आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

गेल्या 24 तासांत लसींच्या 33 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या, एकूण लसीकरणाचे प्रमाण 8.7 कोटींच्या पुढे

Posted On: 07 APR 2021 11:46AM by PIB Mumbai

देशभरात दिल्या जात असलेल्या कोविड 19 प्रतिबंधक लसींच्या मात्रांची  एकूण संख्या आज 8.70  कोटीच्या पुढे गेली आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार 13,32,130 सत्रांद्वारे एकूण 8,70,77,474 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

लक्षणीय कामगिरीची नोंद करत  भारताने दररोज सरासरी 30,93,861 लसीच्या मात्रा देऊन  जगातील सर्वात वेगवान लसीकरण करणारा देश बनताना   अमेरिकेला मागे टाकले आहे.

भारताच्या दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या  24 तासांत 1,15,736 नवे रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, मध्य प्रदेश आणि गुजरात या आठ राज्यांत कोविडच्या दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत  मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नवीन रुग्णांपैकी 80.70 टक्के रुग्ण  या 8 राज्यांमधील  आहेत.

महाराष्ट्रात काल दिवसभरात सर्वाधिक 55,469 रुग्ण आढळले. त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये 9,921 तर कर्नाटकमध्ये 6,150 नवे रुग्ण आढळले.

भारताची  एकूण सक्रिय रुग्णसंख्या 8,43,473. वर पोहोचली आहे. ती आता देशातील एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 6.59 टक्के आहे. गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय रुग्णसंख्येत 55,250 रुग्णांची वाढ झाली आहे.

देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी  56.17 टक्के रुग्ण  एकट्या महाराष्ट्रात आहेत .

दैनंदिन नवीन रुग्णसंख्या वाढत असलेल्या आणि सक्रिय रुग्णांची संख्या जास्त असलेल्या  सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशच्या  सरकारांबरोबर केंद्र सरकार सक्रियपणे काम करत आहे.  देशातील कोविड 19 महामारी आणि लसीकरण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी 4 एप्रिल 2021 रोजी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली  काल कोविड -19 परिस्थिती आणि दैनंदिन नवे रुग्ण आणि मृत्यूंची संख्या वाढत असलेल्या 11  राज्य/केंद्रशासित प्रदेशांमधील लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्याबाबत एक उच्च स्तरीय बैठक झाली.  कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (2 एप्रिल 2021) सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि आरोग्य सचिवांसमवेत एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली , ज्यामध्ये गेल्या दोन आठवड्यात दैनंदिन रुग्णसंख्येत आणि मृत्यूमध्ये  मोठी  वाढ नोंदविणाऱ्या  11 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांवर लक्ष केंद्रित केले गेले . 

देशातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज 1,17,92,135 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर  92.11 % आहे.

गेल्या 24 तासात 59,856  रुग्ण बरे झाले

खाली दिलेल्या आलेखात भारतातील सक्रिय रुग्ण आणि बरे झालेल्या रुग्णांची सद्यस्थिती दर्शवली आहे.

गेल्या 24 तासांत 630  मृत्यूची  नोंद झाली.  महाराष्ट्रात काल सर्वाधिक 297  मृत्यूंची नोंद झाली आहे.

***

MC/SK/CY

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1710059) Visitor Counter : 236