राष्ट्रपती कार्यालय

72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्राला संदेश

Posted On: 25 JAN 2021 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2021

 

माझ्या प्रिय देशवासीयांनो, नमस्कार !

जगातली सर्वात मोठी आणि चैतन्यानं सळसळती लोकशाही असलेल्या आपल्या देशाच्या सर्व नागरिकांना, बहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हार्दिक शुभेच्छा ! विविधतेनं समृद्ध असलेल्या आपल्या देशात अनेक सण साजरे होतात, पण त्याचबरोबर आपले राष्ट्रीय सणही, आपण सर्व देशवासीय, राष्ट्रप्रेमाच्या भावनेनं ओथंबून साजरे करतो. प्रजासत्ताक दिनाचा हा राष्ट्रीय उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा करत असतानाच आपला राष्ट्रध्वज आणि राज्यघटने प्रति, आम्ही सन्मान आणि निष्ठा व्यक्त करत आहोत. हा प्रजासत्ताक दिन, देश-परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. याच दिवशी 71 वर्षांपूर्वी, आपण सर्व भारतीयांनी आपलं हे‌ अद्वितीय संविधान स्वीकारलं, त्याची अंमलबजावणी सुरु केली आणि ते अक्षरश: स्वतःमध्ये भिनवलं. त्यामुळेच तेव्हापासून आपल्या सर्वांना या संविधानाच्या मुलभूत जीवनमूल्यांवर सखोल विचार करण्याची, या दिनानिमित्तानं एक संधी मिळत असते. संविधानाच्या प्रस्तावनेत नमूद केलेली, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जीवनमूल्यं आम्हा सर्वांसाठी पवित्र आदर्श आहेत. अशी अपेक्षा आहे की फक्त शासन व्यवस्थेतले जबाबदार लोकच नाहीत, तर आपण सर्वसामान्य नागरिकांनीही या आदर्शांचं, सर्वशक्तिनिशी निष्ठेनं पालन करायला हवं.

लोकशाहीचा आधार मजबूत करणारी ही चारही तत्त्वं, संविधानाच्या सुरुवातीलाच प्रामुख्यानं ठेवण्याचा निर्णय, आमच्या विद्वान घटनाकारांनी मोठ्या विचाराअंतीच घेतला होता. याच आदर्शांनी आमच्या स्वातंत्र्यलढ्याला एक दिशा मिळवून दिली होती. बाळ गंगाधर टिळक, लाला लजपतराय, महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या अनेक महान लोकनेत्यांनी आणि विचारवंतांनी आमच्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली होती. मातृभूमीच्या सोनेरी भविष्यासाठी असलेल्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या होत्या, पण न्याय-स्वातंत्र्य-समता आणि बंधुत्व या मूल्यांनी, या सर्वांच्या स्वप्नांना-कल्पनांना एका धाग्यात गुंफण्याचं काम केलं होतं.

मला असं वाटतं की आपण सर्वांनी भूतकाळात आणखी थोडं मागे जाऊन हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की हीच मूल्य आमच्या राष्ट्रनिर्मात्यांसाठी आदर्श का होती? याचं उत्तर स्पष्ट आहे की अनादिकाळापासून भारताची ही भूमी आणि या भूमीतल्या संस्कृतीनं हीच जीवनमूल्यं कायम जोपासली आहेत. न्याय-स्वातंत्र्य-समता आणि बंधुत्व हे आमच्या जीवनाच्या तत्वज्ञानाचे शाश्वत सिद्धांत आहेत. या सिद्धांतांचा अखंड सुरु राहिलेला प्रवाह आमच्या संस्कृतीच्या आरंभापासूनच आम्हा सर्वांचं जीवन समृद्ध करत आला आहे. प्रत्येक नव्या पिढीची ही जबाबदारी आहे की त्या त्या काळानुसार या मूल्यांची सार्थकता सिद्ध करायला हवी. आमच्या स्वातंत्र्यसैनिकांनी ही जबाबदारी आपापल्या वेळी मोठ्या खुबीनं निभावली होती. त्याचप्रमाणे आजच्या संदर्भांनुसार आम्हालाही त्या मूल्यांना सार्थक आणि उपयुक्त बनवायचं आहे. या सिद्धांतांनीच घालून दिलेल्या मार्गावर आमच्या विकास यात्रेला निरंतर पुढे जात राहिलं पाहिजे.

