पंतप्रधान कार्यालय

महिला दिनानिमित्त पंतप्रधानांनी महिला उद्योजकांकडून विविध उत्पादनांची केली खरेदी

Posted On: 08 MAR 2021 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 मार्च 2021

 

आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या विविध स्वयंसहाय्यता गटांकडून आणि महिला उद्योजकांकडून अनेक उत्पादने खरेदी केली. आत्मनिर्भर भारत आणि महिला उद्योजकांना उत्तेजन देण्याचा हा एक प्रयत्न आहे.

भारताच्या आत्मनिर्भर होण्याच्या स्वप्नपूर्तीच्या मार्गातील महिलांच्या भूमिकेबद्दल बोलताना मोदी यांनी ट्वीट करून सांगितले की, भारताचे आत्मनिर्भर होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी देशातील महिला अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपण सर्वांनीच महिलांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिबद्ध होऊ या. आज मी महिलांमधील उद्योजकता, सर्जनशीलता आणि भारतीय संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी काही उत्पादने खरेदी केली.

तामिळनाडूच्या तोडा जमातीमधील कारागीर महिलेने भरतकाम करून तयार केलेली शाल खरेदी केल्यानंतर ते म्हणाले की, तामिळनाडूच्या तोडा जमातीमधील कारागीर महिलेने हाताने उत्कृष्ट भरतकाम करून तयार केलेली ही शाल अत्यंत सुंदर आहे.

मी अशी एक शाल विकत घेतली, ह्या उत्पादनाचे विपणन ट्राईब्स इंडिया या संस्थेने केले आहे.

गोंड जमातीमधील महिलेने हस्तकलेच्या सहाय्याने कागदावर काढलेले चित्र बघून मोदी यांनी परिसराला शोभिवंत करण्यासाठी आणखी काही रंगांची भर! असे ट्वीट केले.

आपल्या आदिवासी समुदायांमध्ये असलेली कला खरोखर नेत्रदीपक आहे. ह्या हस्तकलेने तयार केलेल्या गोंड कागदी चित्रामध्ये रंग आणि सर्जनशीलता यांचा सुंदर मिलाफ दिसतो आहे. आज हे चित्र खरेदी केले, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

पंतप्रधानांनी नागालँडच्या कलाकारांनी विणलेली पारंपरिक शाल देखील खरेदी केली. नागा संस्कृतीचा, त्यातील शौर्य, क्षमाशीलता आणि सर्जनशीलतेचा भारताला अभिमान आहे, असे त्यांनी त्यांच्या ट्वीट संदेशात म्हटले आहे.

नागालँडची पारंपरिक शाल खरेदी केली.

मधुबनी चित्रांनी सजलेला खादीचा गळपट्टा खरेदी केल्यानंतर, पंतप्रधान ट्वीट संदेशात सांगतात की, महात्मा गांधी आणि भारताच्या समृध्द इतिहासाशी खादीचे जवळचे नाते आहे. मी मधुबनी चित्रांनी सजलेला खादीचा गळपट्टा खरेदी केला आहे. याचा दर्जा अत्यंत उत्तम असून आपल्या नागरिकांच्या कारागीरीशी तो नाते सांगतो आहे.

पश्चिम बंगालमधील महिला कारागिरांनी हाताने तयार केलेला तागाचा फाईल फोल्डर विकत घेतल्यावर मोदी म्हणाले की हा फोल्डर मी नक्कीच वापरणार आहे.

पश्चिम बंगालमधील आदिवासी जमातीमधील कलाकारांनी तयार केलेली तागाची उत्पादने तुम्ही तुमच्या घरात वापरली पाहिजेत असा सल्ला पंतप्रधानांनी दिला.

आसामच्या काकतीपापुंग विकास भागातील स्वयंसहाय्य गटांनी तयार केलेला गमछा देखील पंतप्रधानांनी विकत घेतला.

तुम्ही मला खूप वेळा गमछा परिधान केलेले पाहिले असेल. आज मी आसामच्या काकतीपापुंग विकास भागातील स्वयंसहाय्य गटांनी तयार केलेला गमछा विकत घेतला आहे, असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.

केरळमधील महिलांनी पामच्या झाडापासून तयार केलेला उत्कृष्ट निलावीलक्कू बद्दल देखील त्यांनी ट्वीट केले.

केरळमधील महिलांनी पामच्या झाडापासून तयार केलेल्या उत्कृष्ट निलावीलक्कू या हस्तकलेच्या वस्तूची मी उत्सुकतेने वाट पाहत आहे. आपल्या नारीशक्तीने स्थानिक हस्तकला आणि उत्पादने यांनी केलेली जपणूक कौतुकास्पद आहे, असे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे.

 

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1703186) Visitor Counter : 202