राष्ट्रपती कार्यालय
चार देशांच्या राजदूतांनी त्यांची नियुक्तीपत्रे दूरदृश्य प्रणालीद्वारे भारताच्या राष्ट्रपतींकडे केली सादर
प्रविष्टि तिथि:
18 MAR 2021 3:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मार्च 2021
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या कार्यक्रमात, फिजी प्रजासत्ताक, डॉमनिकन प्रजासत्ताक, अफगाणिस्तान आणि गयाना सहकारी प्रजासत्ताक या चार देशांच्या राजदूतांकडून/ उच्चायुक्तांकडून त्यांची नियुक्तीपत्रे स्वीकारली. या प्रसंगी खालील अधिकाऱ्यांनी त्यांची नियुक्तीपत्रे सादर केली:
- माननीय कमलेश शशी प्रकाश, फिजी प्रजासत्ताकाचे उच्चायुक्त
- माननीय डेव्हिड ईमन्युएल पुईग बुचेल, डॉमनिकन प्रजासत्ताकाचे राजदूत
- माननीय फरीद मामून्दझाय, अफगाणिस्तान इस्लामिक प्रजासत्ताकाचे राजदूत
- माननीय चरणदास परसौद, गयाना सहकारी प्रजासत्ताकाचे उच्चायुक्त
या प्रसंगी बोलताना, राष्ट्रपतींनी या राजदूतांच्या नियुक्तीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. या चारही देशांशी भारताचे अत्यंत सौहार्दपूर्ण आणि मैत्रीचे संबंध आहेत आणि या देशांशी असलेले भारताचे नाते शांती आणि समृद्धीच्या समान ध्येयासह खोलवर रुजलेले आहे असे ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अस्थायी स्थान मिळावे यासाठी भारताच्या उमेदवारीला या चारही देशांनी दिलेल्या पाठींब्याबद्दल राष्ट्रपतींनी या देशांच्या सरकारांचे आभार मानले.
सर्वांचे सामुदायिक आरोग्य आणि आर्थिक स्वास्थ्य सुनिश्चित करण्यासाठी कोविड -19 आपत्तीला निर्णायक आणि समन्वित प्रतिसाद देण्याच्या जागतिक पातळीवरील प्रयत्नांमध्ये भारत प्रत्येक टप्प्यावर आघाडीवर राहिला आहे याचा राष्ट्रपतींनी उल्लेख केला. भारत सरकारच्या “लसीद्वारे मैत्री” या उपक्रमाअंतर्गत, भारतात तयार झालेली आणि अत्यंत किफायतशीर दरातील लस अनेक देशांमध्ये याआधीच पोहोचली आहे आणि यातून भारताने “जगाची औषधशाळा” म्हणून मिळविलेला नावलौकिक सार्थ ठरविला आहे असे ते पुढे म्हणाले.
उपस्थित राजदूत आणि उच्चायुक्तांनी उत्तरादाखल बोलताना त्या त्या देशांचे भारताशी असलेले उत्तम नातेसंबंध अधोरेखित करत हे नाते भविष्यात अधिकाधिक दृढ करण्याचा त्या सर्व संबंधित देशांच्या नेतृत्वाचा निश्चय व्यक्त केला. विकासप्रक्रियेत सतत देत असलेल्या मदतीसाठी आणि अनेक क्षेत्रांतील क्षमता बांधणीसाठीच्या पाठबळासाठी सर्व राजदूत/ उच्चायुक्तांनी भारत सरकारचे आभार देखील मानले.
मानवतावादी दृष्टीकोनातून या देशांना कोविड-19 विरोधी लसीचा पुरवठा केल्याबद्दल त्यांनी भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
* * *
Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1705792)
आगंतुक पटल : 189