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

इतकी मोठी लोकसंख्या असलेल्या आमच्या देशाला खाद्यान्न आणि दुग्ध उत्पादनांमध्ये स्वावलंबी बनवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बंधू-भगिनींचं, सर्व देशवासीय मनःपूर्वक अभिनंदन करत आहेत. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतही अनेक आव्हानं आणि कोविड सारख्या संकटातही आमच्या शेतकरी बंधू-भगिनींनी कृषी उत्पादनांची कमतरता निर्माण होऊ दिली नाही. त्यामुळेच हा कृतज्ञ देश आमच्या अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.

ज्याप्रमाणे आमचे मेहनती शेतकरी देशाची अन्न सुरक्षा अबाधित राखण्यात यशस्वी झाले आहेत, त्याचप्रमाणे आमच्या सैन्याचे शूर जवान कठीण परिस्थितीतही देशाच्या सीमांचं संरक्षण करत आले आहेत. लडाखमध्ये सियाचीन आणि गलवान खोऱ्यात उणे 50 ते 60 डिग्री सेंटीग्रेड तापमानात सर्व काही गोठवून टाकणाऱ्या थंडीपासून, ते जैसलमेर मधल्या 50 डिग्री सेंटीग्रेडपेक्षाही जास्त असलेल्या तापमानात चटके देणाऱ्या उष्ण हवामानात, जमीन-आकाश आणि दीर्घ लांबीच्या अशा सागरी किनारी क्षेत्रात, आमचे सैनिक भारताच्या संरक्षणाची जबाबदारी, क्षण न क्षण पार पाडत आहेत. आमच्या सैनिकांचं शौर्य, देशप्रेम आणि बलिदान यांचा आम्हा सर्व देशवासीयांना अभिमान वाटतो.

देशाची अन्न सुरक्षा, लष्करी सुरक्षा, नैसर्गिक संकट आणि रोगराईपासून सुरक्षा, तसच विकासाच्या अनेक क्षेत्रांमध्ये, ‌आमच्या वैज्ञानिकांनी आपल्या योगदानानं, राष्ट्रीय प्रयत्नांना बळ मिळवून दिलं आहे. अंतराळा पासून शेती-बागायतीं पर्यंत, शिक्षण संस्थांपासून रुग्णालयां पर्यंत, वैज्ञानिक मंडळींनी आमचं जीवन आणि दैनंदिन कामकाजात सुलभता आणली आहे. रात्रंदिवस परिश्रम करत, कोरोना विषाणूला डीकाेड करून, तसच खूप कमी अवधीत लस बनवून आमच्या वैज्ञानिकांनी, संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी एक नवा इतिहास रचला आहे. देशात या महामारीवर नियंत्रण मिळवण्यात, तसंच विकसित देशांच्या तुलनेत मृत्युदर नियंत्रीत राखण्यात, आमच्या वैज्ञानिकांनी, डॉक्टर-प्रशासन आणि इतर संबंधित लोकांच्या साथीनं अमूल्य असं योगदान दिलं आहे. म्हणूनच आमचे सगळे शेतकरी, सैनिक आणि वैज्ञानिक, विशेष अभिनंदनाला पात्र आहेत आणि कृतज्ञ देश प्रजासत्ताक दिनाच्या या शुभ प्रसंगी, या सर्वांचं अभिनंदन करत आहे.

