पंतप्रधान कार्यालय
श्रीमद् भगवद्गीतेच्या श्लोकांवर 21 विद्वानांनी केलेली टिपण्णी असलेल्या हस्तलिखितांचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन
Posted On:
09 MAR 2021 9:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीमद् भगवद्गीतेच्या श्लोकांवर 21 विद्वानांनी केलेली टिपण्णी असलेल्या हस्तलिखितांचे प्रकाशन केले. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि जम्मू काश्मीरच्या धर्मार्थ ट्रस्टचे अध्यक्ष विश्वस्त डॉ करण सिंह यावेळी उपस्थित होते.
भारतीय तत्त्वज्ञानासंदर्भात डॉ करण सिंह यांनी केलेल्या कार्याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. त्यांच्या प्रयत्नामुळे, शतकांपासून संपूर्ण भारताच्या वैचारिक परंपरेची धुरा वाहणाऱ्या जम्मू काश्मीरची ओळख पुनरुज्जीवित झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. हजारो विद्वानांनी गीतेचा सखोल अभ्यास करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. एका ग्रंथाच्या प्रत्येक श्लोकाच्या भिन्न-भिन्न व्याख्या, यातून गीतेच्या अथांगतेची प्रचीती येते. हे भारताच्या वैचारिक स्वातंत्र्य आणि सहिष्णूतेचे प्रतिक असून प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा दृष्टीकोन ठेवण्यासाठी ते प्रोत्साहित करते असे त्यांनी सांगितले.
भारताला एकतेच्या सूत्रात बांधणाऱ्या आदी शंकराचार्यानी गीता म्हणजे आध्यात्मिक जाणीव या दृष्टीकोनातून पाहिले. रामानुजाचार्य यांच्यासारख्या संतानी गीता म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाची अभिव्यक्ती मानली. स्वामी विवेकानंदासाठी गीता म्हणजे अतूट कर्मनिष्ठा आणि अजोड आत्मविश्वास यांचा स्त्रोत राहिली. श्री अरबिंदो यांच्यासाठी गीता म्हणजे ज्ञान आणि मानवता यांचे प्रतिरूप होते. महात्मा गांधींसाठी गीता म्हणजे अनेक कठीण काळात पथदर्शक होती. नेताजी सुभाष चंद्र बोस यांची देशभक्ती आणि पराक्रम यांचे स्फूर्तीस्थान गीता होती. या गीतेचा अर्थ बाळ गंगाधर टिळक यांनी उलगडला आणि स्वातंत्र्य लढ्याला नवे सामर्थ्य दिले.
आपल्या लोकशाहीने आपल्याला विचार स्वातंत्र्य, कामाचे स्वातंत्र्य, आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात समान अधिकार प्रदान केले आहेत. हे स्वातंत्र्य लोकशाही संस्थांमधून आले आहे, ज्या आपल्या राज्य घटनेच्या रक्षक आहेत. म्हणूनच आपण जेव्हा आपल्या हक्काबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला आपल्या लोकशाही कर्तव्यांचेही स्मरण असले पाहिजे असे पंतप्रधान म्हणाले.
गीता ही संपूर्ण जगासाठी आणि प्रत्येक प्राणीमात्रासाठी आहे. अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये गीतेचा अनुवाद झाला आहे.अनेक देशात अनेक आंतरराष्ट्रीय विद्वान यावर संशोधन करत आहेत.
आपल्याकडचे ज्ञान इतरांनाही देणे ही भारतीय संस्कृती आहे. गणित, वस्त्रोद्योग, धातुशास्त्र आणि आयुर्वेद याबाबतचे आपले ज्ञान नेहमीच मानवी संपत्ती म्हणून पाहिले गेले आहे. जगाच्या विकासासाठी आणि मानवतेच्या सेवेसाठी योगदान देण्याकरिता आज भारत पुन्हा एकदा आपल्या क्षमता उभारत आहे. भारताचे योगदान अवघ्या जगाने नुकतेच पाहिले. हे योगदान आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठीच्या प्रयत्नात जगाला मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरेल असे पंतप्रधान म्हणाले.
M.Chopade/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1703634)
Visitor Counter : 215
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam