पंतप्रधान कार्यालय
केरळमधल्या उर्जा आणि नागरी क्षेत्रातल्या महत्वाच्या प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि पायाभरणी
आज सुरु झालेल्या विकास कामांची व्याप्ती केरळच्या सर्व भागांपर्यंत
गेल्या सहा वर्षात भारताच्या सौर उर्जा क्षमतेत 13 पट वाढ :पंतप्रधान
अन्नदाता हे उर्जादाताही ठरावेत यासाठी शेतकरी सौर क्षेत्राशी जोडले जात असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
Posted On:
19 FEB 2021 9:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ मधल्या पुगलूर- त्रिसूर उर्जा पारेषण प्रकल्प, कासरगोड सौर उर्जा प्रकल्प आणि अरुविक्कारा इथल्या जल शुद्धीकरण प्रकल्पाचे दूर दृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. तिरुअनंतपुरम इथल्या एकात्मिक परिचालन आणि नियंत्रण केंद्राची आणि स्मार्ट रस्ते प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, केंद्रीय उर्जा आणि नविकरणीय उर्जा राज्य मंत्री ( स्वतंत्र कार्यभार ) राज कुमार सिंग, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आज सुरु झालेली विकासकामे केरळच्या सर्व भागात पसरली असून त्यामध्ये विविध क्षेत्रांचाही समावेश असल्याचे पंतप्रधान म्हणाले. केरळची जनता भारताच्या विकासात समृद्ध योगदान देत असून निसर्गसौंदर्याने नटलेल्या या राज्याला हे प्रकल्प उर्जा देण्याबरोबरच समर्थ करतील असे ते म्हणाले. आज उद्घाटन झालेली 2000 मेगावाट पुगलूर- त्रिसूर हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट प्रणाली ही केरळ मधली राष्ट्रीय ग्रीडशी जोडलेली पहिली एचव्हीडीसी असून यामुळे राज्याची विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज हस्तांतरण यामुळे शक्य होणार आहे. देशात प्रथमच पारेषणासाठी व्हीएससी कन्व्हर्टर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. अंतर्गत उर्जा निर्मितीच्या मोसमी स्वरूपामुळे केरळ, राष्ट्रीय ग्रीडकडून आयात केलेल्या उर्जेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असून एचव्हीडीसी प्रणाली हे अंतर भरून काढण्यासाठी मदत करेल. या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेली एचव्हीडीसी उपकरणे भारतातच तयार करण्यात आली असून यामुळे आत्मनिर्भर भारत अभियान अधिक बळकट होणार असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
सौर उर्जा क्षेत्रातल्या लाभामुळे हवामान बदलाच्या दुष्परिणामाशी आपल्या लढ्याला अधिक बळ मिळाले असून आपल्या उद्योजकांना ही चालना मिळाली आहे. अन्नदाता हे उर्जादाताही ठरावेत यासाठी शेतकरी सौर क्षेत्राशी जोडले जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पीएम-कुसुम योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 20 लाखाहून जास्त सौर पंप देण्यात येत आहेत. गेल्या सहा वर्षात भारताच्या सौर उर्जा क्षमतेत 13 पट वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी द्वारे भारताने जगाला एका मंचावर आणले आहे. आपली शहरे म्हणजे विकासाचे इंजिन आणि नवोन्मेशाचे उर्जा स्त्रोत आहेत. आपल्या शहरात तंत्रज्ञानविषयक विकास, लोकसंख्याविषयक अनुकूल लाभ आणि देशांतर्गत वाढती मागणी हे तीन उत्साहवर्धक काळ आढळत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत एकात्मिक परिचालन आणि नियंत्रण केंद्रे, शहरांना उत्तम नागरी नियोजन आणि व्यस्थापन यासाठी उपयुक्त ठरत आहेत. 54 कमांड सेंटर प्रकल्प कार्यान्वित झाले असून असे 30 प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्यावर असल्याची घोषणा त्यांनी केली. महामारीच्या काळात ही केंद्रे विशेष उपयुक्त ठरल्याचे त्यांनी सांगितले. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत कोची आणि तिरुअनंतपुरम या केरळमधल्या दोन स्मार्ट सिटीनी लक्षणीय प्रगती केली आहे. 773 कोटी रुपयांचे 27 प्रकल्प पूर्ण झाले असून 2000 कोटी रुपयांच्या 68 प्रकल्पांची आखणी होत आहे.
अमृत योजना शहरांना विस्तारासाठी आणि सांडपाणी प्रक्रिया पायाभूत संरचना सुधारण्यासाठी मदत करत आहे. अमृत योजने अंतर्गत केरळमध्ये एकूण 175 पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेण्यात आले असून त्यांचा खर्च 1100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आज उद्घाटन करण्यात आलेल्या अरुविक्कारा इथल्या जल शुद्धीकरण प्रकल्पासाठी 70 कोटी रुपये खर्च झाला आहे. यामुळे 13 लाख नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होणार असून तिरुअनंतपुरम मधल्या दरडोई पाणीपुरवठ्यात आधीच्या 100 लिटर प्रतिदिन वरून 150 लिटर पर्यंत वाढ होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन देशातल्या जनतेसाठी स्फूर्तीदायी आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर भर दिला, ज्यामध्ये विकासाची फळे समाजातल्या सर्वच स्तरापर्यंत पोहोचतात. शिवाजी महाराजांनी बळकट आरमार उभारले आणि किनारी भागाच्या विकासासाठी आणि मच्छिमारांच्या कल्याणासाठी मोठे परिश्रम घेतले, केंद्र सरकारही हेच धोरण राबवत आहे असे पंतप्रधान म्हणाले. संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होण्याच्या मार्गावर आहे. संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात काही अतिशय महत्वाच्या सुधारणा झाल्या आहेत. यामुळे प्रतिभावान भारतीय युवकांना संधी प्राप्त होणार आहे. नील अर्थव्यवस्थेत भारत गुंतवणूक करत आहे. मच्छिमारांसाठी अधिक पत, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, दर्जेदार पायाभूत सुविधा, सहाय्यक ठरणारे सरकारी धोरण यावर आमचे प्रयत्न आधरित आहेत. सी-फूड निर्यातीत भारत केंद्र ठरावा या दृष्टीने सरकारचे धोरण असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
प्रसिद्ध मल्याळी कवी कुमारनआशान यांच्या काव्य पंक्ती त्यांनी नमूद केल्या
‘मी विचारत नाही
आपली जात भगिनी,
मी विचारणा करत आहे पाण्याची,
मी तहानलेला आहे ‘
विकास आणि सुशासन हे जात,धर्म, वंश, लिंग,धर्म आणि भाषा जाणत नाही. विकास हा प्रत्येकासाठी असतो आणि सबका साथ, सबका विकास,सबका विश्वास याचे हेच मर्म आहे असे पंतप्रधान म्हणाले. एकता आणि विकास हा सामायिक दृष्टीकोन घेऊन पुढे वाटचाल करण्यासाठी केरळच्या जनतेने सहकार्य करावे असे पंतप्रधान म्हणाले.
* * *
M.Chopade/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1699515)
Visitor Counter : 222
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam