पंतप्रधान कार्यालय

विश्व भारती विद्यापीठाच्या शताब्दी समारंभात पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 24 DEC 2020 10:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2020

 

नमस्कार,

हे विधाता, दाओ-दाओ मोदेर गौरब दाओ... गुरुदेव यांनी कधी काळी विद्यार्थ्यांच्या उज्जवल भविष्यासाठी ही इच्छा व्यक्त केली होती.  आज विश्व भारतीच्या गौरवशाली 100 वर्षांनिमित्त माझ्याप्रमाणे संपूर्ण देश या महान संस्थेसाठी हीच प्रार्थना करत आहे.  हे विधाता, दाओ-दाओ मोदेर गौरब दाओ...पश्चिम बंगालचे राज्यपाल  जगदीप धनखड़जी, केंद्रीय शिक्षण मंत्री डॉक्टर रमेश पोखरियाल निशंक, कुलगुरू प्राध्यापक  बिद्युत चक्रबर्ती, प्राध्यापक गण,  रजिस्ट्रार, विश्व भारतीचे  सर्व  शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी , माजी  विद्यार्थी , स्त्री आणि पुरुषगण. विश्व  भारती या विद्यापीठाची  100 वर्ष पूर्ण होणे ही प्रत्येक भारतीयासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. माझ्यासाठी देखील ही अतिशय सुखद आहे की आजच्या दिवशी या तपोभूमीचे पुण्यस्मरण करण्याची संधी मिळत आहे.

 

मित्रानो,

विश्व भारतीचा शंभर वर्षांचा प्रवास खूप खास आहे.  विश्वभारती, भारतमातेसाठी  गुरुदेव यांचे चिंतन,  दर्शन आणि  परिश्रमाचे एक  साकार अवतार आहे. भारतासाठी गुरुदेव यांनी जे स्वप्न पाहिले होते, त्या स्वप्नाला  मूर्त रूप देण्यासाठी देशाला  निरंतर ऊर्जा देणारे हे एकप्रकारे  आराध्य स्थळ आहे.  अनेक जगप्रसिद्ध  प्रतिष्ठित गीतकार-संगीतकार, कलाकार-साहित्यिक, अर्थतज्ञ ,  समाजतज्ञ, वैज्ञानिक अनेक वैविध्यपूर्ण प्रतिभा देणारी  विश्व भारती, नवीन भारताच्या निर्मितीसाठी नित्य नवे प्रयत्न करत आहे. या संस्थेला या उंचीवर पोहचवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आदरपूवर्क नमन करतो., त्यांचे  अभिनंदन करतो.  मला आनंद आहे की विश्वभारती, श्रीनिकेतन आणि  शांतिनिकेतन निरंतर ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न करत आहेत जी गुरुदेव यांनी निश्चित केली होती. विश्वभारती द्वारा अनेक गावांमध्ये विकास कार्य विशेषतः ग्रामोदय काम नेहमीच  प्रशंसनीय राहिले आहे. तुम्ही 2015 मध्ये जो योग विभाग सुरु केला होता त्याचीही लोकप्रियता वेगाने वाढत आहे. निसर्गाबरोबर  अध्ययन आणि जीवन, या दोन्हीचे साक्षात उदाहरण म्हणजे तुमचा विद्यापीठ  परिसर आहे. तुम्हालाही हे पाहून आनंद होत असेल की आपला  देश, विश्व भारतीमधून निघालेला संदेश संपूर्ण जगभरात पोहचत आहे.  भारत आज आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाबाबत जगात एक खूप मोठी महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. भारत आज संपूर्ण जगात एकमेव देश आहे जो पॅरिस करारातील  पर्यावरण उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योग्य मार्गावर वेगाने पुढे वाटचाल करत आहे.

