पंतप्रधान कार्यालय

सेरावीक 2021 मध्ये पंतप्रधानांचे बीजभाषण


पंतप्रधानांना सेरावीक जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कार प्रदान

भारताची जनता आणि परंपरा यांना पुरस्कार समर्पित

महात्मा गांधी आजवरच्या महान पर्यावरण नेत्यांपैकी एक आहेतः पंतप्रधान

हवामान बदलाशी लढा देण्याचा सर्वात शक्तिशाली मार्ग म्हणजे वर्तणुकीत बदलः पंतप्रधान

तर्कसंगत आणि पर्यावरणदृष्ट्या विचार करण्याची वेळ आता आली आहे. हे सर्व माझ्याबद्दल किंवा तुमच्याबद्दल नाही. हे आपल्या वसुंधरेच्या भविष्याबद्दल आहेः पंतप्रधान

Posted On: 05 MAR 2021 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 मार्च 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेरावीक 2021 मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बीजभाषण केले. त्यांना सेरावीक जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते म्हणाले, “मी अत्यंत नम्रतेने सेरावीक जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कार स्वीकारतो. हा पुरस्कार मी आमची महान मातृभूमी,  भारतातील लोकांना समर्पित करतो. पर्यावरणाची काळजी घेण्याचा मार्ग दाखवणाऱ्या आमच्या भूमीच्या गौरवशाली परंपरेला हा पुरस्कार मी अर्पण करतो.” शतकानुशतके पर्यावरणाची काळजी घेणारे भारतीय लोक हे नेते आहेत असे ते म्हणाले. आपल्या संस्कृतीत, निसर्ग आणि देवत्व यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे असे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, महात्मा गांधी आजपर्यंतच्या महान पर्यावरणवादी नेत्यांपैकी एक आहेत. मानवजातीने त्यांनी आखून दिलेल्या मार्गाचा अवलंब केला असता तर आज आपल्याला भेडसावत असलेल्या अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागले नसते. पोरबंदर, गुजरात या महात्मा गांधींच्या गावाला भेट देण्याचे त्यांनी आवाहन केले. या ठिकाणी अनेक वर्षापूर्वी पावसाचे पाणी वाचवण्यासाठी भूगर्भात टाक्या बांधण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले की हवामान बदल आणि आपत्तींविरुद्ध लढण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे धोरणे, कायदे, नियम आणि आदेश. पंतप्रधानांनी उदाहरणे दिली. एप्रिल 2020 पासून भारत- 6 उत्सर्जन नियमांचा अवलंब जे युरो - 6 इंधनाच्या समतुल्य आहे, यामुळे भारतातील विजेच्या स्थापित क्षमतेत बिगर-जीवाश्म स्त्रोतांचा वाटा 38 टक्के झाला आहे. 2030 पर्यंत भारत सध्याच्या 6% ते 15% पर्यंत नैसर्गिक वायूचा हिस्सा वाढवण्याचे काम करत आहे. एलएनजीला इंधन म्हणून प्रोत्साहन दिले जात आहे. त्यांनी नुकतीच सुरू केलेल्या राष्ट्रीय हायड्रोजन मिशन आणि पीएम कुसुम यांचा उल्लेख केला, जो सौर उर्जा निर्मितीच्या न्याय्य व विकेंद्रित मॉडेलला प्रोत्साहन देतो. मात्र  हवामान बदलाशी लढा देण्याचा सर्वात शक्तिशाली मार्ग म्हणजे, वर्तणुकीत बदल हा आहे. त्यांनी हे जग एक चांगले ठिकाण बनवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, वर्तन बदलाची ही भावना आपल्या पारंपारिक सवयींचा एक महत्त्वाचा भाग आहे, जी आपल्याला करुणेसह वापर शिकवते. विनाकारण टाकून देण्याची  संस्कृती आपल्या संस्कारांचा भाग नाही. सिंचनाची आधुनिक तंत्रे सतत वापरत असलेल्या भारतीय शेतकऱ्यांचा आपल्याला अभिमान आहे असे ते म्हणाले. मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि कीटकनाशकांचा वापर कमी करण्याबाबत जागरूकता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान म्हणाले की आज जग तंदुरुस्ती आणि निरोगीपणावर लक्ष केंद्रित करत आहे. सकस आणि सेंद्रिय अन्नाची मागणी वाढत आहे. आपल्या मसाला आणि आयुर्वेद उत्पादनांद्वारे भारत हा जागतिक बदल घडवून आणू शकतो. त्यांनी घोषित केले की, पर्यावरण-स्नेही  गतीशीलतेसाठी सरकार 27 शहरांमध्ये मेट्रो नेटवर्कवर काम करत आहे.

पंतप्रधान म्हणाले की मोठ्या प्रमाणात वर्तन बदलांसाठी, आपल्याला नाविन्यपूर्ण, परवडणारे आणि लोकसहभागावर आधारित उपाय उपलब्ध करून देण्याची  आवश्यकता आहे. लोकांकडून एलईडी बल्बचा स्वीकार, गिव इट अप चळवळ, एलपीजी जोडण्यांमध्ये वाढ,  परवडणाऱ्या वाहतुकीचे उपक्रम ही उदाहरणे त्यांनी दिली. भारतभर इथेनॉलच्या वाढत्या मान्यतेबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

पंतप्रधानांनी नमूद केले की गेल्या सात वर्षांत भारताच्या वनक्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. सिंह, वाघ, बिबट्या आणि पाणपक्ष्यांचे प्रमाण वाढले आहे. हे  सकारात्मक वर्तनात्मक बदलांचे उत्तम सूचक आहेत असे ते म्हणाले.

मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या विश्वस्त या तत्त्वाविषयी सांगितले. विश्वस्तच्या मुळाशी एकजुटता, करुणा आणि जबाबदारी आहे. विश्वस्त म्हणजे संसाधनांचा जबाबदारीने वापर करणे असे ते म्हणाले.

मोदी म्हणाले, “आता तर्कसंगत आणि पर्यावरणदृष्ट्या  विचार करण्याची वेळ आली आहे आणि हे सर्व माझ्याबद्दल किंवा तुमच्याबद्दल नाही. हे आपल्या वसुंधरेच्या भविष्यासाठी आहे. आपण आपल्या भावी पिढ्यांचे देणे लागतो.”

 

* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1702798) Visitor Counter : 160