पंतप्रधान कार्यालय

असोचॅम स्थापना सप्ताह  2020 मध्ये पंतप्रधानांचे बीजभाषण

Posted On: 19 DEC 2020 6:30PM by PIB Mumbai

 

नमस्कार ,

असोचॅमचे  अध्यक्ष  निरंजन हिरानंदानी , या देशातील वरिष्ठ उद्योग जगताचे प्रेरणा पुरूष  रतन टाटा , देशातील उद्योग जगताचे  नेतृत्व करणारे सर्व सहकारी,महिला आणि पुरुष,

आपल्याकडे म्हटले जाते की कुर्वन्नेह कर्माणि जिजी-विषेत् शतं समा:! म्हणजे  कर्म करताना शंभर वर्षे जगण्याची इच्छा बाळगा.ही गोष्ट असोचॅमसाठी अगदी योग्य ठरते. गेल्या  100 वर्षांमध्ये तुम्ही सर्वजण देशाच्या अर्थव्यवस्थेला,कोट्यवधी भारतीयांचे जीवनमान सुधारण्याचे काम करत आहात. हीच गोष्ट रतन टाटा यांच्याबाबत,संपूर्ण टाटा समूहासाठी तेवढीच समर्पक आहे. भारताच्या विकासात टाटा कुटुंबाला, टाटा समूहाला त्यांच्या योगदानासाठी आज इथे गौरवण्यात आले आहे. टाटा समूहाची देशाच्या विकासात खूप मोठी भूमिका आहे.

मित्रानो,

मागील 100 वर्षांमध्ये तुम्ही स्वातंत्र्याच्या लढ्यापासून देशाच्या विकास प्रवासाच्या प्रत्येक चढ-उतारात भागीदार राहिले आहात.असोचॅमच्या स्थापनेची सुरुवातीची 27 वर्षे गुलामगिरीच्या काळात व्यतीत झाली.त्याकाळी देशाचे स्वातंत्र्य हे सर्वात मोठे उद्दिष्ट होते. त्यावेळी तुमच्या स्वप्नांची झेप बेड्यांमध्ये अडकली होती. आता असोचॅमच्या आयुष्यात जी पुढची 27 वर्षे येणार आहेत ती खूपच महत्वपूर्ण आहेत. 27 वर्षांनंतर 2047 मध्ये देश आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करेल.तुमच्यासाठी  आता  शृंखला नाहीत,आकाशाला गवसणी घालण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि तुम्हाला याचा पूर्ण लाभ उठवायचा आहे. आता आगामी वर्षांमध्ये आत्मनिर्भर भारतासाठी तुम्हाला पूर्ण शक्ती उपयोगात आणायची आहे. सध्या जग चौथ्या औद्योगिक क्रांतिच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या रूपाने आव्हाने देखील येतील आणि अनेक नवीन सोपे उपाय देखील सापडतील आणि म्हणूनच आज ती वेळ आहे जेव्हा आपल्याला नियोजनही करायचे आहे आणि कृती  देखील करायची आहे. आपल्याला प्रत्येक वर्षाचे प्रत्येक उद्दिष्ट राष्ट्रबांधणीच्या मोठ्या उद्दिष्टाशी जोडायचे आहे. 

मित्रानो,

आगामी  27 वर्षे केवळ भारताची जागतिक भूमिका ठरवणारीच नाहीत तर ती आपल्या भारतीयांची स्वप्ने आणि समर्पण या दोन्हीची कसोटी पाहणारी आहेत. ही वेळ  भारतीय उद्योगाच्या रूपात तुमची क्षमता,वचनबद्धता आणि धैर्य एकदा जगाला विश्वासाने दाखवण्याची आहे आणि आपले आव्हान केवळ स्वयंपूर्णता एवढेच नाही तर आपण हे उद्दिष्ट किती लवकर साध्य करतो ते देखील तेवढेच  महत्वपूर्ण आहे.

 मित्रानो,

भारताच्या यशाबाबत आज जगात जितकी सकारात्मकता आहे, तेवढी बहुधा यापूर्वी कधीही नव्हती. ही सकारात्मकता  130 कोटींहून अधिक भारतीयांच्या अभूतपूर्व आत्मविश्वासातून  आली आहे.आता पुढे जाण्यासाठी भारत नवीन मार्ग तयार करत आहे , नव्या उर्जेसह  पुढे जात आहे. 