प्रिय देशवासीयांनो,

गेल्यावर्षी संपूर्ण मानवजात, एका विक्राळ अशा संकटाचा सामना करत असताना जणू स्तब्ध झाली होती. याच दरम्यान मी भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्वांचं मनन करत होतो. मला असं वाटतं, बंधुत्वाच्या आमच्या याच घटनात्मक आदर्शाच्या जोरावरच, या संकटाचा प्रभावी मुकाबला करणं शक्य होऊ शकलं आहे. कोरोनाविषाणूरुपी शत्रु विरोधात सर्व देशवासीयांनी एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येऊन, त्याग, सेवा आणि बलिदानाचा अनुकरणीय आदर्श घालून देत एकमेकांचं रक्षण केलं आहे. मी या निमित्तानं, ते सर्व डॉक्टर-परिचारिका-आरोग्य सेवक, आरोग्यसेवेशी संबंधित प्रशासक आणि सफाई कर्मचारी यांचा इथे उल्लेख करू इच्छितो, ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाबाधितांची देखभाल केली आहे. याच प्रयत्नात कित्येकांनी आपले प्राणही गमावले. या बरोबरच या महामारीनं देशातल्या सुमारे दीडलाख नागरिकांचे बळी घेतले. अशा सर्व शोकग्रस्त कुटुंबीयांप्रति मी आपल्या संवेदना व्यक्त करतो. कोरोना विरुद्धच्या या लढाईत आघाडीचे योद्धे म्हणून आमच्या सामान्य नागरिकांनीही असामान्य योगदान दिलं आहे. येणाऱ्या पुढच्या पिढीतले लोक जेव्हा या कालखंडाचा इतिहास जाणून घेतील, तेव्हा, या आकस्मिक संकटाचा ज्या साहसानं आपण सर्वांनी सामना केला आहे, त्यापुढे ते अत्यंत श्रद्धापूर्वक नतमस्तक होतील.

भारताची दाट लोकसंख्या, सांस्कृतिक परंपरांची विविधता, तसंच नैसर्गिक आणि भौगोलिक आव्हानांमुळे, कोरोनापासून रक्षण करणं आपल्या सर्वांसाठी खूप खडतर असं काम होतं. तरीही या विषाणूच्या संसर्गाचा प्रकोप रोखण्यात आपण बऱ्याच अंशी यशस्वी झालो आहोत. या गंभीर संकटातही अनेक क्षेत्रांमधले आपले उपक्रम, आपण यशस्वीपणे पुढे नेले आहेत. या महामारी मुळे आमचा शालेय विद्यार्थीवर्ग आणि युवा पिढी यांच्या शिक्षण प्रक्रियेत अडथळे येण्याचा धोका निर्माण झाला होता. पण आमच्या शिक्षण संस्था आणि शिक्षकांनी नवं तंत्रज्ञान वेगानं आत्मसात करत, अध्ययन प्रक्रिया निरंतर सुरू राहील याची काळजी घेतली. बिहार सारखं घनदाट लोकसंख्या असलेलं राज्य, तसच जम्मू काश्मीर आणि लडाख सारख्या दुर्गम आणि अनेक आव्हानांनी भरलेल्या प्रदेशात, निवडणूक प्रक्रिया स्वतंत्र, नि:पक्ष आणि सुरक्षितपणे पार पाडणं हे आमच्या लोकशाहीचं आणि निवडणूक आयोगाचं स्पृहणीय यश आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं, न्यायव्यवस्थेतली न्यायदानाची प्रक्रियाही सुरूच राहिली. अशा यशस्वी प्रक्रियांची यादी खूप मोठी आहे. आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू करण्यासाठी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याची प्रक्रिया, सावधगिरीनं, टप्प्याटप्प्यनं राबवण्यात आली. ही पद्धत परिणामकारक ठरली आणि अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मजबूत होण्याचे संकेत आता दिसू लागले आहेत. वस्तू आणि सेवाकर संकलनातल्या विक्रमी वाढीची नुकतीच झालेली नोंद आणि परदेशी गुंतवणुकीसाठी आकर्षक अर्थव्यवस्था म्हणून भारताचा जागतिक पटलावर उदय होणं, आपली अर्थव्यवस्था वेगानं पुर्वपदावर येण्याचं निदर्शक आहे. सरकारनं, मध्यम आणि लघु उद्योगांना चालना दिली आहे, कर्ज सहजपणे उपलब्ध करून देत उद्यमशीलतेला प्रोत्साहन दिलं आहे आणि व्यापारात नवनव्या मार्गांना प्रेरणा देण्यासाठी, अनेक पावलं उचलली आहेत.

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

गेल्या वर्षातल्या प्रतिकूल परिस्थितीनं, आपल्या हृदयात पूर्वापार वसलेले संस्कार पुन्हा एकदा जागृत केले आहेत. काळाच्या गरजेनुसार, आपल्या देशबांधवांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या क्षमता दाखवून दिल्या आहेत आणि स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं आहे. संपूर्ण मानवजातीसाठी दाखवलेल्या सहानुभूती, सेवा आणि बंधुत्वाच्या या गहिऱ्या भावनांनी गेल्या अनेक हजारो वर्षांपासून आपली एकजूट राखली आहे. आपण भारतवासीय माणुसकीसाठीच जगतो आणि मरतो सुद्धा. हाच भारतीय आदर्श, महान कवी मैथिलीशरण गुप्त यांनी पुढील शब्दांत व्यक्त केला आहे.

