पंतप्रधान कार्यालय

संरक्षण मंत्रालयाने गुजरातमधील केवडीया येथे आयोजित केलेल्या संयुक्त कमांडर्स परिषदेच्या सांगता सोहळ्यात पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 06 MAR 2021 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 मार्च 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील केवडीया येथे संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या संयुक्त कमांडर्स परिषदेच्या सांगता समारंभाला संबोधित केले.

या वर्षीच्या परिषदेत झालेल्या चर्चांविषयी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांनी पंतप्रधानांना अवगत केले. पंतप्रधानांनी यावेळी परिषदेचा अजेंडा आणि संरचनेविषयी समाधान व्यक्त केले. विशेषतः ज्युनियर कमिशन्ड अधिकारी आणि नॉन कमिशन्ड अधिकाऱ्यांना या परिषदेत सहभागी करुन घेतल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

राष्ट्रीय संरक्षण व्यवस्थेत, सर्वोच्च नागरी आणि लष्करी नेतृत्वाशी बोलतांना पंतप्रधानानी गेल्या वर्षी, उत्तर सीमेवरील आव्हानात्मक परिस्थिती आणि कोविडच्या संकटकाळात, भारतीय सैन्यदलांनी दाखवलेल्या समर्पण वृत्ती आणि निश्चयाविषयी कौतुक व्यक्त केले.

पंतप्रधानांनी यावेळी राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेत स्वदेशीचा अंगीकार आणि वापर वाढण्याच्या महत्वावर भर दिला. केवळ लढावू उपकरणे आणि शस्त्रेच नाही, तर सैन्यदलांमध्ये असलेल्या  सैद्धांतिक, प्रक्रिया आणि पद्धतींमध्येही स्वदेशीचा पुरस्कार व्हावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय सुरक्षेची रचना करतांना लष्करी आणि नागरी भागातही मनुष्यबळ नियोजन अधिकाधिक उत्तम करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच नागरीजीवन आणि सैन्य यांच्यातील भिंती दूर करून एकत्रित काम करण्यावर तसेच, सर्वसमावेशक दृष्टीकोन ठेवण्याचा त्यांनी सल्ला दिला. तसेच, निर्णयप्रक्रियेची गती वाढवली जावी, असेही ते म्हणाले. लष्करी दलांनी परंपरेने चालू असलेल्या कालबाह्य, निरुपयोगी पद्धतीतून आता मुक्त व्हावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

सध्या वेगाने बदलत असलेल्या तंत्रज्ञानाची दाखल घेत, पंतप्रधान म्हणाले की, या अनुषंगाने भारतीय लष्करालाही ‘भविष्यातील शक्ती’ होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

पुढच्या वर्षी देश आपल्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करणार आहे, हे सांगत, यानिमित्त असे काही विशेष उपक्रम आणि कार्यक्रम राबवावेत ज्यातून युवकांना प्रेरणा मिळेल, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला.

 

Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1702937) Visitor Counter : 296