 

मित्रानो,

आज जेव्हा आपण  विश्व भारती विद्यापीठाची 100 वर्ष साजरी करत आहोत, तेव्हा या परिस्थितीची आठवण काढणे  आवश्यक आहे, जी त्याच्या स्थापनेचा आधार बनली होती. ही  परिस्थिती केवळ इंग्रजांच्या गुलामीतून उदभवली आहे असे नाही. यामागे शेकडो वर्षांचा अनुभव होता. शेकडो वर्षे चाललेल्या आंदोलनाची पार्श्वभूमी होती. आज तुमच्यासारख्या विद्वानांच्या उपस्थितीत मी याची  विशेष चर्चा यासाठी करत आहे कारण यावर खूप कमी वेळा बोलले गेले आहे. खूप कमी लक्ष दिले गेले आहे. याची चर्चा यासाठी देखील आवश्यक आहे कारण ते थेट भारताची स्वातंत्र्य चळवळ आणि विश्वभारतीच्या उद्दिष्टांशी जोडलेले आहे.

 

मित्रानो,

जेव्हा आपण स्वातंत्र्यलढ्याबाबत बोलतो तेव्हा आपल्या मनात थेट 19व्या किंवा 20व्या शतकाचा विचार येतो. मात्र हे देखील  एक तथ्य आहे की या  आंदोलनांचा पाया खूप आधी रचण्यात आला होता. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला शतकांपूर्वीपासून सुरु असलेल्या आंदोलनांमधून ऊर्जा मिळाली होती.  भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकतेला भक्ति आंदोलनाने  मजबूत करण्याचे काम केले होते. भक्तियुगात भारताचे प्रत्येक  क्षेत्र, प्रत्येक भाग,  पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण, प्रत्येक दिशेला आपल्या संतांनी महंतांनी, आचार्यांनी देशाची  चेतना जागृत ठेवण्याचे अविरत, अविराम प्रयत्न केले. दक्षिणेबाबत बोलायचे तर  मध्वाचार्य, निम्बार्काचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य होऊन गेले,  पश्चिमेकडे पाहिले तर मीराबाई, एकनाथ, तुकाराम, रामदास, नरसी मेहता,  उत्तरेकडे पाहिले तर  संत रामानंद, कबीरदास, गोस्वामी तुलसीदास, सूरदास, गुरु नानकदेव, संत रैदास झाले, अगणित महापूरुष, पूर्वेकडे पहा,  इतकी नावे आहेत, चैतन्य महाप्रभु, आणि श्रीमंत शंकर देव यांच्यासारख्या संतांच्या विचारांतून समाजाला ऊर्जा मिळत राहिली. भक्तिकाळाच्या याच कालखंडात  रसखान, सूरदास, मलिक मोहम्मद जायसी, केशवदास, विद्यापति अशा कितीतरी महान व्यक्ती होऊन गेल्या ज्यांनी आपल्या रचनांमधून समाजाला सुधारण्याचे, पुढे जाण्याचा आणि प्रगतीचा मार्ग दाखवला. भक्तिकाळात या पुण्य आत्म्यांनी लोकांमध्ये एकजुटीने उभे राहण्याची भावना निर्माण केली. त्यामुळे हे आंदोलन प्रत्येक  क्षेत्रीय सीमा ओलांडून भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचले. प्रत्येक  पंथ,  वर्ग,जातीचे लोक भक्तीच्या अधिष्ठानावर  स्वाभिमान आणि सांस्कृतिक वारसासाठी उभे राहिले. भक्ती चळवळ हा एक दुवा होता ज्याने शतकांपासून संघर्ष करत असलेल्या भारताला सामूहिक चेतना आणि  आत्मविश्वास दिला.

 

मित्रानो,

भक्तीचा हा विषय तोपर्यंत पुढे जाऊ शकत नाही जोवर महान काली  भक्त श्रीरामकृष्ण परमहंस यांची  चर्चा होणार नाही. ते  महान संत, ज्यांच्यामुळे भारताला  स्वामी विवेकानंद लाभले. स्वामी विवेकानंद यांच्यात भक्ति, ज्ञान आणि  कर्म, हे तिन्ही गुण एकवटले होते. त्यांनी भक्तीची व्याप्ती वाढवत प्रत्येक व्यक्तीमध्ये  दिव्यता पाहायला सुरुवात केली. त्यांनी व्यक्ती आणि संस्थांच्या निर्मितीवर भर देत  कर्मालाही  अभिव्यक्ति दिली,  प्रेरणा दिली.

