पंतप्रधान कार्यालय
इंडिया टॉय फेअर 2021 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत ‘इंडिया टॉय फेअर 2021’ हे महत्वाचे पाऊल-पंतप्रधान
पर्यावरण स्नेही आणि मुलांच्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम करणारी खेळणी बनवावीत –पंतप्रधान
भारतात उत्तम खेळणे बनवण्याची परंपरा, तंत्रज्ञान, कल्पनाशक्ती आणि क्षमताही आहे –पंतप्रधान
Posted On:
27 FEB 2021 3:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘इंडिया टॉय फेअर 2021’ या खेळण्यांच्या प्रदर्शनाचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन झाले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी देखील या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. हे खेळणी प्रदर्शन आजपासून 2 मार्चपर्यंत चालणार आहे. 1000 पेक्षा जास्त कलाकार आणि व्यावसायिक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.
यावेळी पंतप्रधानांनी कर्नाटकातील चन्नापटना, उत्तरप्रदेशातील वाराणसी आणि राजस्थानातील जयपूर इथल्या खेळणी तयार करणाऱ्या कारागिरांशी संवाद साधला. या टॉय फेअर च्या माध्यमातून सरकार आणि या क्षेत्रातील उद्योजक एकत्र येऊन भारताला खेळण्यांच्या क्षेत्रात जागतिक निर्मितीचे केंद्र कसे बनवावे तसेच, या क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी व निर्यातीला चालना देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.
भारतातील खेळणेनिर्मिती क्षेत्रात असलेले छुपे नैपुण्य आणि सामर्थ्य बाहेर आणण्याची गरज आहे तसेच आत्मनिर्भर भारत मोहिमेचा भाग बनून, खेळणे उद्योगाची स्वतःची ओळख निर्माण करायला हवी, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. हे पहिले टॉय फेअर म्हणजेच खेळण्यांचे प्रदर्शन म्हणजे केवळ व्यवसाय किंवा आर्थिक कार्यक्रम नाही. तर या प्रदर्शनाचा उद्देश देशातील क्रीडा आणि आनंदी वृत्तीची संस्कृती पुन्हा मजबूत करणे हा आहे. हे खेळण्यांचे प्रदर्शन असे एक व्यासपीठ आहे, जिथे आपण खेळण्यांचे डिझाईन, नवोन्मेष, तंत्रज्ञान, विपणन आणि पॅकेजिंग अशा सर्व बाबींविषयी चर्चा करता येईल, असे पंतप्रधान म्हणाले. जगभरात अगदी सिंधू संस्कृती, मोहेंजोदाडो आणि हडप्पा संस्कृतीपासून मानवाने खेळण्यांवर संशोधन केले आहे, असे मोदी यांनी सांगितले.
प्राचीन काळी जेव्हा परदेशातील पर्यटक, प्रवासी भारतात येत तेव्हा त्यांनी भारतातील क्रीडाप्रकार शिकून घेतले आणि त्यात आपली भर घालून नवे स्वरूप दिले, असे पंतप्रधान म्हणाले, हे खेळ या प्रवाशांनी भारताबाहेर नेले. जसे की बुद्धीबळ हा खेळ आज जगभरात लोकप्रिय आहे, तो खेळ पूर्वी भारतात, “चतुरंग” किंवा ‘चदुरंग” या नावाने खेळला जात असे. आज जो लुडो खेळला जातो, तो पूर्वी भारतात ‘पचिसी’ नावाने ओळखला जात असे, असे पंतप्रधानांनी सांगितले. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये देखील उल्लेख आहे की बाल रामाकडे खूप खेळणी होती. गोकुळात, गोपाळ कृष्ण आपल्या घराबाहेर आपल्या मित्रांसोबत फुगे खेळत असल्याचा उल्लेख आहे. आपल्या प्राचीन मंदिरातील शिल्पांमध्ये देखील क्रीडाप्रकार, खेळणी आणि कलाकुसरीच्या वस्तू कोरल्याचे आढळते, असे ते म्हणाले.
भारतात तयार झालेल्या खेळण्यांनी बालकांच्या सर्वांगीण विकसात मोठे योगदान दिले आहे, असे मोदी म्हणाले. भारताच्या एकूणच जीवनशैलीमध्ये एखादी वस्तू डागडुजी करून, बदल-दुरुस्ती करुन नव्या स्वरूपात पुन्हा वापरण्याची प्रवृत्ती आहे, ती खेळण्यांबाबतही आपल्याला दिसते. बहुतांश भारतीय खेळणी, नैसर्गिक किंवा पर्यावरणपूरक सामानातून, शुध्द रंग वापरून बनवण्यात येत असल्याने ती लहान मुलांना वापरण्यासाठी सुरक्षित आणि नैसर्गिक असतात. ही खेळणी आपल्या मनाला आपला इतिहास आणि संस्कृतीशी जोडतात आणि आपल्या सामाजिक-मानसिक विकास तसेच भारतीय दृष्टीची जोपासना करण्यासाठी उपयुक्त ठरतात, असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या खेळणे उत्पादकांनी अशी खेळणी तयार करावीत जी पर्यावरणस्नेही असतील आणि मुलांच्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम करणारी असावीत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जगभरात आज जवळपास प्रत्येक क्षेत्रात, भारताचा दृष्टीकोन आणि भारतीय कल्पनांची चर्चा केली जात आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारतीय क्रीडाप्रकार आणि खेळण्यांचे वैशिष्ट्य हे की त्यात, ज्ञान, विज्ञानमनोरंजन आणि मानसिक समाज अशा सर्वांचा मिलाफ या खेळण्यांमध्ये आहे.