मित्रानो,

प्रत्येक क्षेत्रासाठी सरकारचे धोरण काय आहे, रणनीति काय आहे आणि आताच्या स्थितीत काय बदल झाला आहे याबाबत मागील अधिवेशनात सरकारचे मंत्री अन्य सहकाऱ्यांनी  तुम्हा सर्वांबरोबर सविस्तर चर्चा केली आहे. एके काळी आपल्याकडे जी  परिस्थिती होती त्यानंतर असे म्हटले जात होते - भारत का ?.आता देशात ज्या सुधारणा झाल्या आहेत, त्यांचा जो प्रभाव दिसला आहे ,त्यानंतर म्हटले जात आहे -भारत का नाही ? आता जसे यापूर्वी म्हटले जात होते, जेव्हा कराचे दर चढे होते, तेव्हा भारत का ? आज तेच लोक म्हणत आहेत जिथे सर्वात जास्त स्पर्धात्मक कराचे दर आहेत तर भारत का नाही? यापूर्वी नियमन आणि नियमांचे जाळे होते त्यामुळे स्वाभाविकपणे गुंतवणूकदार चिंतीत होऊन विचारायचे भारत का ? आज तेच म्हणत आहेत की  कामगार कायद्यात पालन सुलभता आहे,तर भारत का नको ? पूर्वी प्रश्न उपस्थित केला जायचा की  एवढा लाल फितीचा कारभार आहे तर भारत कशाला? आता तेच लोक जेव्हा लाल गालिचा पसरलेला पाहतात तेव्हा म्हणतात,भारत का नको ? पूर्वी तक्रार असायची  कि नाविन्यपूर्ण संशोधनाची संस्कृती तेवढी नाही त्यामुळे भारत कशाला? आज भारताच्या स्टार्ट -अप परिसंस्थेची ताकद पाहून जग विश्वासाने म्हणत आहे ,भारत का नको? पूर्वी विचारले जायचे की प्रत्येक कामात एवढा सरकारी हस्तक्षेप आहे तर भारत का ? आज जेव्हा खासगी सहभागावर विश्वास ठेवला जात आहे , परदेशी गुंतवणूकदारांना प्रोत्साहित केले जात आहे , तेव्हा तेच  लोक विचारत आहेत भारत का नको? पूर्वी तक्रार असायची की डिजिटल पायाभूत सुविधांच्या अभावी काम शक्य नाही,तर भारत कशासाठी? आज जेव्हा इतकी आधुनिक डिजिटल परिसंस्था आपल्याकडे आहे तर भावना आहे भारत का नको?

 मित्रानो,

नवीन भारत आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवत,आपल्या संसाधनांवर विश्वास ठेवत आत्मनिर्भर भारताला पुढे नेत आहे आणि या उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी निर्मितीवर आमचा विशेष भर आहे. निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही निरंतर सुधारणा हाती घेत आहोत. सुधारणांबरोबरच प्रोत्साहन  हे देखील आज देशाच्या धोरणाचे महत्वपूर्ण माध्यम बनवण्यात आले आहे. प्रथमच  10 पेक्षा अधिक क्षेत्रे कार्यक्षमता आणि उत्पादकता आधारित प्रोत्साहनाच्या कक्षेत आणण्यात आली आहेत .मला आनंद आहे की खूप कमी काळातच याचे सकारात्मक परिणाम देखील पाहायला मिळत आहेत. अशाच प्रकारे उत्तम संपर्क,उत्तम सुविधा आणि वाहतूक स्पर्धात्मक बनवण्यासाठी कऱण्यात येत असेलेले सर्व प्रयत्न देखील उद्योगांसाठी प्रोत्साहन आहेत. आपल्या लाखो एमएसएमई साठी, त्यांची व्याख्या बदलणे असो,निकष बदलणे असो, सरकारी कंत्राटांमध्ये प्राधान्य असो, किंवा तरलतेशी  संबंधित समस्यांचे निराकरण करणे असो, हे देखील खूप मोठे  प्रोत्साहनच आहे.