 

मित्रानो,

भक्ती चळवळीच्या शेकडो वर्षांच्या कालखंडाबरोबर देशात कर्म आंदोलन देखील झाले. शतकांपासून भारतातील  लोक गुलामगिरी आणि साम्राज्यवादाविरोधात लढत होते. मग ते  छत्रपति शिवाजी महाराज असतील, महाराणा प्रताप असतील, झाशीची राणी  लक्ष्मीबाई असतील,  कित्तूर च्या राणी  चेनम्मा असतील किंवा मग  भगवान बिरसा मुंडा यांचा सशस्त्र संग्राम असेल. अन्याय आणि शोषणाविरोधात सामान्य नागरिकांची तप-त्याग आणि  तर्पणची  कर्म-कठोर साधना सर्वोच्च पातळीवर होती. ती भविष्यात आपल्या स्वातंत्र्य लढ्याची खूप मोठी प्रेरणा बनली.

 

मित्रानो,

जेव्हा भक्ती आणि कर्माच्या विचारधारा ओसंडून वाहत होत्या तेव्हा त्याबरोबर ज्ञानाच्या  सरिताचा हा  नूतन त्रिवेणी संगम, स्वातंत्र्य चळवळीची चेतना बनला होता. स्वातंत्र्याच्या उत्कंठेत  भाव भक्तिची प्रेरणा भरपूर होती. काळाची गरज होती की ज्ञानाच्या अधिष्ठानावर स्वातंत्र्याची लढाई जिंकण्यासाठी  वैचारिक आंदोलन देखील उभारले जावे आणि त्याचबरोबर उज्ज्वल भावी भारताच्या निर्माणासाठी नव्या पिढीला तयार केले जावे. आणि यात  त्याकाळी स्थापन झालेल्या अनेक प्रतिष्ठित शिक्षण संस्था, विद्यापीठे यांनी खुप मोठी  भूमिका पार पाडली . विश्व भारती विद्यापीठ असेल,  बनारस हिंदु विद्यापीठ असेल, अलीगढ़ मुस्लिम विद्यापीठ असेल, नॅशनल कॉलेज असेल, जे आता लाहोरमध्ये आहे, मैसूर विद्यापीठ असेल,  त्रिचि राष्ट्रीय महाविद्यालय असेल,  महात्मा गांधी काशी विद्यापीठ असेल,  गुजरात विद्यापीठ असेल, विलिंगडन महाविद्यालय असेल,  जामिया मिलिया इस्लामिया असेल, लखनऊ विद्यापीठ असेल, पाटणा विद्यापीठ असेल, दिल्ली विद्यापीठ असेल, आंध्रा विद्यापीठ असेल, अन्नामलाई विद्यापीठ असेल  अशा अनेक संस्था त्या एकाच  कालखंडात देशात स्थापन झाल्या. या विद्यापीठांमध्ये भारताच्या एका अगदी नवीन  विद्वतेचा  विकास झाला. या शिक्षण संस्थानी भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुरु असलेल्या  वैचारिक आंदोलनाला नवी  ऊर्जा दिली, नवी दिशा दिली, नवी उंची दिली.  भक्ति आंदोलनामुळे आपण  एकजुट झालो,  ज्ञान आंदोलनाने  बौद्धिक मज़बूती दिली आणि  कर्म आंदोलनाने आपल्याला आपल्या हक्कांसाठी लढण्याचे मनोबल आणि साहस दिले. शेकडो वर्षे चाललेली ही आंदोलने  त्याग आणि  तपस्या  यांचे अनोखे उदाहरण बनली होती. या  आंदोलनांमुळे प्रभावित होऊन हजारो लोक स्वातंत्र्याच्या लढाईत बलिदान देण्यासाठी एकापाठोपाठ एक पुढे येत गेले.

ज्ञानाच्या या  आंदोलनाला गुरुदेव द्वारा स्थापित विश्वभारती विद्यापीठाने नवी  ऊर्जा दिली होती. गुरुदेव यांनी ज्याप्रमाणे भारतीय संस्कृतीला जोडत , आपल्या परंपरांना जोडत  विश्वभारतीला जे  स्वरूप दिले, त्याने  राष्ट्रवादाची एक  मजबूत ओळख देशासमोर ठेवली. त्याचबरोबर त्यांनी  विश्व बंधुत्व यावरही तेवढाच भर दिला.