उसी उदार की सदा, सजीव कीर्ति कूजती;

तथा उसी उदार को, समस्त सृष्टि पूजती।

अखण्ड आत्मभाव जो, असीम विश्व में भरे¸

वही मनुष्य है कि जो, मनुष्य के लिये मरे।

मला विश्वास आहे की संपूर्ण मानवजातीसाठी असलेली, निस्सीम प्रेम आणि बलिदानाची ही आपली भावना, आमच्या देशाला उन्नतीच्या शिखरापर्यंत घेऊन जाईल.

माझ्या मते 2020 हे वर्ष, एक शिकवण देणारं वर्ष म्हणून मानलं पाहिजे. गेल्या वर्षभरात निसर्गानं खूप कमी वेळात आपलं स्वच्छ आणि निर्मळ स्वरूप पुन्हा एकदा मिळवलं. निसर्गाचं अशा प्रकारचं नितळ सौंदर्य बऱ्याच काळानंतर पहायला मिळालं. एक प्रकारे निसर्गानं हा स्पष्ट संदेश दिला आहे की छोटे छोटे प्रयत्न फक्त नाईलाजास्तव नाहीत, तर अनेक मोठमोठ्या प्रयत्नांसाठी पूरक ठरतात. मला विश्वास आहे, भविष्यात अशा प्रकारच्या महामारीचा धोका कमी करण्याच्या दृष्टीनं, हवामान बदलाच्या मुद्याला जागतिक स्तरावर प्राधान्य दिलं जाईल.

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

संकटाचं संधीत रुपांतर करण्यासाठी पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत अभियानाचं आवाहन केलं. आपली चैतन्यानं सळसळती लोकशाही, आमचे प्रतिभावंत आणि धडाडीचे देशवासीय, विशेष करून आपली युवाशक्ती, आत्मनिर्भर म्हणजे स्वावलंबी भारताच्या निर्मितीच्या आपल्या प्रयत्नांना ऊर्जा मिळवून देत आहेत. आपल्या देशवासीयांच्या वस्तू आणि सेवा विषयक गरजा पूर्ण करण्याच्या स्थानिक प्रयत्नांद्वारे, तसंच या प्रयत्नांमधल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रयोगामुळेही, या अभियानाला बळ मिळत आहे. या अभियाना अंतर्गत, सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देऊन तसंच स्टार्ट अप उपक्रमांना अधिक मजबूत बनवून, आर्थिक विकासासोबत रोजगार निर्मितीसाठीही पावलं उचलली गेली आहेत. आत्मनिर्भर भारत अभियान, एका जनआंदोलनाचं रूप घेत आहे. हे अभियान, आपल्या नवभारताच्या कल्पनेनुसारचे राष्ट्रीय संकल्प पूर्ण करण्यातही सहाय्यक ठरेल, जे संकल्प देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षापर्यंत म्हणजे 2022 सालापर्यंत गाठण्याचं लक्ष्यं आपण ठेवलं आहे. प्रत्येक कुटुंबाला पायाभूत सुविधांनी युक्त असं पक्कं घर देण्यापासून, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यापर्यंत सर्व महत्वपूर्ण उद्दिष्टांच्या दिशेनं पुढे जात, आपण आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिवसाचं ऐतिहासिक ध्येय गाठू. नवभारतातल्या सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी, आपण शिक्षण-आरोग्य-पोषक आहार, वंचित समाज घटकांचा उद्धार आणि महिलांच्या कल्याणावर विशेष जोर देत आहोत.

