पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या न्यू भाऊपुर- न्यू खुर्जा टप्प्याचे आणि परिचालन नियंत्रण केंद्राचे उद्घाटन केले.


पायाभूत सुविधांच्या विकासाला राजकारणापेक्षा वरचे स्थान असावे -पंतप्रधान

Posted On: 29 DEC 2020 8:21PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या न्यू भाऊपुर न्यू खुर्जा टप्प्याचे आणि परिचालन नियंत्रण केंद्राचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उदघाटन केले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते .

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्प प्रत्यक्षात  राबवल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की आज खुर्जा भाऊपुर मालवाहतूक मार्गिकेवर पहिली मालगाडी धावेल तेव्हा आपल्याला आत्मनिर्भर  भारताची गर्जना ऐकू येईल.  ते म्हणाले, प्रयागराज परिचालन नियंत्रण केंद्र हे आधुनिक नियंत्रण केंद्रांपैकी एक असून नवीन भारताच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे.

पंतप्रधान म्हणाले की पायाभूत सुविधा हा कोणत्याही देशाच्या सामर्थ्याचा  सर्वात मोठा स्त्रोत आहे. ते म्हणाले की, भारत एक मोठी आर्थिक शक्ती बनण्याच्या मार्गाकडे वेगाने वाटचाल करत आहे, त्यामुळे उत्तम संपर्क व्यवस्था ही देशाची प्राथमिकता आहे.  हे लक्षात घेऊन सरकार गेल्या सहा वर्षांपासून आधुनिक संपर्क व्यवस्थेच्या  प्रत्येक बाबीवर काम करत  आहे असे ते म्हणाले. सरकार महामार्ग, रेल्वे, हवाई मार्ग, जलमार्ग आणि आय-वे या  पाच चाकांवर लक्ष केंद्रित करत आहे असे सांगून  ते म्हणाले की, आज ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या मोठ्या मार्गाचे उद्घाटन  हे या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

पंतप्रधानांनी या समर्पित मालवाहतूक मार्गिकांच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले, लोकसंख्या जसजशी वाढत गेली , तसतशी अर्थव्यवस्थाही वाढत गेली, मालवाहतुकीची  मागणीही अनेक पटींनी वाढली. ते म्हणाले, प्रवासी  गाड्या आणि मालगाड्या  दोन्ही एकाच मार्गावर धावत असल्यामुळे मालगाडीचा वेग कमी आहे. ते म्हणाले, जेव्हा मालगाडीचा वेग कमी असतो, आणि त्याठिकाणी व्यत्यय येतो तेव्हा साहजिकच वाहतुकीचा खर्च जास्त येतो. महाग असल्यामुळे आपली  उत्पादने आपल्या देशातील तसेच परदेशातील बाजारांमधील स्पर्धा गमावतात. ते म्हणाले की, ही परिस्थिती बदलण्यासाठी समर्पित मालवाहतूक मार्गिकेची योजना आखली गेली. सुरुवातीला 2  समर्पित मालवाहतूक मार्गिकांचे नियोजन होते. ईस्टर्न समर्पित मालवाहतूक मार्गिका  लुधियाना ते डांकुनी पर्यंत. या मार्गावर कोळसा खाणी, औष्णिक विद्युत प्रकल्प आणि औद्योगिक शहरे आहेत. यासाठी फीडर मार्गही बनवण्यात येत आहेत. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते दादरी पर्यंत वेस्टर्न समर्पित मालवाहतूक मार्गिका असून  या कॉरिडॉरमध्ये, मुंद्रा, कांडला, पिपावाव, डावरी आणि हजीरा यासारख्या बंदरांना फीडर मार्गांद्वारे सेवा पुरवली  जाईल. ते म्हणाले की, दिल्ली-मुंबई आणि अमृतसर-कोलकाता औद्योगिक कॉरिडोर या दोन्ही मालवाहतूक कॉरिडॉरच्या आसपास विकसित केले जात आहेत. त्याचप्रमाणे उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम कॉरिडोरचे  देखील नियोजन सुरु आहे असे ते म्हणले.