 

मित्रानो,

वेद ते  विवेकानंद पर्यंत भारताची चिंतन धारा गुरुदेव यांच्या राष्ट्रवादाच्या चिंतनातही कायम होती. आणि ही धारा अंतर्मुखी नव्हती. ती भारताला जगातील अन्य देशांपेक्षा वेगळी ठेवणारी नव्हती. त्याची कल्पना होती की जे भारतात  सर्वश्रेष्ठ आहे, त्याचा जगालाही लाभ व्हावा, आणि जे जगात उत्तम आहे त्यातून भारताने शिकावे, आपल्या विद्यापीठाचे नावच पहा. विश्व -भारती भारत माता आणि जगाबरोबर समन्वय. गुरुदेव, सर्वसमावेशी  आणि सर्व स्पर्शी, सह-अस्तित्व आणि सहकार्याच्या  माध्यमातून  मानव कल्याणाचे  बृहत लक्ष्य घेऊन चालले होते. विश्व भारतीसाठी  गुरुदेव यांची हीच कल्पना आत्मनिर्भर भारताचे देखील सार आहे. आत्मनिर्भर भारत अभियान देखील विश्व कल्याणासाठी भारताच्या कल्याणाचा मार्ग आहे. हे अभियान, भारताला सशक्त करण्याचे अभियान आहे. भारताच्या समृद्धीतून जगात आणण्याचे अभियान आहे. इतिहास साक्ष आहे की एक सशक्त आणि  आत्मनिर्भर भारताने नेहमी संपूर्ण जागतिक समुदायाचे भले केले आहे. आपला विकास एकांगी  नाही तर जागतिक,  समग्र आहे आणि एवढेच नाही आपल्या नसात जे भिनले आहे.  सर्वे भवंतु सुखिनः आहे.  भारती आणि  विश्व यांचा हा संबंध तुमच्यापेक्षा चांगले कोण जाणते ? गुरुदेव यांनी आपल्याला 'स्वदेशी समाज' चा संकल्प दिला होता. त्यांना आपल्या गावांना, आपल्या शेतीला आत्मनिर्भर पाहायचे होते. वाणिज्य आणि  व्यापार यांना आत्मनिर्भर झालेले पाहायचे होते. त्यांना कला आणि साहित्य यांना आत्मनिर्भर झालेले पाहायचे होते . त्यांनी  आत्मनिर्भरतेचे  लक्ष्य प्राप्त करण्यासाठी  'आत्मशक्ति' चा मुद्दा मांडला होता.  आत्मशक्तिच्या ऊर्जेतून  राष्ट्र निर्माण बाबत त्यांनी जे म्हटले होते ते आजही तेवढेच महत्वपूर्ण आहे. ते म्हणाले होते, राष्ट्र निर्माण, एक प्रकारे आपल्या आत्म्याच्या प्राप्तिचाच विस्तार आहे. जेव्हा तुम्ही आपल्या विचारांतून , आपल्या कार्यातून आपले कर्तव्य बजावून देशाची निर्मिती करता तेव्हा तुम्हाला देशाच्या आत्म्यातच आपला आत्मा दिसायला लागतो."

 

मित्रानो,

भारताचा  आत्मा, भारताची स्वयंपूर्णता आणि भारताचा  आत्म-सम्मान एकमेकांशी जोडलेला असतो. भारताच्या आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी तर बंगालच्या पिढ्यानी आपले सर्वस्व पणाला लावले. आठवा , खुदीराम बोस याना वयाच्या केवळ 18 व्या वर्षी फाशी दिली गेली. प्रफुल्ल  चाकी 19 व्या वर्षीच शहीद झाले. बीना दास, ज्यांना बंगालची अग्निकन्या म्हणून ओळखले जाते, त्यांना केवळ  21 व्या वर्षी तुरुंगात पाठवण्यात आले.  प्रीतिलता वड्डेडार यांनी 21 व्या वर्षी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. असे अगणित लोक आहेत ज्यांच्या नावांची इतिहासात  नोंद होऊ शकली नाही. या सर्वानी देशाच्या आत्मसन्मानासाठी हसत हसत मृत्यूला कवटाळले. आज यातूनच  प्रेरणा  घेऊन आपल्याला  आत्मनिर्भर भारतासाठी जगायचे आहे हा संकल्प पूर्ण करायचा आहे.