प्रतिकूल परिस्थितीतूनही काही न काही शिकवण मिळते. प्रतिकूल परिस्थितीचा सामना केल्यामुळे ताकद आणि आत्मविश्वास वाढतो. या आत्मविश्वासानंच भारतानं अनेक क्षेत्रांमध्ये मोठी पावलं उचलली आहेत. वेगानं होणाऱ्या आपल्या आर्थिक सुधारणांना पूरक असे नवे कायदे बनवून, कृषी आणि कामगार क्षेत्रांमध्ये असे बदल घडवले गेले आहेत जे खूप आधीपासून अपेक्षित होते. सुरुवातीला या बदलांबाबत काही शंका निर्माण होऊ शकतात, पण शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे, यात मात्र तीळमात्र संशय नाही. मोठ्या बदलांबाबत बोलायचं झालं, तर शिक्षण क्षेत्रात केलेल्या व्यापक सुधारणा उल्लेखनीय आहेत. हे बदल सुद्धा खूप आधीपासून व्हायला हवे होते. हे बदल सुद्धा कृषी आणि कामगार क्षेत्रातल्या सुधारणां इतकेच महत्त्वाचे आहेत, शिवाय कितीतरी मोठ्या प्रमाणात लोकांच्या जीवनावर थेट परिणाम करणारे आहेत. गेल्यावर्षी सरकारनं घोषित केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात तंत्रज्ञाना सोबतच परंपरांवरही जोर दिला गेला आहे. याद्वारे, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एक ज्ञानकेंद्र म्हणून उदयाला येण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या अशा भारताचा पाया रचला गेला आहे. ही नवी शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांच्या अंतर्गत प्रतिभेला तर विकसित करेलच शिवाय त्यांना, जीवनातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठीही सक्षम बनवेल.

सर्व क्षेत्रांमध्ये, संकल्प घेऊन ठामपणे पुढे जाण्याचे चांगले परिणाम समोर येत आहेत. कोरोनाच्या जवळपास एक वर्षाच्या अनपेक्षित अग्निपरीक्षे नंतरही हताश न होता, भारतानं पूर्ण आत्मविश्वासानं नवी झेप घेतली आहे. आपल्या देशात आर्थिक मंदी काही काळासाठीच राहीली. आता आपल्या अर्थव्यवस्थेनं पुन्हा एकदा वेग पकडला आहे. आत्मनिर्भर भारतानं कोरोना विषाणू पासून बचावासाठी आपली स्वतःची लस बनवली आहे. आम्ही मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम चालवत आहोत जी इतिहासात एक प्रकारचा मोठा प्रकल्प म्हणून गणली जाईल. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी, प्रशासन तसच आरोग्य सेवेशी संलग्न सर्व जण, सर्वशक्तीनिशी कार्यरत आहेत. मी देशवासीयांना आग्रह करतो कि आपण सर्वांनी, ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आपल्या आरोग्याच्या हितासाठी या लसरुपी संजीवनीचा लाभ अवश्य घ्या आणि लस नक्की टोचून घ्या. आपलं आरोग्यच आपल्या उन्नतीचे मार्ग मोकळे करून देतं. आज भारताला खऱ्या अर्थानं, फार्मसी ऑफ द वर्ल्ड म्हणजेच जगाचं औषधालय असं म्हटलं जात आहे, कारण आपण अनेक देशांमधल्या लोकांची वेदना कमी करण्यासाठी आणि कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी, औषधं तसच आरोग्यसेवेची अन्य उपकरणं, जगाच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध करून देत आहोत. आता तर आपण लसी सुद्धा अन्य देशांना पुरवत आहोत.

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

गेल्यावर्षी अनेक आघाड्यांवर वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आपल्यासमोर आली. आपल्याला आपल्या सीमांवर विस्तारवादी कारवायांचा सामना करावा लागला. पण आपल्या शूर जवानांनी ते प्रयत्न हाणून पाडले. यात आपले 20 जवान हुतात्मा झाले. आपण सगळे देशवासीय त्या जवानांचे कृतज्ञ आहोत. खरं तर आपण शांततेप्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहोत, तरीही आपलं भूदल-वायुदल आणि नौदल आपल्या सुरक्षितते विरोधात होणारं कुठलही दु:साहस निष्फळ करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी सज्जं आहे. कुठल्याही परिस्थितीत आपल्या राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी आपण पूर्णपणे सक्षम आहोत. भारताचा हा ठाम आणि तत्वावर आधारलेला दृष्टिकोन, संपूर्ण जगाला पूर्णपणे ठाऊक आहे.

