पंतप्रधान कार्यालय
‘आजादी का अमृत महोत्सव’ India@75 साठीच्या कार्यक्रमांचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन
आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे भारताला सदैव स्मरण : पंतप्रधान
प्रकाश झोतापासून दूर राहिलेल्या नायकांचा इतिहास जपण्याचा गेल्या सहा वर्षापासून जाणीवपूर्वक प्रयत्न : पंतप्रधान
आपले संविधान आणि लोकशाही परंपरेचा आम्हाला अभिमान : पंतप्रधान
Posted On:
12 MAR 2021 5:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मार्च 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथे साबरमती आश्रमातून पदयात्रेला ( स्वातंत्र्य यात्रा) हिरवा झेंडा दाखवला. ‘आजादी का अमृत महोत्सव’ India@75 साठीच्या कार्यक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. India@75 साठी विविध सांस्कृतिक आणि डिजिटल उपक्रमांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमांची मालिका आयोजित केली आहे. जन - सहकार्याच्या भावनेतून जन - उत्सव म्हणून हा महोत्सव साजरा केला जाईल.
साबरमती आश्रम इथे उपस्थिताना संबोधित करताना ‘आजादी का अमृत महोत्सव’ या 15 ऑगस्ट 2022 पूर्वी 75 आठवडे सुरु होणाऱ्या आणि 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरु राहणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांनी केले. स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या महात्मा गांधी आणि महान स्वातंत्र्य सैनिकांना पंतप्रधानांनी आदरांजली अर्पण केली.
स्वप्ने आणि कर्तव्ये यांची पूर्तता करताना प्रेरणा म्हणून स्वातंत्र्य लढा, 75 साठी कल्पना, 75 साठी कामगिरी, 75 साठी कृती, 75 साठी संकल्प या पाच स्तंभाचा मार्गदर्शक म्हणून त्यांनी पुनरुच्चार केला.
आजादी का अमृत महोत्सव म्हणजे स्वातंत्र्याच्या उर्जेचे अमृत, स्वातंत्र्य लढ्याच्या योद्ध्यांच्या स्फूर्तीचे , नव कल्पना आणि आत्मनिर्भरता आणि नव संकल्पांचे अमृत असे पंतप्रधानानी सांगितले.
मीठ या प्रतिकाविषयी बोलताना, मीठ हे केवळ मूल्याच्या आधारावर कधीच जोखले गेले नाही, भारतीयांसाठी मीठ म्हणजे प्रामाणिकता,विश्वास,निष्ठा,श्रम,समानता आणि आत्मनिर्भरता यांचे प्रतिक असल्याचे ते म्हणाले. त्या काळात मीठ हे भारतीयांच्या आत्म निर्भरतेचे प्रतिक होते.भारताच्या मुल्यांबरोबरच ब्रिटिशांनी स्वयं पूर्णतेची ही भावनाही दुखावल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारतीय जनतेला इंग्लंडहून येणाऱ्या मिठावर अवलंबून राहावे लागत असे. गांधीजीनी देशाची ही जुनी वेदना जाणली, जनतेच्या भावना जाणल्या आणि याचे चळवळीत रुपांतर झाले.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठीची 1857 ची पहिली लढाई, महात्मा गांधीजींचे परदेशातून आगमन, सत्याग्रहाच्या सामर्थ्याचे देशाला स्मरण, संपूर्ण स्वराज्याची लोकमान्य टिळक यांनी दिलेली हाक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेचा दिल्ली मार्च आणि चलो दिल्ली ही घोषणा यासारख्या स्वातंत्र्य लढ्यातल्या महत्वाच्या घटनांचे स्मरण पंतप्रधानांनी केले.स्वतंत्र्य लढ्याची ही ज्योत, प्रत्येक दिशेने, प्रत्येक भागात सातत्याने धगधगती ठेवण्याचे कार्य देशातल्या आचार्य,संत आणि शिक्षकांनी केले.भक्ती चळवळीने स्वातंत्र्य आंदोलनासाठी देशव्यापी पाया सज्ज केला. चैतन्य महाप्रभू,रामकृष्ण परमहंस,श्रीमंत शंकर देव यासारख्या संतानी देशभरात स्वातंत्र्यलढ्यासाठी भक्कम पाया घातला. अशाच प्रकारे देशाच्या कानाकोपऱ्यातल्या संतानी देशाच्या जाणीवा जागृत करण्यासाठी योगदान दिले. कार्य केले. देशभरातल्या अगणित दलित,आदिवासी, महिला आणि युवकानी बलिदान दिले. तामिळनाडूमधल्या कोडी कथा कुमारन या 32 वर्षाच्या युवकाचा उल्लेख त्यांनी केला. ब्रिटीशांची गोळी लागूनही देशाचा ध्वज जमिनीवर पडू न देणाऱ्या कुमारन यांच्यासारख्या प्रकाशझोतात न आलेल्या नायकांचा त्यांनी उल्लेख केला. तामिळनाडूच्या वेलू नचीयार या ब्रिटीश राजवटीविरोधात लढा देणाऱ्या पहिल्या महाराणी होत्या.
