत्यंत बिकट परिस्थितीच्या  क्षणी घडत आहे.  गेल्या  वर्षापासून जागतिक महामारी सर्वत्र पसरली आहे. अशा प्रकारच्या जागतिक महामारीला याआधी मागच्या  शतकापूर्वी सामना करावा लागला  होता. त्यानंतर मानवाला अनेक  संक्रामक आजारांचा, व्याधींचा  सामना करावा लागला असला तरी आज जगात कोविड -19 या साथीचा रोग हाताळण्यास संपूर्ण जग अद्यापही पूणपणे तयार नाही. 
आमच्या शास्त्रज्ञांनी, संशोधकांनी आणि उद्योगांनी काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

विषाणू म्हणजे काय?
ते कसे पसरतात ?
त्यांचा प्रसार आपण कसा कमी करू शकतो?
आपण लस कशी तयार करू शकतो?
वेगाने रोगाचा होणारा प्रसार रोखण्‍यासाठी आणि आपण लसीकरणाचा वेग वाढविण्‍यासाठी कसे व्यवस्थापन  केले पाहिजे?
या आणि अशा बर्‍याच प्रश्नांचे निराकरण करणे, त्यांच्यावर उत्तर शोधणे  आत्तापर्यंत शक्य झाले आहे. मात्र अजूनही याविषयी अनेक शंका आहेत. विश्‍व स्तरावरील विचारवंतांनी आणि नेत्यांनी म्हणूनच स्वतःला आणखी काही प्रश्न विचारले पाहिजेत.
गेल्या एक वर्षापूर्वी, आपल्या समाजातील तज्ज्ञ मंडळी या साथीच्या रोगाच्या विरोधात लढा देत आहेत. जगातील सर्व देशांची सरकारे या साथीच्या रोगाचा प्रसार नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न करीत आहेत. हे काम सर्वजण का बरे करीत आहेत? यामागे कदाचित एक कारण आहे की, आर्थिक विकासाच्या शर्यतीत मानवतेच्या कल्याणाची चिंता मागे पडली होती. त्याचबरोबर कदाचित आजच्या स्पर्धेच्या युगात सहकार्याचा आत्मा विसरला गेला आहे. 
अशा प्रश्नांची उत्तरे आपल्याला अलीकडच्या काळात सापडतील. मित्रांनो, पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाच्या महाभयानक काळानंतर नवीन विश्वव्यवस्था निर्माण करण्‍यासाठी भाग पाडले गेले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर पुढच्या काही दशकांत अनेक संरचना आणि संस्था तयार झाल्या; मात्र दोन युद्धांच्या छायेचा त्यांच्यावर प्रभाव होता, त्यामुळे त्यांचा एकच उद्देश होता की, तिसरे महायुद्ध कसे रोखता येईल?
आज, मी आपल्यासमोर हे स्पष्‍ट  करतो की, हा चुकीचा प्रश्न होता.  परिणामी सर्व पावले उचलताना मूलभूत कारणांकडे लक्ष दिले गेले नाही. जे काही केले ते रुग्णाच्या लक्षणांवर उपचार करण्यासारखे होते. थोडे वेगळ्या शब्दांत सांगायचे झाले तर, उचललेली सर्व पावले पुढील युद्ध नव्हे तर शेवटचे युद्ध रोखण्यासाठी होती. खरं तर मानवतेने तिस-या महायुद्धाला तोंड दिलेलं नाही, तरी लोकांच्या जीवनात हिंसाचाराचा धोका कमी झाला नाही. बरीच शीतयुद्धे आणि आतापर्यंत न संपलेल्या दहशतवादी हल्ल्यांसह हिंसाचाराची शक्यता आजही कायम आहे.

