पंतप्रधान कार्यालय
लसीकरण उत्सवाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश
Posted On:
11 APR 2021 4:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 एप्रिल 2021
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आज 11 एप्रिल, जोतिबा फुले जयंतीपासून आपण देशबांधव 'लसीकरण उत्सवाची सुरुवात करत आहोत. हा ‘लसीकरण उत्सव’ 14 एप्रिल म्हणजेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत सुरु राहाणार आहे.
हा उत्सव, एक प्रकारे कोरोना विरोधातल्या दुसऱ्या मोठ्या लढाईची सुरुवात आहे. यात आपल्याला वैयक्तीक स्वच्छतेसोबतच सामाजिक अर्थात समूह पातळीवरच्या स्वच्छतेवर विशेष भर द्यायचा आहे.
आपण चार मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत.
प्रत्येकाचे लसीकरण- म्हणजे जे कमी शिकलेले आहेत, वयस्कर आहेत, जे स्वतः जाऊन लस घेऊ शकत नाहीत, त्यांची मदत करा.
प्रत्येकाने -प्रत्येकाला उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत- म्हणजे ज्या लोकांकडे पुरेशी संसाधने नाहीत, माहितीही कमी आहे, कोरोना उपचारासाठी त्यांची मदत करावी.
प्रत्येकाने - प्रत्येकाला वाचविणे- अर्थात, स्वतः मास्क घालून स्वतःला आणि इतरांना देखील सुरक्षित करणे, यावर भर द्यायचा आहे.
आणि चौथे अत्यंत महत्त्वाचे, कोणाला कोरोना झाला तर अशा स्थितीत, छोट्या पातळीवर प्रतिबंधित क्षेत्र (‘मायक्रो कन्टेनमेंट झोन’) निर्माण करण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा. जिथे एक देखील कोरोना रुग्ण आढळला आहे तिथे कुटुंबातील सदस्य, समाजातील लोक यांनी स्वतःच ‘मायक्रो कन्टेनमेंट झोन’ तयार करावा.
भारतासारख्या दाट लोकवस्तीच्या देशात अशी लघु प्रतिबंधित क्षेत्रे हा देखील कोरोना विरोधातल्या लढाईचा महत्वाचा उपाय आहे.
एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला की सजग राहाणे, आणि इतरांची चाचणी करणे अतिशय गरजेचे आहे.
या सोबतच लसीकरणासाठी जे पात्र आहेत त्या सर्वांचे लसीकरण व्हायला हवे. यासाठी समाज आणि प्रशासन या दोघांनीही प्रयत्न करायला हवेत.
एकही लस वाया जाता कामा नये याकडे आपला कटाक्ष हवा. आपल्याला लसीच्या शून्य अपव्ययाच्या दिशेने वाटचाल करायची आहे.
या दरम्यान आपल्याला देशाच्या लसीकरण क्षमतेचा जास्तीतजास्त वापर करायचा आहे. हा देखील आपली क्षमता वाढवण्याचाच एक मार्ग आहे.
मायक्रो कन्टेनमेंट झोनबाबत आपण किती जागरूक आहोत यावर आपले यश अवलंबून आहे.
विनाकारण घराबाहेर न पडण्याने आपल्याला यश मिळू शकेल.
लसीकरणासाठी पात्र अशा प्रत्येकाला लस मिळणे यावर आपले यश अवलंबून आहे.
मास्कचा वापर आणि इतर नियमांचे पालन कसे करतो यावर आपले यश अवलंबून आहे.
मित्रांनो,
या चार दिवसांत वैयक्तीक पातळीवर, सामजिक आणि प्रशासनाच्या पातळीवर आपल्याला लक्ष्य निर्धारित करायचे आहेत, आणि ते साध्य करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करायचे आहेत.
मला पूर्ण विश्वास आहे की, या प्रकारे लोकसहभागातून, जागरुक राहून, आपली जबाबदारी पार पाडत, आपण पुन्हा एकदा कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होऊ.
लक्षात ठेवा - दवाई भी, कड़ाई भी।
अर्थात, उपचारही आणि अनुशासनही
धन्यवाद !
आपला,
नरेन्द्र मोदी.
* * *
R.Aghor/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1711023)
Visitor Counter : 336
Read this release in:
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
English
,
Manipuri
,
Punjabi
,
Malayalam