भारताला मजबूत आणि आत्मनिर्भर बनवण्यात तुमचे  योगदान, संपूर्ण जगाला एक उत्तम स्थान बनवेल.  वर्ष 2022मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला  75 वर्ष पूर्ण होणार आहेत.  विश्वभारतीच्या  स्थापनेच्या 27 वर्षानंतर  भारत स्वतंत्र झाला होता. आतापासून  27 वर्षानंतर भारत आपल्या स्वातंत्र्याच्या  100 वर्षाचे  पर्व साजरे करेल. आपल्याला नवीन उद्दिष्टे साध्य करायची आहेत, नवी ऊर्जा एकवटावी लागेल, नव्या पद्धतीने आपला प्रवास सुरु करावा लागेल. आणि या प्रवासात आपले  मार्गदर्शन कुमी दुसरे नाही तर गुरुदेव यांची विधानेच करतील. त्यांचे विचार करतील . आणि जेव्हा  प्रेरणा असते तेव्हा  संकल्प असतो. तेव्हा लक्ष्य देखील आपोआप गाठले जाते.  विश्वभारतीबाबत बोलायचे तर यावर्षी इथे  ऐतिहासिक पौष मेळाव्याचे आयोजन होऊ शकले नाही. 100 वर्षांच्या प्रवासात तिसऱ्यांदा असे झाले आहे. महामारी ने आपल्याला हेच  मूल्य शिकवले आहे. - vocal for local पौष मेळाव्याशी  तर हा  मंत्र नेहमीच जोडलेला आहे.  महामारीमुळे या मेळाव्यात जे कलाकार यायचे , जे हस्तकारागीर यायचे ते येऊ शकले नाहीत. जेव्हा आपण आत्मसम्मानाबाबत बोलत आहोत , आत्म निर्भरता बाबत बोलत आहोत तर सर्वप्रथम माझ्या आग्रहाखातर तुम्ही सर्व माझी मदत करा. माझे काम करा.  विश्व भारतीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी,  पौष मेळाव्यात येणाऱ्या कारागिरांशी  संपर्क साधा, त्यांच्या उत्पादनाबाबत माहिती गोळा करा. आणि या गरीब कलाकारांच्या कलाकृती  ऑनलाइन कशा विकल्या जातील,  सोशल मीडियाची यात काय मदत घेता येऊ शकेल हे पहा, यावर काम करा. एवढेच नाही, भविष्यातही स्थानिक कारागीर, कलाकृती अशा प्रकारे आपली उत्पादने जागतिक बाजारपेठेत घेऊन जाऊ शकतील याचेही त्यांना धडे द्या , त्यांच्यासाठी मार्ग तयार करा.अशा प्रकारच्या अनेक प्रयत्नांमुळे देश आत्मनिर्भर बनेल, आपण  गुरुदेव यांची स्वप्ने पूर्ण करू शकू. तुम्हाला  गुरुदेव यांचा सर्वात  प्रेरणादायी मंत्र देखील आठवत असेल - जॉदि तोर डाक शुने केऊ न आशे तोबे एकला चलो रे। कुणीही बरोबर येणार नाही, आपले  लक्ष्य गाठण्यासाठी जे एकट्याने चालावे लागले तर  जरूर चला.

 

मित्रानो,

गुरुदेव म्हणायचे - ' संगीत आणि कलेशिवाय राष्ट्र आपली अभिव्यक्तिची  वास्तविक शक्ति हरवून बसते. आणि नागरिकांचे सर्वोत्तम बाहेर येऊ शकत नाही.  गुरुदेव यांनी आपल्या  समृद्ध सांस्कृतिक वारशाचे संरक्षण, पोषण आणि  विस्तार हे अतिशय महत्वपूर्ण मानले होते. जर आपण त्यावेळच्या बंगालला पाहिले तर आणखी एक अद्भुत गोष्ट आढळून येते. जेव्हा सगळीकडे स्वातंत्र्य चळवळ सर्वोच्च पातळीवर होती तेव्हा बंगाल त्या आंदोलनाला दिशा देण्याबरोबरच  संस्कृतीचा  पोषक बनून उभा होता. बंगालमध्ये सगळीकडे संस्कृति, साहित्य, संगीताची  अनुभूति देखील एक प्रकारे स्वातंत्र्य चळवळीला बळ देत होती.