मित्रानो,

देश आज कोट्यवधी युवकांना संधी देणाऱ्या उद्योग आणि संपत्ती निर्मात्यांबरोबर आहे.  आज भारतातील  युवक नवसंशोधन, स्टार्टअप जगात आपली ओळख निर्माण करत आहेत. सरकारची एक कार्यक्षम आणि मैत्रीपूर्ण परिसंस्था निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. आता असोचॅम सारख्या संस्थांनी, तुमच्या प्रत्येक सदस्याने देखील हे  सुनिश्चित करायचे आहे की याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचेल. यासाठी उद्योगामध्येही तुम्हाला सुधारणांना प्रोत्साहन द्यावे लागेल. जे बदल आपण आपल्यासाठी पाहू इच्छितो तेच बदल आपल्याला आपल्या संस्थांमध्येही करावे लागतील.जितके स्वातंत्र्य, जेवढी समावेशकता ,जेवढे मार्गदर्शन,जितकी पारदर्शकता ,तुम्हाला सरकारकडून , समाजाकडून हवी आहे तेवढेच उद्योगांमध्येही महिलांसाठी,युवा प्रतिभेसाठी,छोट्या उद्योगांसाठी आपणा सर्वाना  सुनिश्चित करायचे आहे. आपल्याला कॉर्पोरेट प्रशासनापासून नफा विभागणी पर्यंत जगातील सर्वोत्तम पद्धती लवकरात लवकर स्वीकाराव्या लागतील. नफा केंद्री दृष्टिकोनाबरोबरच आपण त्याला उद्देशकेन्द्रीही  बनवले तर समाजाबरोबर अधिक एकीकरण शक्य होऊ शकेल.

मित्रानो,

उत्तम निर्णय प्रक्रियेत प्रामाणिक मताची किती मोठी भूमिका असते हे तुमच्यापेक्षा चांगले कोण समजू शकते. अनेकदा आपल्याला लोक भेटतात, म्हणतात की हे समभाग चांगले आहेत, हे क्षेत्र उत्तम आहे, यात गुंतवणूक करा. मात्र आपण आधी हे पाहतो की तो सल्ला देणारा , प्रशंसा करणारा स्वतः त्यात गुंतवणूक करतो की  नाही? हीच गोष्ट अर्थव्यवस्थेला देखील लागू होते. आज भारतीय अर्थव्यवस्थेवर जगाचा विश्वास आहे, त्याचे पुरावे आहेत. महामारीदरम्यान जेव्हा संपूर्ण जग गुंतवणूक करण्यासाठी चिंताग्रस्त होते तेव्हा भारतात विक्रमी थेट परदेशी  गुंतवणूक आणि परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक झाली. जगाचा हा विश्वास नव्या पातळीवर पोहचावा,यासाठी देशात देखील आपल्याला गुंतवणूक अनेक पटींनी वाढवावी लागेल. आज तुमच्याकडे प्रत्येक क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी क्षमता देखील आहेत आणि संधी देखील आहे.

मित्रांनो,

गुंतवणूकीची आणखी एक बाजू आहे आणि त्याची चर्चा होणे आवश्यक आहे. ही बाजू आहे, संशोधन आणि विकास- आर अँड डीयामध्ये होणारी गुंतवणूक. भारतामध्ये संशोधन आणि विकास यामध्ये गुंतवणूक वाढविण्याची खूप गरज आहे. अमेरिकेसारख्या देशामध्ये जिथे संशोधन आणि विकास या गोष्टींवर 70 टक्के खाजगी क्षेत्रातून गुंतवणूक होते. आपल्याकडे इतकीच गुंतवणूक सार्वजनिक क्षेत्रातून केली जात आहे. यामध्येही एक मोठा भाग माहिती तंत्रज्ञान, औषध निर्माण आणि वाहतूक या क्षेत्रांमध्ये आहे. याचा अर्थ आज खरी गरज संशोधन आणि विकास यासाठी खाजगी क्षेत्रामध्ये भागीदारी वाढण्याची आहे. कृषी, संरक्षण, अंतराळ, ऊर्जा, बांधकाम म्हणजेच प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक लहान-मोठ्या कंपन्यांनी संशोधन आणि विकास यासाठी एक विशिष्ट निधी निश्चित केला पाहिजे.

