माहिती आणि प्रसारण मंत्रालय

आपल्याला येत्या 25 वर्षांत काय साध्य करायचे आहे याची संकल्पना स्पष्ट करण्याची वेळ आली आहे : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, दिल्लीसह सात ठिकाणच्या प्रदर्शनांचे जावडेकर यांनी केले उद्घाटन

Posted On: 13 MAR 2021 3:56PM by PIB Mumbai

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्ली येथील राष्ट्रीय माध्यम केंद्रात छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले. केंद्र सरकारच्या क्षेत्रीय लोकसंपर्क विभागाने आयोजित केलेले हे प्रदर्शन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मोठ्या प्रमाणावर सुरु केलेल्या जनजागृती अभियानाचा एक भाग आहे.

या प्रसंगी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना जावडेकर म्हणाले की, स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत आपण कुठपर्यंत येऊन पोहोचलो आहोत आणि येत्या 25 वर्षांत आपल्याला काय साध्य करायचे आहे याची संकल्पना स्पष्ट करण्याच्या दृष्टीने देशासाठी हाच महत्त्वाचा  क्षण होता. या प्रदर्शनांमधून हाच विश्वास व्यक्त होत आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देशाला फार मोठी किंमत चुकवावी लागली आणि या प्रदर्शनांतील छायाचित्र या सर्व त्यागांची कहाणी सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत असे ते म्हणाले.

Effective exhibitions set up by @BOC_MIB across the country will educate the populace on the ethos of freedom struggle and envision our path for next 25 years. Inaugurated 7 such exhibitions today. I invite people to visit these venues and leave with a piece of history with them. pic.twitter.com/Undtqcsjb4

— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) March 13, 2021

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/v11.mp4

स्वातंत्र्यलढ्यात सक्रियतेने सहभागी झालेल्या लोकांचे प्रयत्न आणि परिश्रम यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे कार्य केंद्रीय गृह  मंत्रालयाने प्रत्येक मंत्रालयाकडे सोपविले आहे असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी यावेळी सांगितले. या सर्व प्रदर्शनांच्या डिजिटल आवृत्त्या तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून येत्या 15 ऑगस्टपूर्वी त्यांचे अनावरण अपेक्षित आहे अशी माहिती खरे यांनी दिली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/v12.mp4

केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी पुणे, सांबा (जम्मू आणि काश्मीर, बेंगलुरू (कर्नाटक)भुवनेश्वर (ओदिशा), मोईरंग (मणिपूर) आणि पाटणा (बिहार) या सहा ठिकाणच्या फोटो प्रदर्शनांचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले.

पुण्यातील प्रदर्शन आगा खान पॅलेसमध्ये भरविण्यात आले आहे. महात्मा गांधी, त्यांच्या पत्नी कस्तुरबा, गांधीजींचे सचिव महादेव देसाई तसेच थोर स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांना या जागी कारावासात ठेवण्यात आले होते. त्यामुळे या जागेला स्वातंत्र्य संग्रामात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

जम्मूमधील सांबा येथील प्रदर्शन ब्रिगेडियर राजेंद्र सिंग यांचे जन्मस्थान असलेल्या ब्रिगेडियर राजेंद्र सिंग पुरा बगुना येथे भरविण्यात आले आहे. ब्रिगेडियर राजेंद्र सिंग यांना काश्मीरचा रक्षणकर्ताम्हटले जाते. कारण त्यांनी आणि त्यांच्या सैनिकांनी पाकिस्तानातील आदिवासी जमातींनी ऑक्टोबर 1947 मध्ये श्रीनगरवर केलेला हल्ला एकहाती परतवून लावला, भारतीय सैन्य येईपर्यंत हल्लेखोरांना रोखून धरले आणि या कारवाईत आपले प्राण समर्पित केले. त्यांना 30 ऑक्टोबर 1949 ला स्वतंत्र भारताचे पहिले महावीर चक्र (मरणोत्तर) देऊन गौरविण्यात आले.

बेंगलुरूमध्ये प्रादेशिक क्षेत्रीय लोकसंपर्क विभागाने कोरमांगलाच्या केंद्रीय सदनात फोटो प्रदर्शन आयोजित केले आहे. स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित राष्ट्रीय उच्च माध्यमिक शाळेचे मैदान, गांधी भवन, बन्नाप्पा बगीचा, स्वातंत्र्य पार्क आणि यशवंतपुरा रेल्वे स्थानक अशी अनेक ठिकाणे बेंगलुरूमध्ये आहेत. बेंगलुरू मधील प्रदर्शनात राष्ट्रीय पातळीवरील स्वातंत्र्यसैनिकांसोबतच स्थानिक पातळीवरील स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचे देखील महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

भुवनेश्वरच्या प्रादेशिक क्षेत्रीय लोकसंपर्क विभागाने खोरडा जिल्ह्यात फोटो प्रदर्शन भरविले आहे. या जिल्ह्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे जन्मस्थान असल्याने याला ऐतिहासिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. ओदिशामधील स्वातंत्र्यसैनिकांचे स्वातंत्र्यचळवळीतील योगदान अधोरेखित करणारी तावदाने या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मोईरँग ही जागा अत्यंत महत्त्वाची आहे कारण याच ठिकाणी 14 एप्रिल 1944 ला आयएनए अर्थात भारतीय राष्ट्र सेनेचा झेंडा प्रथम फडकविण्यात आला होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून येथे भरविण्यात आलेले फोटो प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे. विष्णुपुर जिल्ह्यात मोईरँग येथे भरविण्यात आलेल्या या फोटो प्रदर्शनाच्या आभासी पद्धतीने झालेल्या उद्घाटनाला लोक सभा सदस्य डॉ.आर. के. रंजन आणि विष्णूपुरच्या राज्य कला आणि संस्कृती विभागाचे तसच जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. असहकार चळवळ, सरकारी आज्ञाभंग, भारत छोडो चळवळीसह दांडी यात्रेसारख्या प्रमुख घटना तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल या आणि इतर  महान नेत्यांचे कार्य दर्शविणारे फोटो या प्रदर्शनात लावण्यात आले आहेत. यावेळी विविध क्रीडाविषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

पाटणा येथील प्रदर्शन अनुग्रह नारायण महाविद्यालयाने आयोजित केले असून त्यात बिहारच्या स्वातंत्र्यसैनिकांचे महत्त्वाचे कार्य अधोरेखित करण्यात आले आहे. गांधीजींच्या चम्पारण सत्याग्रहादरम्यान महत्त्वाची भूमिका बजावणारे  बिहारचे  प्रमुख स्वातंत्र्य सैनिक अनुग्रह नारायण सिंग यांचे नाव या महाविद्यालयाला देण्यात आले आहे. येथील प्रदर्शनात स्वातंत्र्य सैनिकांची काही दुर्मिळ दृश्ये एलईडी टीव्ही वरून दाखविण्यात येत आहेत.

या फोटो प्रदर्शनांमध्ये महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, चक्रवर्ती राजगोपालाचारी, बाळ गंगाधर टिळक, बिपीन चंद्र पाल, लाला लजपतराय यांच्यासारखे स्वातंत्र्य चळवळीतील थोर नेते आणि शहीद भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राम प्रसाद बिस्मिल आणि इतर अनेक क्रांतिकारकांचे कार्य आणि समर्पण यांचे दर्शन घडविण्यात आले आहे.

***

S.Thakur/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1704616) Visitor Counter : 227