जेव्हा मुले भोवऱ्याशी खेळायला शिकतात त्यावेळी त्यांना गुरुत्वाकर्षण आणि संतुलनाचे शास्त्र समजते. त्याचप्रमाणे, जेव्हा मुले गुल्हेर वापरायला शिकतात, त्यावेळी गतिमानता आणि ऊर्जेचे भौतिकशास्त्रातील प्रमेय ते अनुभवत असतात. पझल्स सारख्या खेळण्यांमुळे मुलांमध्ये योजनाबद्ध विचार करण्याची आणि शांतपाने समस्या सोडवण्याची प्रवृत्ती वाढते. त्याचप्रमाणे नवजात बालक देखील त्यांच्या पाळण्यावर लावलेल्या भिंगरीसारख्या खेळातून हात चक्राकार फिरवण्याची कला शिकत असते.
अशा सर्जनशील खेळण्यांमुळेच मुलांमधील जाणीवा जागृत होतात आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला नवे पंख मिळतात. त्या विश्वात या कल्पनाशक्तीवर कोणतीही बंधने नसतात. एखादे छोटे खेळणे जरी त्यांच्या हातात दिले तरी त्यात त्यांचे समाधान होते आणि त्यातून त्यांच्यातील सर्जनशीलता, उत्सुकता जागी होते, असे पंतप्रधान म्हणाले. पालकांनीही आपल्या मुलांसोबत खेळावं असे आवाहन पंतप्रधानांनी केले कारण खेळणी त्यांच्या शारीरिक-मानसिक विकासात अत्यंत महत्वाचे योगदान असतात. प्रत्येक खेळण्यामागचे विज्ञान आणि त्याचा त्यांच्या विकासावार होणारा परिणाम पालकांनी समजून घ्यावा तसेच, शिक्षकांनीही अशा खेळण्यांचा मुलांच्या विकासासाठी जास्तीत जास्त उपयोग करावा, असे मोदी म्हणाले. याच दृष्टीने केंद्र सरकारने शिक्षणपद्धतीत मोठे बदल केले असून, नव्या शैक्षणिक धोरणात हे बदल आणले आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.
नव्या शिक्षण धोरणाविषयी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की या धोरणात खेळ-आधारित आणि उपक्रम-आधारित शिक्षणावर मोठा भर देण्यात आला आहे. ही अशी शिक्षणव्यवस्था असेल, ज्यात मुलांमधील तार्किक बुद्धी आणि सर्जनशीलतेला अधिकाधिक वाव दिला जाईल. खेळण्यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, भारताकडे या क्षेत्राची समृद्ध परंपरा आहे, तंत्रज्ञान आहे. भारताच्या स्वतःच्या क्षमता आणि संकल्पना आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. आपण जगाला पुन्हा एकदा पर्यावरण पूरक खेळण्यांकडे घेऊन जाऊ शकतो, आपले सॉफ्टवेअर इंजिनियर्स भारतातील कथांवर आधारित कॉम्युटर गेम्स बनवू शकतात. मात्र असे असले तरीही आज 100 अब्ज डॉलर्सच्या जागतिक खेळणी बाजारापेठेत भारताचा वाटा अत्यल्प आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आज देशतील 85 टक्के खेळणी प्रदेशातून आयात केली जातात. ही परीस्थिती बदलवण्याची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
आता भारताने खेळणी उद्योगाला 24 महत्वाच्या विभागांमध्ये श्रेणीबद्ध केले आहे. राष्ट्रीय खेळ कृती आराखडा देखील मंजूर करण्यात आला आहे. यात 15 मंत्री आणि विभागांचा समावेश करण्यात आला असून हे क्षेत्र अधिकाधिक स्पर्धात्मक आणि खेळणी क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सक्षम केले जात आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारताची खेळणी जगभरात जायला हवीत. या संपूर्ण मोहिमेत, राज्य सरकारांनाही समान भागीदार बनवण्यात आले असून त्यांच्या त्यांच्या राज्यात त्यांनी खेळणी व्यवसायाची समूहे बनवण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. भारतातील क्रीडा आधारित खेळण्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूनेच टॉयोथोन-2021 आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात 7000 पेक्षा अधिक कल्पनांवर चर्चा झाली होती, असे त्यांनी सांगितले.
आज जर ‘मेड इन इंडिया’ वस्तूंना मागणी आहे तसेच हाताने बनवलेल्या वस्तूंनाही तेवढीच मागणी आहे. आज केवळ लोक खेळणी विकत घेत नाहीत, तर त्यांना त्यांच्याशी संबंधित अनुभव देखील हवे असतात. त्यामुळेच आपण अशा हातांनी बनवलेल्या खेळण्यांना प्रोत्साहन द्यायला हवे, असे मोदी म्हणाले.
* * *
S.Tupe/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1701322)
Visitor Counter : 309
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam