पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान मोदी यांनी केरळच्या कोची येथे विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले


आज उद्घाटन केलेल्या कामांची विविध क्षेत्रात व्याप्ती आहे. ती भारताच्या विकासाच्या मार्गाला चालना देतील: पंतप्रधान

केरळमधील पर्यटनाशी संबंधित पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी केंद्र सरकार अनेक प्रकारचे प्रयत्न करत आहे: पंतप्रधान

आखाती देशात काम करणाऱ्या भारतीयांना सरकारचे पूर्ण सहकार्य आहेः पंतप्रधान

आपल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल आणि आखाती देशातील भारतीय समुदायाची विशेष काळजी घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी आखाती देशांचे आभार मानले

Posted On: 14 FEB 2021 9:15PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमध्ये कोची इथे आज विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. केरळचे राज्यपाल, केरळचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, राज्यमंत्री मनसुख मांडवीय, व्ही. मुरलीधरन यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की आज उद्घाटन झालेल्या कामांमध्ये विविध क्षेत्रांचा समावेश आहे. ते भारताच्या विकासाच्या मार्गाला चालना देतील. ते म्हणाले की आज प्रोपीलीन डेरिव्हेटिव्ह पेट्रोकेमिकल प्रोजेक्ट (पीडीपीपी) चे उद्घाटन करण्यात आले असून भारताच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाला यामुळे बळ मिळेल कारण परकीय चलन वाचेल. विविध उद्योगाना लाभ होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्याचप्रमाणे रो-रो बोटींमुळे जवळपास तीस किलोमीटर रस्त्याचे अंतर जलमार्गाच्या माध्यमातून 3.5 किलोमीटर होईल आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होईल आणि अधिक सोयी सुविधा, व्यापार आणि क्षमता वाढेल.

केरळमध्ये पर्यटन संबंधित पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी केंद्र सरकार अनेक प्रकारे प्रयत्न करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. कोची येथील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल सागरिकाचे उद्घाटन हे याचे एक उदाहरण आहे. सागरिका क्रूझ टर्मिनल एक लाखाहून अधिक क्रूझ अतिथींना सेवा पुरवेल. महामारीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर असलेल्या निर्बंधांमुळे स्थानिक पर्यटनात वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, स्थानिक पर्यटन उद्योगातील व्यवसायिकांना आपले जीवनमान उंचावण्याची आणि आपली संस्कृती आणि तरूण यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची ही एक उत्तम संधी आहे. पर्यटन संबंधित नाविन्यपूर्ण उत्पादनांचा विचार करण्याचे त्यांनी स्टार्ट अप्सना आवाहन केले. गेल्या पाच वर्षांत भारतातील पर्यटन क्षेत्रात चांगली वाढ होत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. जागतिक पर्यटन निर्देशांक क्रमवारीत भारत पासष्टाव्या स्थानावरून चौतीसाव्या स्थानावर आल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, क्षमता निर्मिती आणि भविष्यासाठी सज्ज पायाभूत सुविधा या राष्ट्रीय विकासासाठी दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. आज विज्ञान सागर ची विकासकामे आणि दक्षिण कोळसा बर्थची पुनर्बांधणी या दोन्ही घटकांना हातभार लावतील. कोचीन शिपयार्डचे नवीन ज्ञान कॅम्पस विज्ञान सागर, हे विशेषत: सागरी अभियांत्रिकीचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांना मदत करेल. दक्षिण कोळसा बर्थ लॉजिस्टिक खर्च कमी करेल आणि मालवाहतूक क्षमता सुधारेल. आज पायाभूत सुविधांची व्याख्या आणि व्याप्ती बदलली आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. हे चांगले रस्ते, विकास कामे आणि काही शहरी केंद्रांमधील कनेक्टिव्हिटीच्या पलिकडचे आहे राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईनच्या माध्यमातून 110 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक पायाभूत सुविधा निर्मितीसाठी केली जात आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

नील अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी देशाच्या आराखड्याची रूपरेषा सांगत मोदी म्हणाले, या क्षेत्रातील आमची दूरदृष्टी आणि कार्य यात अधिक बंदरे, सध्याच्या बंदरांमधील पायाभूत सुविधा सुधारणे, एफएफ-किनारे उर्जा, शाश्वत किनारपट्टी विकास आणि किनारपट्टी कनेक्टिव्हिटी समाविष्ट आहे. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेबद्दल बोलताना पंतप्रधानांनी मच्छीमार समुदायाच्या विविध आवश्यकता यामुळे पूर्ण होतील याकडे लक्ष वेधले. यामध्ये अधिक पतपुरवठ्याची तरतूद आहे. मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्डशी जोडले आहे. त्याचप्रमाणे, भारताला सीफूड निर्यातीसाठीचे केंद्र बनवण्याचे काम सुरू आहे.

पंतप्रधान म्हणाले की यावर्षीच्या अर्थसंकल्पात केरळला फायदा होईल अशा प्रकारे महत्वपूर्ण निधी आणि योजना समाविष्ट केल्या आहेत. यात कोची मेट्रोच्या पुढील टप्प्याचा समावेश आहे.

कोरोना आव्हानाला भारताने दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा संदर्भ देताना पंतप्रधानांनी आखाती देशातील भारतीय समुदायाला मदत करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांची माहिती दिली. ते म्हणाले की, आखाती देशांमधील भारतीय समुदायाचा भारताला अभिमान आहे. वंदे भारत मिशनचा एक भाग म्हणून, पन्नास लाखाहून अधिक भारतीय मायदेशी परत आले. त्यातील बरेच लोक केरळमधील होते. तेथील तुरूंगात असलेल्या अनेक भारतीयांना सोडण्यात यावे यासाठी भारत सरकारच्या प्रयत्नांबाबत संवेदनशील दृष्टिकोन ठेवल्याबद्दल पंतप्रधानांनी विविध आखाती देशांचे यानिमित्ताने आभार मानले. आखाती देशांनी माझ्या वैयक्तिक आवाहनाला प्रतिसाद दिला आणि आमच्या समुदायाची विशेष काळजी घेतली. ते या प्रांतातल्या भारतीयांना मायदेशी परत येण्याला प्राधान्य देत आहेत. आम्ही ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एअर बबल्स स्थापित केली आहे. आखाती देशात काम करणाऱ्या भारतीयांना हे माहित असले पाहिजे की त्यांच्या कल्याणाला माझ्या सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. असे पंतप्रधान म्हणाले.

***

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1698000) Visitor Counter : 280