आपल्या देशातल्या आदिवासी समाजाने आपले शौर्य आणि साहसाने परकीय राजवटीला सातत्याने जेरीला आणले. झारखंडमध्ये बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांना आव्हान दिले आणि मुर्मू बंधूनी संथाल चळवळीचा पाया घातला. ओडिशा मध्ये चक्र बिसोई यांनी ब्रिटिशांविरोधात लढा उभारला आणि लक्ष्मण नायक यांनी गांधीवादी पद्धतीने जागृती केली. प्रसिद्धीपासून दूर असलेल्या आंध्रप्रदेशच्या मन्यम विरूधू अलुरी सिराराम राजू यासारख्या नायकांचा त्यांनी उल्लेख केला. राजू यांनी रामपा चळवळीचा पाया घातला. देशाच्या लढ्यात योगदान देणारे, ब्रिटिशांविरोधात उभे राहणारे पासल्था खुंगचेरा, आसाम आणि ईशान्येकडच्या गोमधर कोनवर, लाचीत बोरफुकन, सेरात सिंग यांच्या योगदानाचा उल्लेखही त्यांनी केला. गुजरातमधल्या जंबूघोडा मध्ये नायक जमातीचे बलिदान, मानगड इथले शेकडो आदिवासींचे शिरकाण देश सदैव स्मरणात ठेवेल असे पंतप्रधान म्हणाले.
प्रत्येक राज्यातला प्रत्येक प्रांतातला हा इतिहास जतन करण्याचे गेली सहा वर्षे जाणीवपूर्वक काम देश करत आहे. दांडी यात्रेशी संबंधित स्थळांच्या पुनरुज्जीवनाचे काम दोन वर्षापूर्वी पूर्ण झाले. देशाचे पहिले स्वतंत्र सरकार स्थापन केल्यानंतर नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी अंदमान मध्ये तिरंगा फडकवला त्या स्थळाचेही पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडीत ठिकाणांचा पंचतीर्थ म्हणून विकास करण्यात आला तर जालियानवाला बाग स्मारकाचा विकास करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या कठोर परिश्रमाने आपण भारतात आणि भारताबाहेरही आपल्याला सिद्ध केल्याचे पंतप्रधान म्हणाले. आपले संविधान आणि लोकशाही परंपरेचा आपल्याला आभिमान आहे. लोकशाहीची माता असलेला भारत आपली लोकशाही अधिक बळकट करत आगेकूच करत आहे. भरतची कामगिरी आणि यश संपूर्ण मानवतेसाठी आशा दायी आहे. भारताच्या विकासाचा प्रवास हा आत्मनिर्भरतेवर आधारित असून संपूर्ण जगाच्या विकासाला गती देणारा असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या इतिहासाचे दस्तावेजीकरण करण्यासाठीचे देशाचे प्रयत्न पूर्णत्वाला नेण्यासाठी युवा आणि विद्वानानी जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वातंत्र्य लढ्यातली कामगिरी जगासमोर मांडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. आपल्या इतिहासातल्या अनोख्या कहाण्या शोधून त्या मांडण्याचे आवाहन त्यांनी कला, साहित्य, चित्रपट जगात आणि डिजिटल माध्यमाशी निगडीत व्यक्तींना केले.
* * *
Jaydevi PS/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1704397)
Visitor Counter : 1272
Read this release in:
Urdu
,
Bengali
,
Odia
,
Telugu
,
Malayalam
,
English
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada