जलशक्ती मंत्रालय
जलशक्ती मंत्रालयाकडून राष्ट्रीय जल पुरस्कार-2020 साठी प्रवेशिका आमंत्रित
अर्ज सादर करण्याची अखेरची तारीख 10 फेब्रुवारी 2021
Posted On:
09 DEC 2020 7:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 9 डिसेंबर 2020
जल स्त्रोत व्यवस्थापन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्याचा सर्वांना परिचय करून देण्यासाठी जल शक्ती मंत्रालयाने जल स्त्रोत, नदी विकास आणि गंगा शुद्धीकरण विभागाच्यावतीने 2020चे राष्ट्रीय जल पुरस्कार देण्यासाठी प्रवेशिका आमंत्रित केल्या आहेत. वर्ष 2020 मध्ये विविध 11 गटांमध्ये राष्ट्रीय जल पुरस्कार देण्यात येणार आहेत. हे गट पुढीलप्रमाणे आहेत.
- सर्वोत्कृष्ट राज्य
- सर्वोत्कृष्ट जिल्हा (प्रत्येक विभागामध्ये 2 पुरस्कार ; एकूण 10 पुरस्कार)
- सर्वोत्कृष्ट ग्राम पंचायत (पाच विभागामध्ये 3 पुरस्कार; एकूण 15 पुरस्कार)
- सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था
- सर्वोत्कृष्ट प्रसार माध्यम (छापील आणि इलेक्ट्रॉनिक)
- सर्वोत्कृष्ट शाळा
- सर्वोत्कृष्ट संस्था / आरडब्ल्यूए / परिसरामध्ये वापर करणा-या धार्मिक संघटना
- सर्वोत्कृष्ट उद्योग
- सर्वोत्कृष्ट बिगर-सरकारी संस्था (एनजीओ)
- सर्वोत्कृष्ट पाणी वापर करणारी संघटना आणि
- सर्वोत्कृष्ट सामाजिक दायित्व निभावण्यासाठी उपक्रम राबविणारे उद्योग
सर्वोकृष्ट जिल्हा आणि सर्वोकृष्ट ग्राम पंचायत श्रेणीमध्ये उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि उत्तर-पूर्व असे पाच विभाग असून त्या प्रत्येक विभागामध्ये स्वतंत्र पुरस्कार देण्यात येणार आहेत.
या 11 वर्गांमध्ये मिळून एकूण 52 पुरस्कार देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट राज्य तसेच सर्वोत्कृष्ट जिल्हा पुरस्कारांव्यतिरिक्त उर्वरित 9 गटांमध्ये प्रथम, व्दितीय आणि तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये अनुक्रमे दोन लाख रूपये, दीड लाख आणि एक लाख रुपये रोख पुरस्काराचा समावेश आहे.
या पुरस्कारांचा उद्देश्य बिगर-सरकारी संघटना (एनजीओ), ग्राम पंचायत, शहरी स्थानिक संस्था, पाणी वापरकर्ते संघटना, संस्था, कॉर्पोरेट, व्यक्ती यांच्यासह सर्व हितधारकांना प्रोत्साहन देणे हा आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता, तेच पुन्हा जमिनीमध्ये भरण करण्याच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. अशा पद्धतीने जलभरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले तर भूजल पातळी सुधारण्यास मदत मिळणार आहे. पावसाच्या पाण्याची ही एक प्रकारे शेती आहे. याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पुनर्वापर करणे गरजेचे आहे. चांगल्या भविष्यासाठी जलस्त्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे, यासाठी जल शक्ती मंत्रालयाने या पुरस्कारांची योजना केली आहे.
राष्ट्रीय जल पुरस्कार 2020 साठी संबंधितांनी आपले अर्ज दि. 10 फेब्रुवारी, 2021पर्यंत पाठवावेत. किंवा मायगव्ह मार्फत अर्ज सादर करावेत. यासाठी संकेत स्थळ - https://mygov.in
इच्छुकांना केंद्रीय भू-जल मंडळाच्या ईमेल पत्त्यावरही अर्ज सादर करता येणार आहेत. त्यासाठी ईमेल पत्ता – nationalwaterawards[at]gmail[dot]com.
या पुरस्कारासाठी ऑनलाइन आलेल्या अर्जांचाच फक्त विचार करण्यात येणार आहे.
* * *
G.Chippalkatti/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1679479)
Visitor Counter : 142