आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताने 8 महिन्यांनंतर नव्या रुग्ण नोंदीचा गाठला नीचांक; गेल्या 24 तासांत 9,102 नव्या कोविड बाधितांची नोंद
देशातील एकूण कोविड बाधित रुग्णांपैकी फक्त 1.66% रुग्ण कोविड सक्रीय
8 महिन्यांनंतर प्रतिदिन कोविड बळींची संख्या घसरून 117 वर
कोविड प्रतिबंधात्मक लस घेतलेल्या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची संख्या 20 लाखांहून जास्त
प्रविष्टि तिथि:
26 JAN 2021 4:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जानेवारी 2021
भारताने कोविडच्या जागतिक महामारीविरुद्धच्या लढाईत आता महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. प्रतिदिन नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांच्या संख्येने आज नीचांक गाठला आहे.
एकूण 237 दिवसांच्या कालावधीनंतर गेल्या 24 तासांतील सर्वात कमी म्हणजे 9,102 नव्या रुग्णांची नोंद झाली. यापूर्वी 4 जून 2020 ला ही संख्या 9,304 इतकी होती.
केंद्र सरकारने, कोविड विरुद्धच्या लढ्यात ‘संपूर्ण सरकार’ आणि ‘संपूर्ण समाज’ ह्या दृष्टीकोनावर आधारित शाश्वत, सामर्थ्यवान आणि प्रमाणित धोरणानुसार काम केल्यामुळे प्रतिदिन नोंदल्या जाणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सतत घसरण होत आहे. यामुळे रोज कोविडमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्यादेखील कमी झाली आहे. गेल्या आठ महिन्यांहून जास्त काळानंतर (8 महिने 9 दिवस) देशात गेल्या 24 तासांत 120 पेक्षा कमी (117) व्यक्तींच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

भारतातील सक्रीय कोविड रुग्णांच्या संख्येत घट होऊन आज ती 1,77,266 इतकी आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या प्रमाणात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आणखी कमी होऊन 1.66% झाले आहे.
गेल्या 24 तासांच्या कालावधीत एकूण सक्रीय रुग्णांच्या संख्येत 6,916 ची घट झाली आहे.
जागतिक पातळीवर प्रत्येक दशलक्ष लोकसंख्येमागे आता भारतात सर्वात कमी (128) सक्रीय कोविड रुग्ण आहेत. जर्मनी, रशिया, ब्राझील, इटली, इंग्लंड आणि अमेरिका या देशांमध्ये प्रत्येक दशलक्ष लोकसंख्येमागे सक्रीय असलेल्या कोविड रुग्णांची संख्या कितीतरी जास्त आहे.

भारतातील दर दशलक्ष लोकसंख्येमागे असलेल्या रुग्णांचे प्रमाणदेखील जागतिक पातळीवर सर्वात कमी(7,736) आहे.

देशात सुरु असलेल्या कोविड-19च्या प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत 26 जानेवारी 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत, 20,23,809 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
गेल्या24 तासांत, एकूण 7,764 सत्रांमध्ये झालेल्या लसीकरण मोहिमेत 4,08,305 जणांना लस देण्यात आली.
लसीकरणासाठी आतापर्यंत देशात अशी 36,378 सत्रे पार पडली आहेत.
देशात आजपर्यंत 1.03 कोटी (1,03,45,985)व्यक्ती कोविड मुक्त झाल्या आहेत हे लक्षात घेता देशातील कोविड मुक्तीचा दर 96.90% वर पोहोचला आहे. कोविड मधून बरे झालेले रुग्ण आणि सध्या सक्रीय कोविड बाधित असलेले रुग्ण यांच्या संख्येतील तफावत सतत वाढतच असून आत्ता ती 1,01,68,719 इतकी आहे.
गेल्या 24 तासांत 15,901 रुग्ण कोविडमधून बरे झाले.
नव्याने रोगमुक्त झालेल्यांपैकी 83.68% रुग्ण देशाच्या 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
एका दिवसात रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे 5,606 इतकी नोंदली गेली. त्याखालोखाल महाराष्ट्रात एका दिवसांत 3,080 तर कर्नाटकात आणखी 1,036 जण रोगमुक्त झाले.

नव्याने कोविड बाधित झालेल्यांपैकी 81.76% रुग्ण देशातील 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात एकवटलेले आहेत.
केरळमध्ये गेल्या 24 तासांच्या कालावधीत दैनिक पातळीवरील सर्वाधिक म्हणजे 3,361 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली.महाराष्ट्रात काल 1,842 आणि तामिळनाडूमध्ये 540 नवे रुग्ण आढळले.

देशात गेल्या 24 तासांत कोविडमुळे मरण पावलेल्या 117 जणांपैकी 63.25% रुग्ण पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
महाराष्ट्रात या कालावधीत 30 लोकांचा मृत्यू झाला तर केरळमध्ये 17 आणि छत्तीसगड राज्यात 13 रुग्ण कोविड मुळे मरण पावले.

भारतात दर दशलक्ष लोकसंख्येमागे 111 कोविड रुग्णांचे मृत्यू होत आहेत. जागतिक पातळीवर सर्वात कमी मृत्यू दर असणाऱ्या काही देशांमध्ये भारताचा समावेश आहे.

* * *
R.Tidke/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1692501)
आगंतुक पटल : 300