 

मित्रानो,

गुरुदेव यांनी दशकांपूर्वीच भविष्यवाणी केली होती - आणि भविष्यवाणी काय होती, ते म्हणाले होते, ओरे नोतून जुगेर भोरे, दीश ने शोमोय कारिये ब्रिथा, शोमोय बिचार कोरे, ओरे नोतून जुगेर भोरे, ऐशो ज्ञानी एशो कोर्मि नाशो भारोतो-लाज हे, बीरो धोरमे पुन्नोकोर्मे बिश्वे हृदय राजो हे। गुरुदेव यांच्या हा  उपदेश , हा उद्घोष साकार करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

गुरुदेव यांनी  विश्व भारतीची  स्थापना केवळ शिक्षणाचे एक केंद्र म्हणून केली नव्हती. ते याकडे शिकण्याचे एक पवित्र स्थान म्हणून पाहत होते. शिक्षण आणि शिकणे यात जो फरक आहे तो  गुरूदेव यांच्या केवळ एका वाक्यातून समजून घेता येऊ शकेल. ते म्हणाले होते - 'मला आठवत नाही मला काय शिकवले होते. मला तेवढेच आठवतंय जे मी शिकलो आहे. '। हे आणखी विस्ताराने सांगताना गुरुदेव टागोर म्हणाले होते - 'सर्वात मोठे शिक्षण हेच आहे जे अपल्याला केवळ माहिती देत नाही तर अपल्याला सगळ्यांबरोबर जगायला शिकवेल. " त्यांचा पूर्ण जगासाठी संदेश होता की आपण ज्ञानाला क्षेत्रांमध्ये, मर्यादांमध्ये बांधण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी यजुर्वेदच्या मंत्राला  विश्व भारतीचा  मंत्र बनवले. 'यत्र विश्वम भवत्येक नीड़म' जिथे पूर्ण जग एक घरटे बनेल. जिथे दररोज नवीन संशोधन होईल, ते स्थान जिथे सगळे एकत्रितपणे पुढे जातील, आणि जसे आपले शिक्षणमंत्री विस्ताराने सांगत होते, गुरुदेव म्हणायचे - 'चित्तो जेथा भय शुन्नो, उच्चो जेथा शिर, ज्ञान जेथा मुक्तो' म्हणजे आपण अशी एक व्यवस्था उभी करायला हवी जिथे आपल्या मनात कुठलीही भीती नसेल, आपली मान ताठ राहील आणि ज्ञान बंधनांपासून मुक्त होईल.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून हा उद्देश पूर्ण करण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे. हे शिक्षण धोरण लागू करण्यात  विश्व भारतीची मोठी भूमिका आहे. तुमच्याकडे 100 वर्षांचा  अनुभव आहे, विद्वत्ता आहे,  दिशा आहे, तत्त्वज्ञान  आहे आणि गुरूदेवांचा  आशीर्वाद तर आहेच. जितक्या जास्त शैक्षणिक संस्थांमध्ये  विश्व भारतीचा याबाबत  संवाद होईल , अन्य संस्थाची देखील  समज वाढेल, त्यांना सोपे पडेल.

मी जेव्हा गुरुदेव यांच्याबाबत बोलतो तेव्हा एका मोहापासून स्वतःला रोखू शकत नाही. गेल्यावेळी तुमच्याकडे आलो होतो तेव्हा देखील मी याचा थोडासा उल्लेख केला होता. मी पुन्हा एकदा  गुरुदेव आणि  गुजरातच्या आत्मीयतेचे  स्मरण करतो. हे पुन्हा पुन्हा आठवणे यासाठी देखील आवश्यक आहे कारण ते अपल्याला  एक भारत-श्रेष्ठ भारतच्या भावनेने भारावून टाकते. ते दाखवते की वेगवेगळ्या  भाषा, बोली , खान-पान, पेहराव असलेला आपला देश एकमेकांशी किती जोडलेला आहे. ते दाखवते की विविधतेने नटलेला आपला देश कसा एक आहे, एकमेकांपासून खूप काही शिकत आहे.