मित्रांनो,

आज ज्यावेळी लोकल’- स्थानिक गोष्टी ग्लोबल’-वैश्विक बनविण्यासाठी आपण युद्धपातळीवर काम करीत पुढे जात आहोत. अशा वेळी आपल्याला प्रत्येक भौगोलिक-राजकीय विकासावर वेगाने प्रतिक्रियात्मक कार्य करावे लागणार आहे. यासाठी एक प्रभावी यंत्रणा असणे गरजेचे आहे. यामध्ये आपण परराष्ट्र मंत्रालयाचीही मदत घेऊ शकता. कोविड-19 महामारीच्या संकटकाळामध्ये आम्ही पाहिले आहे की, परराष्ट्र मंत्रालयाच्या संपूर्ण नेटवर्कचा अतिशय चांगला उपयोग केला गेला, त्यामुळे आम्ही वेगाने आपली लक्ष्यपूर्ती करू शकलो. परराष्ट्र मंत्रालय, वाणिज्य आणि व्यापार आणि असोचॅमसारख्या उद्योग व्यावसायिकांच्या संघटना यांच्यामध्ये चांगले संतुलन आणि समन्वय निर्माण करणे ही आजच्या काळाची मागणी- गरज आहे. आपल्या सर्वांना माझा आग्रह आहे की, वैश्विक परिवर्तनाविषयी वेगाने प्रतिक्रियात्मक कृती करण्यासाठी, वेगाने प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा कशा पद्धतीने चांगली करता येईल, यासाठी आपण सर्वांनी आवश्य कल्पना, शिफारसी सुचवाव्या. तुमच्या कल्पना माझ्यासाठी अतिशय मौल्यवान ठरणार आहेत.

मित्रांनो,

भारत आपल्या आवश्यकता पूर्ण करीत असतानाच आता जगाला मदत करण्यासाठीही सक्षम आहे. कृषी उत्पादनापासून ते औषधांपर्यंत, भारताने हे कार्य करून दाखवले आहे. कोरोना काळामध्येही अनेक संकटे, आव्हाने आली, तरीही भारताने जगाला औषधे पुरविण्याची जबाबदारी पार पाडली आणि जगामध्ये जिथे जिथे गरज निर्माण झाली, तिथे तिथे औषधे पोहोचवली. आता कोरोनाविरोधी लसीकरणाबाबतही भारत आपली गरज पूर्ण तर करणार आहेच, त्याचबरोबर जगातल्या अनेक देशांच्या अपेक्षा, आकांक्षांअनुसार कार्य करेल.

मित्रांनो,

ग्रामीण भाग आणि शहरी भाग यांच्यामधली दरी-अंतर कमी करण्यासाठी जे प्रयत्न सरकार गेल्या सहा वर्षांपासून करीत आहेउद्योग त्या प्रयत्नांमध्ये अनेकपट वाढ करू शकतात. असोचॅमचे सदस्य आमच्या गावातल्या उत्पादनांना वैश्विक मंच देण्यासाठी खूप मोठी मदत करू शकतात. आजकाल आपण सर्वजण पाहत असणार, ऐकत असणारकाही अभ्यासांचे निष्कर्ष काढले जात आहेत की, अमूक एका गोष्टीमध्ये भरपूर प्रोटीन- प्रथिने आहेत. एखादे उत्पादन प्रोटिनरिच- म्हणजेच प्रथिनांनी समृद्ध आहे, असे समजले की, लोक त्याचे सेवन सुरू करतात. आपण त्याचे आयात करायला लागतो. आपल्याला लक्षात येत नाही, काही समजत नाही की, आपल्या घरामध्ये, आपल्या टेबलावर, आपल्या भोजनाच्या ताटामध्ये कशा प्रकारे परदेशी पदार्थ, अन्नघटक घुसतात. आपल्याकडे देशामध्ये तर अशा अनेक गोष्टींचे खूप मोठे भांडार आहे. आणि हा खजिना, देशातल्या शेतक-यांकडे आहे. देशातल्या गावांमध्ये आहे. आपली सेंद्रिय शेती, वनौषधी उत्पादने, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांना असोचॅमव्दारे प्रोत्साहन दिले पाहिजे. जगाच्या बाजारपेठेत भारतातल्या उत्पादनाचा डंका वाजला पाहिजे. यासंबंधित स्पर्धा असली पाहिजे इतकेच नाही तरसातत्याने स्पर्धा झाली पाहिजे. स्पर्धांचे आयोजन करून त्यांचा प्रचार- प्रसार केला पाहिजे. त्यांच्या स्टार्ट अप्सना प्रोत्साहन देण्याचे काम, तुम्ही करू शकता. भारत सरकार असो, राज्य सरकार असो, कृषी संघटना असो, सर्वांनी मिळून या दिशेने कार्य करण्याची आवश्यकता आहे. जर आपल्या कृषी क्षेत्राला आपण चांगले प्रोत्साहन दिले, आणि शेती करण्यासाठी चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या, चांगली बाजारपेठ मिळाली, तर आपली संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था एका विक्रमी उंचीवर जाऊन पोहोचणार आहे.

