पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांकडून राजकोट एम्सचे भूमीपूजन


एम्स राजकोट आरोग्य सुविधांमधील सुधारणांबरोबर गुजरातमध्ये रोजगार संधी आणेल

गुजरातने कोविडशी लढण्याचा मार्ग दाखवला : पंतप्रधान

10 नवीन एम्स आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयांचे काम प्रगतीपथावर : पंतप्रधान

2020 हे आरोग्य आव्हानांचे तर 2021 हे आरोग्यप्रश्नांच्या सोडवणुकीचे वर्ष

भारत हा जागतिक आरोग्याचा केंद्रबिंदू म्हणून आपली भूमिका 2021 मध्ये अजून उत्तम निभावेल: पंतप्रधान

वर्षाअखेरीस फ्रंटलाईन कोरोना योद्ध्यांचे स्मरण

Posted On: 31 DEC 2020 3:29PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राजकोट एम्सचे भूमीपूजन केले. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी बोलताना, पंतप्रधानांनी लाखो डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि इतर फ्रंटलाईन कोरोना योद्ध्ये ज्यांनी माणुसकीच्या संरक्षणासाठी स्वतःचे प्राण पणाला लावले, त्यांचे स्मरण केले. त्यांनी शास्त्रज्ञ तसेच या कठीण परिस्थितीत ज्यांनी गरीबांना अन्नपुरवठा केला त्यांची प्रशंसा केली.

भारत एकत्र येतो तेव्हा कोणत्याही मोठ्यातील मोठया संकटाशी यशस्वीरित्या दोन हात करू शकतो, असे या वर्षाने दाखवून दिल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. परिणामकारक पावले उचलल्याने भारतात उत्तम परिस्थिती आहे, आणि कोरोना रुग्णांना वाचवण्यात भारत इतर देशांपेक्षा कितीतरी पटीने आघाडीवर आहे.  भारतात लसीसंबधी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात बनलेली लस भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी घेतले जात असलेले प्रयत्न आता अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवण्यासाठी भारताची तयारी वेगाने सुरू आहे. गतवर्षी ज्याप्रमाणे संसर्ग रोखण्यासाठी  आपण एकत्रितपणे प्रयत्न केले तसेच लसीकरण यशस्वी करण्यासाठीही करण्याचे आवाहन त्यांनी केले,

राजकोटचे एम्स आरोग्याशी संबधित मुलभूत सुविधा व वैद्यकिय शिक्षणाला चालना देईल व गुजरातमध्ये रोजगार संधी आणेल. 5 हजार थेट नोकऱ्या तर अगणित अप्रत्यक्ष रोजगार संधी मिळतील, असे त्यांनी सांगितले.  कोविडशी लढ्यात गुजरातने घेतलेल्या प्रयत्नांचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले, गुजरातने कोविडशी लढण्याचा मार्ग दाखवला.  गुजरातने उत्तम प्रकारे कोरोना आव्हान हाताळले, याचे श्रेय त्यांनी  गुजराथच्या मजबूत वैद्यकीय मुलभूत सुविधा व्यवस्थेला दिले.  गुजरातच्या वैंद्यकीय क्षेत्राला लाभलेले हे यश दोन दशकांचा अविरत परिश्रम, समर्पण आणि निर्धाराचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एवढी दशके उलटूनही देशात फक्त 6 एम्स आहेत, असे ते म्हणाले. अटलजींच्या 2003 मधील सरकारने अजून 6 मोठी एम्स स्थापन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली. गेल्या सहा वर्षात 10 नवी एम्स सुरू झाली आणि काहींचे उदघाटनही झाले. एम्सशिवाय काही सुपर स्पेशालिटी रुग्णालयांची उभारणी झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वर्ष 2014 पूर्वी आपल्या आरोग्यव्यवस्थेचे विविध घटक  विविध दिशांनी आणि वेगवेगळी उद्धिष्टे  ठेवून काम करत होते, 2014 नंतर आरोग्य यंत्रणा समग्रपणे काम करू लागली आणि आधुनिक औषधोपचार पद्धतीला प्राधान्य देतानाही प्रतिबंधात्मक उपायांवर भर देऊ लागली. सरकारने गरीबांवरील औषधोपचाराच्या किंमती कमी केल्या आणि त्याच वेळी वैद्यकीय व्यावसायिकांची संख्या वाढवली असे त्यांनी सांगितले.

आयुष्मान भारत  योजनेखाली दूर्गम भागांमध्ये 1.5 दशलक्ष आरोग्य केंद्र व वेलनेस केंद्रे उभारण्याचे काम सुरू असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. यापैकी 50000 केंद्रे सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले. यापैकी   5000 एकट्या गुजरातमध्ये आहेत. 7000 जन औषधी केंद्रे 3.5 लाख गरीब रुग्णांना कमी किमतीतील औषधे पुरवतात, असे त्यांनी सांगितले. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी  सरकारने घेतलेल्या पुढाकाराबद्दलही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान पुढे म्हणाले की 2020 हे आरोग्य आव्हानांचे वर्ष होते तर 2021 हे आरोग्यविषयक समस्यांच्या सोडवणुकीचे वर्ष असेल. भारताने ज्याप्रमाणे आरोग्य आव्हानांचा सामना करताना महत्वाची भूमिका बजावली त्याचप्रमाणे आरोग्यसमस्यांचे निराकरण करतानाही बजावेल असे ते म्हणाले.  जग सजगतेने आरोग्य सुविधांकडे पाहिल. आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी  2021 मधील भारताचे  योगदान हे या समस्येच्या प्रमाणात महत्वाचे ठरेल, असेही ते म्हणाले. भारतातील वैद्यकीय व्यावसायिकांना ज्ञान आणि सेवेसाठी प्रोत्साहन दिल्यास तसेच मोठ्या प्रमाणावरील लसीकरण याद्वारे भारत जगापुढे सुलभ आणि किफायतशील आरोग्यसेवेचे उदाहरण ठेवेल, असे ते म्हणाले.  हेल्थ स्टार्टअप्समुळे आरोग्य विषयक प्रश्न सोडवण्यासाठी मदत होते  आणि त्यासंबधित तंत्रज्ञानामुळे आरोग्य व्यवस्था सर्वांपर्यंत पोहोचते. भारत हा भविष्यातील आरोग्य आणि आरोग्यातील भविष्य या दोहोंमध्येही महत्वाची भूमिका बजावेल असे मोदींनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले की, आजार हे सुद्धा जागतिक होत आहेत, जागतिक आरोग्य प्रश्नांवर जागतिक पातळीवरील उत्तर शोधण्याची हीच योग्य वेळ आहे. भारताने जागतिक पटलावर हे केले आहे. गरजेनुसार जुळवून घेण्याची, रुजण्याची व विकसित होण्याची आपली क्षमता भारताने सिध्द केल्याचे त्यांनी सांगितले. भारताने जगासोबत पावले टाकली आणि एकत्र प्रयत्नांमध्ये आपले योगदान दिले. भारत हा जागतिक आरोग्याचा केंद्रबिंदू म्हणून वेगाने प्रगती करत आहे. 2020 मध्ये आपल्याला भारताची ही भूमिका अजून मजबूत करणे आवश्यक आहे असे पंतप्रधान म्हणाले.

***

U.Ujgare/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1685068) Visitor Counter : 316