भारत, प्रगतीपथावर वाटचाल करत असतानाच जागतिक समुदायात आपलं सुयोग्य स्थान निर्माण करत आहे. गेल्या काही वर्षात भारताचं प्रभावक्षेत्र अधिकच विस्तारलं असून यात जगातल्या व्यापक क्षेत्रांचा समावेश झाला आहे. ज्याप्रकारे जोरदार पाठिंब्याच्या आधारावर यावर्षी भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत, अस्थायी सदस्याच्या रुपात स्थान मिळवलं, ते या वाढत्या प्रभावाचं निदर्शक आहे. जागतिक स्तरावर अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांसोबत आपले संबंध कैक पटीनं अधिक घनिष्टं झाले आहेत. आपल्या सचेतन लोकशाहीच्या आधारावर भारतानं, एक जबाबदार आणि विश्वसनीय देशाच्या रूपात आपला लौकिक वाढवला आहे.

यासंदर्भात एक बाब आपल्या सर्वांच्याच हिताची आहे की आपल्याला आपल्या संविधानानं दिलेल्या आदर्शांचं एखाद्या सूत्राप्रमाणे सदैव स्मरण करायचं आहे. मी हे आधीही म्हटलं आहे आणि आज पुन्हा पुनरुच्चार करतो की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं जीवन आणि विचारांचं मनन करणं, आमच्या दैनंदिनीचा एक भाग असायला हवं. आम्हाला शक्य होईल तेवढा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून समाजातला एकही सदस्य दुःखी किंवा वंचित राहणार नाही. समता, आपल्या प्रजासत्ताकाच्या महान यज्ञाचा बीजमंत्र आहे. सामाजिक समतेचा आदर्श, आपले खेडूत, महिला, अनुसूचित जाती आणि जमातीं सहीत समाजातल्या दुर्बल घटकांमधले लोक, दिव्यांग आणि वयोवृद्ध अशा प्रत्येक व्यक्तीचा मान राखतो. आर्थिक समतेचा आदर्श, सर्वांसाठीच समान संधी उपलब्ध करुन देणं आणि वंचितांची मदत करणं यासाठी असलेली आपली घटनात्मक जबाबदारी स्पष्ट करतो. समरसतेची भावना परोपकारातूनच आणखी व्यापक आणि दृढ होत असते. आपापसातल्या बंधुभावाचा नैतिक आदर्श, मार्गदर्शकाच्या रूपात, भावी सामूहिक वाटचालीचा आपला मार्ग प्रशस्त करेल. आपण सर्वांना संवैधानिक नैतिकतेच्या त्या मार्गावरून निरंतर चालत राहायचं आहे, ज्याचा उल्लेख बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी संविधानाचा आराखडा सादर करतेवेळी, संविधान सभेत आपल्या भाषणात केला होता. त्यांनी स्पष्ट केलं होतं की संविधानातल्या अंतर्भूत मूल्यांचा सर्व प्रकारे अवलंब करणं हाच संवैधानिक नैतिकतेचा खरा अर्थ आहे.

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

आपल्या प्रजासत्ताकाच्या स्थापनेचा उत्सव साजरा करतेवेळी, माझं लक्ष परदेशात वसलेल्या आपल्या बंधू-भगिनीं कडे सुद्धा वळत आहे. प्रवासी भारतीय आमच्या देशाचा गौरव आहेत. परदेशात वसलेल्या भारतीयांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यश मिळवलं आहे. यातले काही जण राजकीय नेतृत्वाच्या उच्च स्तरापर्यंत पोहोचले आहेत, तर अनेक जण, विज्ञान-कला-शिक्षण-समाजसेवा आणि व्यापार या सारख्या क्षेत्रांमध्ये आपलं योगदान देत आहेत. आपण सर्व प्रवासी भारतीय आपल्या वर्तमान कर्मभूमीचाही गौरव वाढवत आहात. आपणा सर्वांच्या पूर्वजांची भूमी असलेल्या भारतातून, मी आपल्याला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. आमचे, सशस्त्र दल, निमलष्करी दल आणि पोलीस दलातले जवान, नेहमीच आपलं कुटुंब आणि मित्रपरिवारापासून दूर राहात हा उत्सव साजरा करतात. या सर्व जवानांना मी विशेष शुभेच्छा देतो. मी पुन्हा एकदा आपणा सर्व देशवासीयांचं प्रजासत्ताक दिनानिमित्त अभिनंदन करतो.

धन्यवाद! जय हिंद!!

 

R.Tidke/S.Tupe/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1692293) Visitor Counter : 56