पंतप्रधान कार्यालय

‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी राष्ट्रीय समिती समोर पंतप्रधानांचे अभिभाषण

Posted On: 08 MAR 2021 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 मार्च 2021

नमस्कार!

भारताच्या स्वातंत्र्याला आता लवकरच 75 वर्षे होतील, आपण सर्व त्या दिवसाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत. हे वर्ष जितके ऐतिहासिक, गौरवपूर्ण, देशासाठी जितके महत्वपूर्ण आहे, देशदेखील तितक्याच भव्यतेने आणि उत्साहाने हे वर्ष साजरे करेल.

हा अमृत महोत्सव साजरा करण्याची जबाबदारी देशाने आपल्या सगळ्यांवर सोपविली आहे हे आमचे भाग्य आहे.  या महोत्सावाबाबत ज्या आशा-अपेक्षा आहेत, ज्या सूचना येत आहेत त्या सर्व आशा-अपेक्षा आणि सूचना पूर्ण करण्यासाठी ही समिती अथक परिश्रम करेल आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना कोणतीही कमतरता ठेवणार नाही. सतत नवीन कल्पना, नवीन सूचना, जनतेला पुन्हा एकदा देशासाठी जगण्यासाठी प्रेरित करणे, या संधीचे कसे सोने करायचे या सगळ्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करत राहाल. आपल्याला आताही काही सन्माननीय सदस्यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले. आज एक सुरुवात आहे. आपण पुढे यावर तपशीलवार चर्चा करू. आपल्याकडे अजून 75 आठवडे आणि नंतर संपूर्ण वर्ष आहे. म्हणून जेव्हा आपण या सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ, तेव्हा या सूचना खूप महत्त्वपूर्ण असतात.

आपला अनुभव या सूचनांमधूनही दिसून येतो आणि भारताच्या विविध विचारांसोबत असणारी तुमची  कनेक्टिव्हिटी देखील दिसते. इथे आता आमच्या समोर स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या पार्श्वभूमीवर एक सादरीकरण केले गेले. एक प्रकारे विचारांच्या प्रवाहाला वेग देणे हे त्याचे काम आहे. अमुक एका गोष्टीची अंमलबजावणी करायची आहे आणि त्यापुरतेच मर्यादित राहायचे आहे अशी कोणतीही यादी नाही. एक-एक मोघम विचार प्राथमिक आहे कारण कुठूनतरी सुरुवात करण्याची आवश्यकता आहे, हळूहळू जशी यावर चर्चा होईल याला एका कार्यक्रमाचे स्वरूप प्राप्त होईल, वेळ निश्चित केली जाईल, वेळापत्रक तयार केले जाईल. कोण कोणती जबाबदारी पार पाडेल, ती कशी पार पडेल, या सर्व गोष्टींकडे आपण सविस्तरपणे पाहू. आता जे सादरीकरण केले त्यामध्ये देखील मागील काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या मंचांमध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्या गोष्टी समाविष्ट करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाचे आयोजन, स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव हा भारतातील प्रत्येक देशातील प्रत्येक व्यक्तीचा, भारतातील प्रत्येकाच्या मनाचा हा उत्सव असावा यासाठी हा प्रयत्न आहे. .

मित्रांनो,

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा हा उत्सव, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे आयोजन अशाप्रकारे केले पाहिजे की  स्वातंत्र्य लढ्याची भावना, त्यामागील त्याग हे सगळे अनुभवता आले पाहिजे. ज्यात देशातील हुतात्म्यांना श्रद्धांजली देखील वाहिली जाईल आणि त्यांच्या स्वप्नांमधील भारत घडविण्याचा संकल्पही असावा. ज्यामध्ये सनातन भारतच्या वैभवाची झलक देखील असावी आणि आधुनिक भारताची चमक देखील असावी. ज्यामध्ये अध्यात्माचा प्रकाश देखील असेल आणि आपल्या शास्त्रज्ञांची प्रतिभा आणि सामर्थ्य देखील दिसून येईल. हा कार्यक्रम, 75 वर्षातील आपली कामगिरी संपूर्ण जगासमोर सादर करण्याची आणि पुढील 25 वर्षांसाठी एक आराखडा, एक संकल्प घ्यायची संधी देखील प्रदान करेल.   कारण 2047 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याचे शतक साजरे करेल, तेव्हा आपण कुठे असू, जगात आपले स्थान काय असेल, आपण भारताला कुठवर घेऊन जाऊ आणि स्वातंत्र्याची 75 वर्षे आणि स्वातंत्र्य लढा आपल्याला प्रेरणा देईल. एक मंचाची स्थापना केली जाईल आणि या मंचाच्या आधारे स्वातंत्र्याची 75 वर्षे भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीसाठी, त्या दिशेने पुढे जाण्यासाठी आमच्यासाठी दिशादर्शक  प्रेरणादायक आणि प्रयत्नांची भावना जागृत करणारा असावा.

मित्रांनो,

आपल्या येथे असे म्हटले जाते की-‘उत्सवेन बिना यस्मात् स्थापनम् निष्फलम् भवेत् अर्थात कोणताही प्रयत्न, कोणताही संकल्प हा उत्सवा शिवाय यशस्वी होत नाही. जेव्हा एखादा संकल्प उत्सवाचे रूप धारण करतो तेव्हा त्यात लाखो कोटी लोकांचे संकल्प जोडले जातात, लाखो, कोट्यावधी लोकांची ऊर्जा त्यात जोडली जाते. याच भावनेने आपल्याला 130 कोटी देशवासीयांना सोबत घेऊन हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा हा उत्सव साजरा करायचा आहे. लोकसहभाग ही या कार्यक्रमाची मूळ  भावना आहे. आणि जेव्हा आपण लोकसहभागाविषयी बोलतो तेव्हा त्यात 130 कोटी देशवासियांची भावना, त्यांची मते आणि सूचना आणि त्यांची स्वप्नेही असतात.

