पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान 1 जानेवारी 2021 रोजी जीएचटीसी-इंडिया अंतर्गत ‘लाइट हाऊस’ प्रकल्पांची पायाभरणी करणार


पंतप्रधान पीएमएवाय (शहरी) आणि आशा-इंडिया पुरस्कारांचेही वितरण करणार

Posted On: 30 DEC 2020 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. 1 जानेवारी 2021 रोजी जीएचटीसी  म्हणजेच ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेज- इंडियाअंतर्गत सहा राज्यांमधल्या ‘लाइट हाऊस’ प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. सकाळी 11.00 वाजता दूरदृश्य प्रणालीव्दारे होणा-या या कार्यक्रमात पंतप्रधान आशा-इंडिया म्हणजे परवडणा-या शाश्वत गृहनिर्माण प्रवेगक- भारत अंतर्गत पुरस्कार विजेत्यांची घोषणा करणार आहेत. तसेच पंतप्रधान घरकुल योजना-शहरी अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी करणा-यांना उत्कृष्टतेचे वार्षिक पुरस्कार प्रदान करणार आहेत.

या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नाविन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञानाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार आहेत. या अभ्यासक्रमाचे ‘एनएव्हीएआरआयटीआयएच’ म्हणजे भारतीय घरकुल निर्माणासाठी नवीन, परवडण्याजोगे, प्रमाणित, संशोधन, नवसंकल्पना, तंत्रज्ञान असे नामकरण करण्यात आले आहे. जीएचटीसी-इंडियाने वेगवेगळ्या 54 नवीन संकल्पनांचा विचार करून घरकुल बांधकामाच्या पद्धती तयार केल्या आहेत. या गृहनिर्माण बांधकामाच्या तंत्रज्ञानाचे संकलनही यावेळी जाहीर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय शहरी गृहनिर्माण राज्यमंत्री, त्रिपुरा, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

 

लाइट हाऊस प्रकल्प

एलएचपी म्हणजेच लाइट हाऊस प्रकल्प ही बांधकाम क्षेत्रात आलेली नवीन संकल्पना असून यामध्ये वैश्विक तंत्रज्ञान, साहित्य आणि प्रक्रियेचा समावेश आहे. देशामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर जीएचटीसी-इंडियाच्या अंतर्गत या प्रकल्पांचे काम करण्यात येणार आहे. या प्रकल्पात गृहनिर्माण क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून घरकुलांचे काम समग्रतेने करण्यासाठी एक परिसंस्था तयार करण्यात येणार आहे. यामध्ये इंदूर (मध्य प्रदेश), राजकोट ( गुजरात), चेन्नई (तामिळनाडू), रांची (झारखंड), अगरतळा (त्रिपुरा) आणि लखनौ (उत्तर प्रदेश) येथे लाइट हाऊस प्रकल्प  बांधण्यात येणार आहेत. या घरकुलांमध्ये आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांसह प्रत्येक शहरांमध्ये सुमारे एक हजार घरकुलांची उभारणी करण्यात येणार आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे या प्रकल्पांचे काम अवघ्या 12 महिन्यांमध्ये पूर्ण होवू शकणार आहे. यामध्ये पारंपरिक वीटा आणि सीमेंट आणि बांधकाम प्रक्रियेऐवजी नवीन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. ही नवीन घरकुले अधिक टिकाऊ, उच्च दर्जाची आणि आर्थिकदृष्टीने कमी खर्चाची असणार आहेत.

एलएचपीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. यामध्ये इंदूर येथे बांधण्यात येणा-या एलएचपीमध्ये प्री-फॅब्रिकेटेड सँडविच पॅनल वापरण्यात येणार आहे. तर राजकोट येथे एलएचपीमध्ये बोगदा तयार करून घरकुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. चेन्नई येथे प्रीकास्ट वापरून आणि रांची येथे 3डी व्हॉल्यूमेट्रिक प्रीकास्ट काँक्रिट प्रणाली वापरण्यात येणार आहे. अगरतळा येथील घरकुलांच्या निर्मितीसाठी कमी जाडीची स्टीलची फ्रेम भरून घरांचा सांगाडा तयार करण्यात येणार आहे. लखनौ येथे इन प्लेस फ्रेमवर्क तयार करून घरांची बांधणी करण्यात येणार आहे. एलएचपीमधून करण्यात येणार काम  एकप्रकारे प्रयोगशाळांच ठरणार आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञानाचे  हस्तांतरण आणि त्यांची प्रतिकृती सुलभतेने करण्यात येणार आहे. यामध्ये देशातल्या आयआयटी, एनआयटी आणि इतर अभियांत्रिकी महाहविद्यालयांचे प्राध्यापक, विद्यार्थी यांनी योगदान दिले आहे. बांधकाम कामाचे नियोजन, संरचना तयार करणे, आवश्यक सामुग्रीचे, बांधकाम घटकांचे उत्पादन करणे, बांधकामाच्या कामाचा सराव आणि चाचण्या घेणे यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालये, नियोजन आणि स्थापत्य महाविद्यालये, बांधकाम व्यावसायिक, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातले व्यावसायिक आणि इतर भागिदारांनी योगदान दिले आहे.

 

आशा -भारत

परवडणारी शाश्वत गृहनिर्माण प्रवेगक -भारत (आशा-भारत) अंतर्गत संभाव्य तंत्रज्ञानाला समर्थन प्रदान करून देशात संशोधन आणि उद्योजकता यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कार्य केले जाते. आशा-भारत उपक्रमाअंतर्गत देशात पाच केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत प्रवेगकांना समर्थन देण्यात येत आहे. यामध्ये उत्कृष्ट कार्य करणा-यांना पंतप्रधान पुरस्कार जाहीर करणार आहेत. या उपक्रमाव्दारे चिह्नीत करण्यात आलेल्या तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि साहित्याच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्या  स्टार्टअप्स, नवसंकल्पना प्रत्यक्षात आणणारे आणि उद्योजक यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.

 

पीएमएवाय -शहरी मिशन

प्रधानमंत्री आवास योजना- शहरी ही मोहिम ‘‘ 2022 पर्यंत सर्वांसाठी घरकुल’’ चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आखण्यात आली आहे. राज्ये, केंद्रशासित प्रदेश, शहरातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि लाभार्थी यांनी  या मोहिमेत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याला मान्यता देण्यासाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने  वार्षिक पुरस्कार सुरू केले आहेत. दि. 1 जानेवारी, 2021 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते पीएमएवाय -शहरी पुरस्कार- 2019 चे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी विजेत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

 

* * *

M.Chopade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1684887) Visitor Counter : 199