पंतप्रधान कार्यालय

इंडिया मोबाईल काँग्रेस 2020 मध्ये पंतप्रधानांचे भाषण

भारताला टेलिकॉम उपकरणे, डिझाईन, विकास आणि उत्पादन या क्षेत्रात जागतिक केंद्र बनवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत: पंतप्रधान

भविष्याकडे झेप घेण्यासाठी 5-जी सेवेची वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित व्हावी : पंतप्रधान

इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या योग्य विघटनासाठी आणि चक्राकार अर्थव्यवस्थेसाठी कृती दलाची स्थापना आवश्यक

Posted On: 08 DEC 2020 2:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2020

इंडिया मोबाईल काँग्रेस 2020’ च्या उद्‌घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. यंदाच्या इंडिया मोबाईल कॉग्रेसची संकल्पना आहे-‘सर्वसमावेशक नवोन्मेष: स्मार्ट, सुरक्षित, शाश्वत’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार आत्मनिर्भर भारत’, ‘डिजिटल एकात्मिकता’ आणि ‘शाश्वत विकास, उद्यमशीलता आणि नवोन्मेष’ या उपक्रमांशी सुसंगत अशी संकल्पना ठेवण्यात आली आहे. दूरसंचार आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात परदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूक आकर्षित करणे, संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देणे हा ही या परिषदेचा उद्देश आहे.

यावेळी बोलताना, पंतप्रधान मोदी यांनी भारताला दूरसंचार उपकरणे, डिझाईन, विकास आणि उत्पादन या क्षेत्रात जागतिक केंद्र बनवण्यासाठी एकत्रित काम करण्याचे आवाहन केले. तंत्रज्ञान सातत्याने अद्ययावत होत असल्यामुळे आपल्याला सतत आपले मोबाईल्स आणि इतर उपकरणे बदलून नवे घेण्याची सवय जडते आहे, असा सावधगिरीचा इशारा त्यांनी दिला. अशावेळी जमा होणाऱ्या प्रचंड ई-कचऱ्याची शास्त्रशुध्द विल्हेवाट लावण्यासाठी आणि चक्राकार अर्थव्यवस्थेची निर्मिती करण्यासाठी एखाद्या कृती दलाची स्थापना करता येईल का? याविषयी टेलिकॉम उद्योगांनी विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली. भविष्याकडे झेप घेण्यासाठी आणि लाखो भारतीयांना सक्षम करण्यासाठी 5-जी सेवा लवकरात लवकर सुरु करणे सुनिश्चित करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

तंत्रज्ञानातील आगामी क्रांतीमुळे लोकांच्या जीवनमानात सुधारणा कशी करता येईल याचा विचार आणि नियोजन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. उत्तम आरोग्यसुविधा, उत्तम शिक्षणव्यवस्था, आपल्या शेतकऱ्यांना उत्तम माहिती आणि संधींची उपलब्धता, छोट्या व्यवसायांनाही बाजारात चांगल्या संधी मिळवून देणे या उद्दिष्टांवर काम करायला हवे आहे, असे पंतप्रधान म्हणाले. 

कोविडच्या काळातही टेलिकॉम क्षेत्रातल्या लोकांचे अभिनव उपक्रम आणि प्रयत्नांमुळेच जग कार्यरत होते असं सांगत या क्षेत्रातल्या प्रतिनिधींचे त्यांनी आभार मानले. त्त्यांच्याच प्रयत्नामुळे एका ठिकाणी अडकलेला मुलगा आपल्या आईशी संवाद साधू शकला, वर्गात न जाताही विद्यार्थी शिक्षकांकडून शिक्षण घेऊ शकले, रुग्ण आपल्या डॉक्टरकडून घरबसल्या सल्ला घेऊ शकले आणि व्यापारी ऑनलाईन पद्धतीने विविध प्रकारच्या ग्राहकांशी जोडले जाऊ शकले, असे पंतप्रधान म्हणाले.

अनेक युवा तंत्रज्ञ आज कोडींग क्षेत्रात आहे, ज्याद्वारे कोणत्याही स्वयंउद्योजकाला त्याचे उत्पादन विशेष करण्यासाठी कोडींग ची पद्धत वापरली जाते. काही स्वयं उद्योजकांसठी ही संकल्पना अत्यंत महत्वाची आहे. एखाद्या उत्पादनात भांडवल अत्यंत महत्वाचे असून त्यासाठी काम सुरु आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र त्याही पलीकडे, या उत्पादनासाठी जनतेची मदत आणि युवकांची दृढ इच्छाशक्ती अधिक महत्वाची आहे, असे पंतप्रधान म्हणाले. अनेकदा, केवळ नफा मिळवणे आणि आपली विशिष्ट, सर्वोच्च जागा तयार करणे, अशी इच्छाशक्ती हीच ताकद ठरते.

मोबाईल तंत्रज्ञानामुळेच आम्ही आज लक्षावधी भारतीयांच्या खात्यात अब्जावधी रुपये जमा करू शकतो, आणि त्यामुळेच गरीब-वंचित आणि गरजूंना कोविडकाळात थेट मदत आणि अन्नधान्य पुरवठा करू शकलो आहोत, असे त्यांनी सांगितले. आता देशात अब्जावधी व्यवहार रोकडरहित होतात, ज्यामुळे अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणी सुनियोजितता आली आहे, असेही मोदी म्हणाले.

भारताने मोबाईल उत्पादन क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले मोबाईल उत्पादनाच्या क्षेत्रात, भारत जगभरातील गुंतवणूकदारांच्या आकर्षणाचे केंद्र बनत आहे, असेही मोदी पुढे म्हणाले. उत्पादन-संलग्न प्रोत्साहन योजनेची सुरुवात, दूरसंचार क्षेत्रातल्या उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. येत्या तीन वर्षात देशातल्या प्रत्येक गावात जलद गतीची इंटरनेट सेवा पोहोचवण्यासाठी हाय स्पीड फायबर ऑप्टीक  जोडण्या देण्याचे काम सुरु आहे. हे काम संपल्यावर, अशा इंटरनेटचा सर्वोत्तम वापर करणाऱ्या क्षेत्रांमध्ये-जसे, विकासोत्सुक जिल्हे, माओवादी ग्रस्त भाग, ईशान्य भारतातील राज्ये, लक्षद्वीप बेटे अशा ठिकाणी विशेष लक्ष दिले जाईल. त्याशिवाय फिक्स्ड लाईन ब्रॉडब्रँड आणि सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट मधेही जलद गती इंटरनेट सेवा सुनिश्चित केली जाईल, असे पंतप्रधान म्हणाले.

 

U.Ujgare/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1679054) Visitor Counter : 62