मित्रांनो,

21व्या शतकाच्या प्रारंभी अटलजींनी संपूर्ण भारताला महामार्गांनी जोडण्याचे लक्ष्य निश्चित केले होते. आज देशामध्ये प्रत्यक्ष आणि डिजिटल पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. गावातल्या शेतकऱ्याची पोहोचही डिजिटली ग्लोबल मार्केटपर्यंत आहे, यासाठी देशाच्या प्रत्येक गावांपर्यंत ब्रॉडबँड संपर्क व्यवस्था निर्माण करण्याचे काम आपले सरकार करीत आहे. याचप्रमाणे आपल्या आयटी क्षेत्राला आणखी ताकद देण्यासाठी आयटी आणि बीपीओ क्षेत्रातल्या अडचणी, समस्याही आम्ही दूर केल्या आहेत. डिजिटल स्पेससुरक्षिततेसाठी एका पाठोपाठ एक पावले उचलण्यात येत आहेत.

मित्रांनो,

उत्कृष्ट पायाभूत सुविधांच्या निर्माणासाठी निधीशी संबंधित प्रत्येक संधीचा, मार्गाचा उपयोग करता येऊ शकतो. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना बळकट करणे, बाँड मार्केटच्या शक्यता वाढविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. याच प्रमाणे सॉव्हर्जिन वेल्थ फंड आणि पेन्शन फंड यांना करामध्ये सवलती दिल्या जात आहेत. स्थावर मालमत्ता संपत्तीमध्ये आणि पायाभूत सुविधा गुंतवणूक न्यासाला प्रोत्साहन दिले जात आहे. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांशी जोडले गेलेल्या मालमत्तांमधून कमाई कशी होऊ शकते, हे पाहिले जात आहे.

मित्रांनो,

उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा देणे, उद्योग व्यवसायासाठी योग्य वातावरण तयार करण्याचे काम सरकार करू शकते. सरकार प्रोत्साहन देऊ शकते, सरकार धोरणांमध्ये परिवर्तन आणू शकते. परंतु आपल्यासारखे उद्योगांशी जोडले गेलेले सहकारी आहेत, ते या पाठिंब्याला, समर्थनाला यशामध्ये परिवर्तित करू शकतात. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी नियम-कायद्यांमध्ये जे काही आवश्यक असतील ते बदल करण्याचे देशाचे मन तयार झाले आहे. यासाठी देश कटिबद्ध आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये आम्ही 1500 पेक्षा जास्त जुने कायदे संपुष्टात आणले आहेत. देशाच्या गरजा, आवश्यकता लक्षात घेऊन कायदे बनविण्याचे कामही निरंतर सुरू आहे. सहा महिन्यांपूर्वी ज्या कृषी सुधारणा करण्यात आल्या आहेत, त्याचे लाभही आता शेतकरी बांधवांना मिळायला लागला आहे. आपण सर्वांनी आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासाठी एकनिष्ठ होऊन, संकल्प करून पुढची वाटचाल करायची आहे. असोचॅमच्या आपल्या सर्व सहकार्यांना आगामी वर्षांसाठी माझ्यावतीने खूप-खूप शुभेच्छा. रतन टाटा जी यांनाही माझ्यावतीने खूप-खूप शुभेच्छा आणि असोचॅमने नवीन विक्रमी उंची गाठावी आणि सन 2047 मध्ये, म्हणजे स्वातंत्र्याचे शतक साजरे करताना पुढच्या 27 वर्षांत गाठायच्या आपल्या त्या लक्ष्यासाठी आजचा हा आपला शताब्दी कार्यक्रम संपन्न होत आहे, असा मला पूर्ण विश्वास आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप-खूप धन्यवाद!

आभार!!

 

N.Chitale/S.Thakur/S.Kane/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1682004) Visitor Counter : 207