उपराष्ट्रपती कार्यालय

डेटा सायन्समध्ये क्रांती करण्यासाठी अभियांत्रिकी अभ्यासक्रम अद्ययावत करण्याची आवश्यकता - उपराष्ट्रपती नायडू यांचे प्रतिपादन


चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेसच्या विद्यार्थ्यांशी उपराष्ट्रपतींनी साधला संवाद

Posted On: 05 JAN 2021 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जानेवारी 2021

 

जगातील एसटीईएम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) पदवीधर महिलांमध्ये भारतीय महिलांची सर्वाधिक टक्केवारी (सुमारे 40 टक्के) असली तरी भारतातील एसटीईएमच्या नोकऱ्यांमध्ये त्यांचा वाटा केवळ 14 टक्के इतका कमी आहे आणि तो वाढविणे गरजेचे आहे असे मत भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आज व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट अभ्यासात सध्याचे कमी प्रतिनिधित्व देखील त्वरित सुधारणे गरजेचे आहे.

या संदर्भात, नायडू यांनी नमूद केले की आयआयटीमधील मुलींची संख्या सुधारण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना चालना मिळाली असून 2016 मध्ये असलेले त्यांचे अवघे 8% प्रमाण वाढून आता जवळपास 20 टक्के झाले आहे. विज्ञान आणि गणितामध्ये महिलांना करिअर करण्यास प्रोत्साहित करणारा एक प्रशंसनीय उपक्रम म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या ‘महिला वैज्ञानिक कार्यक्रमाचे’ कौतुकही त्यांनी केले. ते म्हणाले की आपण आपल्या महिला वैज्ञानिकांचा गौरव केला पाहिजे आणि विज्ञान क्षेत्रात मुलींसाठी आदर्श तयार केले पाहिजेत.

चेन्नईच्या चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेस (आयएमएससी) येथे बोलताना उपराष्ट्रपतींनी एसटीईएममधील कल  आणि रोजगार निर्मितीत डेटा सायन्स क्रांतीची संभाव्यता पडताळण्याविषयी चर्चा  केली. नायडू म्हणाले की, डेटा अर्थात आधारसामग्रीने व्यवसायाच्या पद्धतीत बदल झाला आहे आणि आमच्या तरुण पदवीधरांना या नव्या कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी आपल्या पारंपरिक अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पलीकडे पाहायला हवे. अशाप्रकारे आपण उद्योगातील सध्याच्या मागण्यांशी निगडित राहिले पाहिजे.

आयआयटीसारख्या राष्ट्रीय संस्थांद्वारे दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रसाराबद्दल आनंद व्यक्त करताना अधिकाधिक विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी तांत्रिक अभ्यासक्रम हे प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. 

स्थानिक भाषांमध्ये वैज्ञानिक शिक्षण उपलब्ध करुन देण्याच्या गरजेवर भर देताना उपराष्ट्रपती म्हणाले की यामुळे विद्यार्थ्यांना हा विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल आणि नवनिर्मितीस मदत होईल. कोणतीही भाषा लादली जाऊ नये किंवा तिचा विरोध करू नये असे सांगत मातृभाषेला प्राधान्य देत जास्तीत जास्त भाषा शिकण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले.

सध्या सुरू असलेल्या कोविड -19 महामारीचा संदर्भ देत निसर्गाचा आदर करण्याची गरज उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केली. हवामान बदल हे वास्तव असून त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होतील, असा इशारा त्यांनी दिला.

गुणवत्तेच्या मूलभूत संशोधनात विशेषत: भारत-आधारित न्यूट्रिनो वेधशाळे (आयएनओ), मेगा-विज्ञान प्रकल्पात सहभाग असलेल्या आयएमएससीच्या प्रयत्नांचे उपराष्ट्रपतींनी कौतुक केले. हा महत्वाकांक्षी प्रकल्प वैज्ञानिक संशोधनात अग्रणी म्हणून भारताचे जागतिक स्थान उंचावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तामिळनाडूमध्ये विज्ञान प्रसार कार्यक्रम राबवल्याबद्दलही नायडू यांनी संस्थेचे कौतुक केले आणि लोकांमध्ये विशेषत: मुलांमध्ये वैज्ञानिक स्वभाव वाढवणे ही काळाची गरज आहे यावर त्यांनी भर दिला.

यावेळी उपराष्ट्रपतींनी चेन्नईच्या पल्लवाराम येथील, डीएई नोडल सेंटर येथे आयएमएससीच्या नवीन निवासी विभागाचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले.

संपूर्ण भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा


* * *

M.Iyengar/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1686255) Visitor Counter : 185