तर मग, अशावेळी योग्य प्रश्न काय असेल?
नेमके काय समाविष्ट होवू शकले असते. 
आपल्याकडे दुष्काळ का पडतो आणि भूकबळी का होत आहेत?
आपल्याकडे गरीबी का आहे?
किंवा सर्वात मूलभूत
संपूर्ण मानवतेला धोका असलेल्या समस्या सोडवण्यासाठी आपण का सहकार्य करू शकत नाही?
मला खात्री आहे की, जर आपली विचारसरणी अशीच राहिली असती तर खूप भिन्न भिन्न प्रकारे उपाययोजना तयार केल्या गेल्या असत्या.
मित्रांनो!
अजूनही खूप उशीर झालेला नाही. मागील सात दशकांतील चुका आणि केलेल्या अयोग्य गोष्‍टींमुळे भविष्याचा विचार करताना आता आपण अनेक मर्यादा  घालून घेण्‍याची गरज नाही. कोविड -19  साथीच्या  रोगाने  आपल्याला   जागतिक क्रम बदलण्याची आणि आपली विचारसरणी पुन्हा सुधारण्याची संधी दिली आहे, असे मला वाटते; आपण याविषयी पुन्हा एकदा विचार करण्‍याची गरज आहे. आजची नेमकी समस्या लक्षात घेवून आणि उद्याच्या आव्हानांचा सामना करणारी यंत्रणा आपण तयार केली पाहिजे.  आपण संपूर्ण मानवतेचा विचार केला पाहिजे फक्त आपल्या सीमेवरचा आणि बाजूला असलेल्यांचा विचार करून चालणार नाही. आपल्या विचार आणि कृतीच्या केंद्रस्थानी एकूणच मानवता असणे आवश्यक आहे.
मित्रांनो!
या साथीच्या वेळी, आमच्यादृष्‍टीने योग्य मार्गाने आणि आमच्याकडे असलेल्या   मर्यादित स्त्रोतांमधूनच, भारताने वाटचाल करण्‍याचा प्रयत्न केला. आमच्या  1.3 अब्ज नागरिकांना साथीच्या आजारापासून वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच बरोबर आम्ही इतरांनाही मदत करण्‍याचा, त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या शेजारी मित्रांमध्‍ये क्षेत्रीय समन्वय साधून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मागील वर्षी आम्ही दीडशेपेक्षा जास्त देशांना औषधे आणि जीव संरक्षक उपकरणे पुरवण्‍याची मदत केली. आम्हाला पूर्णपणे समजले आहे की, इथे भेदाभेद करून चालणार नाही.  आपल्या पारपत्राचा रंग कोणता आहे, याचा विचार न करता शक्य असेल त्या सर्वांन मदत करताना केवळ साथीचा रोगाला पराभूत करायचे आहे, असा आम्ही विचार केला. म्हणूनच, यावर्षी अनेक अडचणी असूनही आम्ही 80 पेक्षा जास्त देशांना लस पुरविली आहे. आम्हाला माहिती आहे की पुरवठा माफक प्रमाणात होता. आम्हाला माहिती आहे की, लसीला सगळीकडून मागणी प्रचंड आहे. आम्हाला माहित आहे की, सर्व नागरिकांचे लसीकरण होईपर्यंत बराच काळ लोटला जाईल. त्याच वेळी आम्हाला हे देखील माहित आहे की, सर्वांना असलेली आशा महत्त्वाची आहे. आणि हे श्रीमंत देशांमधील नागरिकांइतकेच महत्त्वाचे आहे. मात्र आपण कमी नशीबवान आहोत असे अनेकांना वाटते, तसे वाटू नये आणि म्हणूनच आम्ही महामारीच्या विरुद्ध लढ्यातले आमचे अनुभव, आमचे कौशल्य आणि आमची संसाधने संपूर्ण मानवतेबरोबर सामायिक करत राहणार आहोत. 

मित्रांनो!

यावर्षी रायसीना संवाद कार्यक्रमामध्‍ये आपण सर्वजण आभासी माध्‍यमातून एकत्र येत आहोत.  मी आपल्या सर्वांना मानवतेसाठी केंद्रीत दृष्टीकोनासाठी एक शक्तिशाली आवाज बनून उदयास येण्याचे आवाहन करतो. जसे की, ‘प्लॅन ए’ आणि ‘प्लॅन बी’ वापरण्याची सवय असताना इतर काहीही सांगितले जात नाही, तेथे ‘प्लॅनेट बी’ नाही तर फक्त पृथ्वी ग्रह आहे.  आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपण या  ग्रहाचे  आपल्या भविष्यातील पिढ्यांसाठी फक्त विश्वस्त आहोत. 
पृथ्‍वीचे विश्‍वस्त असल्याचा विचार मी मांडला आहे. आता त्याविषयी  आपण  पुढच्या काही दिवसांमध्ये जो काही विचार करणार आहात, जी काही चर्चा होणार आहे ती,  आपल्या सर्वासाठी अतिशय फलदायी चर्चा व्हावी. या भाषणा अखेर जे या विचारांमध्ये आपलाही आवाज मिसळत आहेत, त्या  सर्व मान्यवरांचे आभार मी मानू इच्छितो. या संवादाच्या या सत्रामध्ये ज्यांची मौल्यवान उपस्थिती आहे, असे रवांडाचे अध्यक्ष आणि डेन्मार्कचे पंतप्रधान यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो. माझे मित्र ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष यांचेही आभार मानण्याची इच्छा आहे, हे मान्यवर नंतर या चर्चेत सामील होणार आहेत.
अखेर,  सर्व संघटनांविषयी खूप कृतज्ञता व्यक्त करतो  आणि त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन  करतो. अनेक प्रकारची आव्हाने असतानाही त्यांनी यंदाच्या रायसीना संवादात सर्वांनाएकत्र आणण्‍याचे विलक्षण काम केले आहे.
आभार. खूप खूप धन्यवाद. 

***

S.Thakur/S.Bedekar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1711664) Visitor Counter : 277