मित्रांनो,

जसे की तुम्हा सर्वांनाच माहित आहे कीस्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी अनेक विचार/कल्पना समोर आल्या होत्या त्या सर्व एकत्र करून जी एक मोघम रूपरेषा तयार झाली होती तिला आपण 5 स्तंभांमध्ये विभागू शकतो. एक म्हणजे स्वातंत्र्य लढा, 75 वर्षांच्या कल्पना, 75 वर्षातील कामगिरी, 75 वर्षातील विविध कामे आणि 75 संकल्प हे ते स्तंभ आहेत - या पाच स्तंभांच्या आधारे आपल्याला पुढे जायचे आहे. या सर्वांमध्ये देशातील 130 कोटी लोकांच्या कल्पना, भावनांचा समावेश असला पाहिजे.  स्वातंत्र्यलढ्यातील ज्या सैनिकांना आपण ओळखतो त्यांना आम्ही श्रद्धांजली अपर्ण करूपरंतु असेही काही स्वातंत्र्य सैनिक होते ज्यांना इतिहासात स्थान मिळाले नाही, ज्यांना योग्य ओळख प्राप्त झाली नाही, त्यांची जीवनागाथा देखील आपल्याला जनसामान्यांपर्यंत पोहोचवायची आहे. आपल्या देशात क्वचितच असे स्थान किंवा देशाचा एखादा कोपरा असेल जिथल्या भारत मातेच्या मुलांनी आणि मुलींनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले नसेल, बलिदान दिले नसेल. या सर्वांचे बलिदान आणि त्यांच्या योगदानाच्या प्रेरणादायक कथा जेव्हा संपूर्ण देशासमोर येतील तेव्हा त्या प्रेरणेचे खूप मोठे स्रोत असतील. त्याचप्रमाणे आपल्याला  देशातील कानाकोपऱ्यातून, प्रत्येक वर्गातील योगदान देशासमोर आणले पाहिजे. पिढ्यान् पिढ्या देश व समाजासाठी काहीतरी महान कार्य करणारे असे अनेक लोक आहेत. आम्हाला त्याची विचारसरणी, त्याच्या कल्पना देखील आम्हाला संपूर्ण देशासमोर आणायच्या आहेत. देशाला त्यांच्या प्रयत्नांशी जोडायचे आहे. ही देखील अमृत महोत्सवाची मूळ भावना  आहे.

मित्रांनो,

या ऐतिहासिक उत्सवासाठी देशाने रूपरेषा देखील निश्चित केली आहे. त्याला अधिक समृद्ध करण्याच्या दिशेन आज सुरुवात झाली आहे. काळाच्या ओघात या सर्व योजनांना मूर्त स्वरूप प्राप्त होईल, अधिक प्रभावी होतील आणि या प्रेरणादायक तर नक्कीच असतील जेणेकरून आपली सध्याची पिढी, ज्यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरण्याची संधी मिळाली नाही परंतु आपल्या सगळ्यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी जगण्याची संधी मिळाली आहे. आपल्याला देशासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली आहे. आणि हीच भावना आपल्या भावी पिढ्यांमध्ये देखील रुजली पाहिजे कारण जेव्हा 2047 मध्ये जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा आपण आपल्या देशासाठी जे स्थान निर्धारित केले आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी संपूर्ण देश प्रयत्न करेल. देशातील नवीन निर्णय, नवीन कल्पना, आत्मनिर्भर भारत यासारखे संकल्प या प्रयत्नांचे मूर्त स्वरूप आहेत. स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्ण करण्याचा हा प्रयत्न आहे, भारताला एका उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी अनेक शूर-वीर फासावर चढले, आपले संपूर्ण जीवन कारागृहात घालवले.

मित्रांनो,

काही वर्षापूर्वी कल्पनेच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी आज भारत करत आहे.  75 वर्षांच्या प्रवासात एक एक पाऊल पुढे टाकत आज देश इथे पोहोचला आहे. 75 वर्षात, अनेक लोकांचे योगदान आहे, सर्व प्रकारच्या लोकांनी योगदान दिले आहे. आणि एखाद्याच्या योगदानाकडे दुर्लक्ष करून देश मोठा होत नाही. प्रत्येकाचे योगदान स्वीकारून, त्यांचे स्वागत करून, सन्मान करून पुढे मार्गक्रमण करूनच देशाचा विकास होतो. आणि याच मंत्राच्या आधारे आपण मोठे  झालो आहोत, आपल्याला हाच मंत्र घेऊन पुढे जायचे आहे. जेव्हा देश स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरा करेल तेव्हा अशक्य वाटणाऱ्या लक्ष्यपूर्तीसाठी महत्वपूर्ण पावले उचलून देश ते लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करेल.  मला खात्री आहे की तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने हा कार्यक्रम भारताच्या ऐतिहासिक वैभवाला साजेसा  होईल. तुम्ही सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहात, तुमच्या योगदानाने हा कार्यक्रम भारताचा अभिमान संपूर्ण जगासमोर ठेवेल, ऊर्जा मिळेल, प्रेरणा मिळेल, दिशा मिळेल. तुमचे योगदान खूप मोलाचे आहे.

इतकेच बोलून, मी आपल्या योगदानासाठी आणि आगामी दिवसांमध्ये आपल्या सक्रिय सहभागासाठी आमंत्रित करुन माझे भाषण थांबवितो. मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो.                                           

खूप-खूप धन्यवाद!    

 

 

M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1703338) Visitor Counter : 14288