 

मित्रानो,

गुरुदेव यांचे वडील बंधू  सत्येन्द्रनाथ टैगोर जेव्हा ICS मध्ये होते तेव्हा त्यांची नियुक्ति गुजरात मधील अहमदाबाद मध्येही झाली होती. रबीन्द्रनाथ टागोर अनेकदा  गुजरातला जायचे आणि त्यांनी तिथे दीर्घकाळ वास्तव्य देखील केले होते. अहमदाबाद मध्ये राहत असताना त्यांनी आपल्या दोन लोकप्रिय बांग्ला कविता 'बंदी ओ अमार' आणि  'नीरोब रजनी देखो' केल्या होत्या. त्यांची  प्रसिद्ध रचना 'क्षुदित पाशान' चा काही भागही त्यांनी  गुजरात प्रवासदरम्यान लिहिला होता. एवढेच नाही  गुजरातची एक मुलगी  हटिसिंग गुरुदेव यांच्या घरी सून बनून देखील आली होती. याशिवाय आणखी एक  तथ्य आहे ज्यावर आपल्या महिला सक्षमीकरणाशी संबंधित संघटनांनी अभ्यास करायला हवा.  सत्येन्द्रनाथ टागोर यांची पत्नी ज्ञानंदिनी देवी जेव्हा  अहमदाबाद मध्ये राहायच्या तेव्हा त्यांनी पाहिले की स्थानिक महिला आपल्या साडीचा पदर उजव्या खांद्यावर घेतात. आता डाव्या खांद्यावर पदर असल्यामुळे  महिलाना काम करण्यात काही अडचणी यायच्या. हे पाहून  ज्ञानंदिनी देवी यांना  कल्पना सुचली की साडीच्या पदराला डाव्या खांदयावर घ्यायचे. आता मला  ठीक-ठाक तर माहित नाही मात्र असे म्हणतात की डाव्या खांद्यावर साडीचा पदर हे त्यांचीच देणगी आहे. एकमेकांकडून शिकून एकमेकांबरोबर  आनंदाने राहूनच आपण ती स्वप्ने साकार , करू शकतो जी देशातील महान  विभूतिनी पाहिली होती. हेच संस्कार गुरुदेव यांनीही  विश्वभारतीला दिले आहेत. याच संस्कारांना आपल्याला मिळून  निरंतर मजबूत करायचे आहे.

 

मित्रानो,

तुम्ही सगळे जिथे जाल , ज्या कुठल्या क्षेत्रात जाल , तुमच्याच परिश्रमातून एका नवीन भारताची निर्मिती होईल. मी  गुरुदेव यांच्या ओळींनी माझे भाषण संपवतो.  गुरुदेव म्हणाले होते , ओरे गृहो-बाशी खोल दार खोल, लागलो जे दोल, स्थोले, जोले, मोबोतोले लागलो जे दोल, दार खोल, दार खोल! देशात नव्या संधींची कवाडे तुमची प्रतीक्षा करत आहेत. तुम्ही सगळे यशस्वी व्हा पुढे जा, आणि देशाची स्वप्ने पूर्ण करा. याच शुभेच्छांसह तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार आणि हे शताब्दी वर्ष आपल्या पुढच्या प्रवासासाठी एक मजबूत मैलाचा दगड बनावा, आपल्याला नव्या उंचीवर घेऊन जावे आणि  विश्वभारतीचा जन्म ज्या स्वप्नांमुळे झाला होता ती स्वप्ने  साकार करताना  विश्व कल्याणाचा  मार्ग प्रशस्‍त करण्यासाठी भारताच्या  कल्याणाचा मार्ग मजबूत करत पुढे जा हीच माझी तुम्हा सर्वाना शुभेच्छा. खूप-खूप  धन्यवाद।

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1683450) Visitor Counter : 457