पंतप्रधान म्हणाले की, अशा समर्पित मालवाहतूक मार्गिकांमुळे विलंबीत प्रवासी गाड्यांच्या समस्या सुटतील. यामुळे मालगाडीचा वेगही 3 पटीने वाढेल आणि दुप्पट माल वाहून नेण्यात सक्षम होईल. जेव्हा मालगाड्या वेळेवर येतात तेव्हा आपल्या लॉजिस्टिक नेटवर्कचा खर्चही कमी होतो. जेव्हा आपला माल स्वस्त होईल तेव्हा त्याचा फायदा आपल्या  निर्यातीला होईल. ते म्हणाले की यामुळे एक चांगले वातावरण निर्माण होईल,व्यवसाय सुलभता वाढेल आणि भारत गुंतवणूकीसाठी एक आकर्षक स्थान बनेल आणि स्वयंरोजगाराच्या बर्याच नवीन संधीही निर्माण होतील.

पंतप्रधान म्हणाले, या समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरचा उद्योग, व्यापारी, शेतकरी किंवा ग्राहक, सर्वांनाच फायदा होणार आहे. ते म्हणाले की मालवाहतूक  कॉरिडॉर औद्योगिकदृष्ट्या मागे राहिलेल्या पूर्व भारताला चालना देईल. ते म्हणाले की सुमारे 60 टक्के कॉरिडोर उत्तर प्रदेशात येतात. यामुळे उत्तर प्रदेशकडे बरेच उद्योग आकर्षित होतील. या समर्पित मालवाहतूक  कॉरिडॉरमुळे किसान रेलला फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. देशातील कोणत्याही मोठ्या बाजारपेठेत सुरक्षित आणि कमी किंमतीत शेतकरी रेल्वेमार्गे आपले उत्पादन पाठवू शकतात. आता या मालवाहतूक  कॉरिडॉरद्वारे त्यांचे उत्पादन आणखी वेगाने पोहचेल. उत्तर प्रदेशमध्ये किसान रेलमुळे अनेक साठवणूक  आणि शीतगृह सुविधा उपलब्ध आहेत.

समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरच्या अंमलबजावणीत पूर्वी झालेल्या प्रचंड विलंबाबद्दल  पंतप्रधानांनी नाराजी  व्यक्त केली. ते म्हणाले की 2014 पर्यंत एक किलोमीटरचा मार्ग देखील तयार नव्हता. ते म्हणाले की 2014 मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर सतत देखरेख व हितधारकांबरोबर बैठक घेऊन पुढील काही महिन्यांत सुमारे 1100  किमीचे  काम पूर्ण झाले. पूर्वीच्या सरकारच्या  मानसिकतेवर त्यांनी टीका केली ज्यानी गाड्या ज्या मार्गावरून धावणार आहेत ते वाढवण्याऐवजी गाड्यांची संख्या वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले. रेल्वे जाळ्याच्या आधुनिकीकरणावर फारशी गुंतवणूक झालेली नाही. ते म्हणाले की स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पीय रद्द करून, रेल्वे मार्गांमध्ये  गुंतवणूक करुन हे बदलण्यात आले. ते म्हणाले की, रेल्वे नेटवर्कचे रुंदीकरण व विद्युतीकरण आणि मानवरहित रेल्वे क्रॉसिंगचे निर्मूलन यावर सरकारने भर दिला आहे.

रेल्वेत स्वच्छता, सुधारित अन्न-पेय व इतर सुविधांसारख्या प्रत्येक स्तरावर सुधारणा करण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की, रेल्वे संबंधित उत्पादन क्षेत्रातही आत्मनिर्भरतेच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे.  ते म्हणाले की, भारत आता आधुनिक गाड्या बनवत आहे आणि निर्यातही करीत आहे, वाराणसी इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह्जचे एक प्रमुख केंद्र बनले आहे, रायबरेलीत बनवलेले रेल्वे कोच आता परदेशात निर्यात केले जातात.

देशाच्या पायाभूत सुविधांचा विकास राजकारणापासून दूर ठेवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. ते म्हणाले की देशाची पायाभूत सुविधा ही पाच वर्षांचे राजकारण असू नये  तर यामागे अनेक पिढ्यांना लाभ देण्याचे ध्येय असले पाहिजे. जर राजकीय पक्षांना स्पर्धा करायची असेल तर पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेत स्पर्धा करावेग आणि व्याप्तीत  स्पर्धा व्हावी. निदर्शने व आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान न करण्याचा त्यांनी सल्ला दिला. त्यांनी लोकशाही अधिकार अभिव्यक्त करतांना राष्ट्राप्रति  असलेले आपले कर्तव्य विसरु नका असे आवाहन केले.

 

M.Iyengar/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1684487) Visitor Counter : 192