पंतप्रधान कार्यालय
उत्तर प्रदेशात ग्रामीण पेयजल पुरवठा प्रकल्पांच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
22 NOV 2020 8:54PM by PIB Mumbai
जेव्हा आयुष्यातील एक मोठी समस्या सुटायला लागते तेव्हा एक वेगळाच विश्वास दिसायला लागतो. तुम्हा सर्वांशी संवाद साधण्याचा जो कार्यक्रम आखण्यात आला होता, तंत्रज्ञानात बाधा आल्यामुळे मी प्रत्येकाशी बोलू शकलो नाही, मात्र मी तुम्हाला पाहू शकत होतो. जणू काही तुमच्या घरात एक खूप मोठा सण आहे आणि ज्या प्रकारे घरी कपडे परिधान केले जातात, नटणे-मुरडणे , ते सगळे मला दिसत होते. म्हणजेच तुमच्यात किती उत्साह आणि उमेद भरलेली आहे , ती मी इथून पाहत होतो. हा उत्साह, ही उमेद यावरून या योजनेचे महत्व किती मोठे आहे, पाण्याप्रती तुम्हा लोकांची संवेदनशीलता किती आहे, जणू काही कुटुंबात लग्न समारंभ आहे असे वातावरण तुम्ही निर्माण केले आहे.
याचा अर्थ असा होतो कि सरकार तुमच्या समस्या जाणून आहे, समस्या सोडवण्यासाठी योग्य दिशेने पुढे जातही आहे आणि जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाला आहात , उत्साह-उमेदीसह सहभागी झाले आहात, त्यामुळे मला अगदी खात्री आहे कि योजना- जसे ठरले आहे त्यापेक्षा लवकर पूर्ण होईल, तुम्ही कदाचित पैसे देखील वाचवाल आणि चांगले काम कराल. कारण जेव्हा लोकसहभाग असतो, तेव्हा खूप चांगला परिणाम दिसून येतो.
माता विंध्यवासिनीची आपणा सर्वांवर विशेष कृपा आहे ज्यामुळे आज या भागातील लाखों कुटुंबांसाठी या मोठ्या योजनेची सुरुवात होत आहे. या योजनेअंतर्गत लाखों कुटुंबांना त्यांच्या घरात नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल. या आयोजनात आपल्याबरोबर सहभागी झालेले उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल ,सोनभद्र मध्ये उपस्थित उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्रीमंडळातील माझे सहकारी गजेंद्र सिंह, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री भाई महेंद्र सिंह, अन्य मंत्रिगण, खासदार आणि आमदार, विंध्य क्षेत्रातील सर्व बंधू आणि भगिनींचे मी खूप-खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
विंध्य पर्वताचा हा पूर्ण विस्तार प्राचीन काळापासूनच विश्वास, पावित्र्य, आस्थेचे एक खूप मोठे केंद्र आहे. उत्तर प्रदेशमधील अनेकांना माहित आहे, रहीमदास यांनी काय म्हटले होते . रहीम दास यांनी देखील सांगितले - ‘जापर विपदा परत है, सो आवत यही देश!’
बंधू आणि भगिनींनो,
रहीमदास यांच्या या विश्वासाचे कारण, या भागात अपार संसाधने होती, इथे अनेक संधी होत्या. विंध्यांचल इथून क्षिप्रा, वैनगंगा, सोन, महानद, नर्मदा, कितीतरी नद्यांचे प्रवाह इथून वाहतात. गंगा माता, बेलन आणि कर्मनाशा नद्यांचे देखील आशीर्वाद या क्षेत्राला लाभले आहेत. मात्र स्वातंत्र्यानंतर अनेक दशके जर कुणाला उपेक्षेचा त्रास सोसावा लागला आहे तर ते हे क्षेत्र आहे. विंध्याचल असो, बुंदेलखंड असो, हे पूर्ण क्षेत्र असो, संसाधने असूनही ते टंचाईचे क्षेत्र बनले आहे. इतक्या नद्या असूनही त्याची ओळख सर्वधिक तहानलेले आणि दुष्काळी क्षेत्र अशी आहे. या कारणामुळे अनेक लोकांना इथून पलायन देखील करावे लागले.
मित्रांनो,
मागील काही वर्षात विंध्याचलची ही सर्वात मोठी समस्या दूर करण्यासाठी सातत्याने काम करण्यात आले. इथे घराघरात पाणी पोहचवणे आणि सिंचन सुविधांची निर्मिती याच प्रयत्नांचा एक खूप महत्वपूर्ण भाग आहे. गेल्या वर्षी बुंदेलखंड येथे पाण्याशी संबंधित खूप मोठ्या प्रकल्पावर काम सुरु झाले होते, ज्यावर वेगात काम सुरु आहे. आज साडे 5 हजार कोटी रुपयांच्या विंध्य पाणीपुरवठा योजनेची पायाभरणी देखील झाली आहे.
या प्रकल्पासाठी सोनभद्र आणि मिर्झापूर जिल्ह्यांचे लाखो सहकारी आणि विशेषतः माता-भगिनी-मुलींचे खूप-खूप अभिनंदन करण्याचा हा प्रसंग आहे. आणि आज जेव्हा मी या भागातील लोकांशी बोलत आहे, तेव्हा माझे खूप जुने मित्र स्वर्गीय सोनेलाल पटेल यांची आठवण येणे स्वाभाविक आहे. ते या भागातील पाण्याच्या समस्येबाबत खूप चिंतीत होते. या योजना सुरु होताना पाहताना आज सोनेलाल यांच्या आत्म्याला, जिथे कुठे असेल, खूप आनंद झाला असेल आणि ते देखील आपणा सर्वांवर आशीर्वादाचा वर्षाव करत असतील.
बंधू आणि भगिनींनो,
आगामी काळात जेव्हा इथल्या 3 हजार गावांना पाईपद्वारे पाणी पोहचेल तेव्हा 40 लाखांपेक्षा अधिक मित्रांचे आयुष्य बदलून जाईल. यामुळे उत्तर प्रदेशातील प्रत्येक घरात पाणी पोहचवण्याच्या संकल्पाला देखील खूप बळ मिळेल. हा प्रकल्प कोरोना संक्रमणातही विकास यात्रा वेगाने पुढे नेणाऱ्या उत्तर प्रदेशाचे देखील एक उदाहरण आहे. पूर्वी जे लोक उत्तर प्रदेश बाबत आडाखे बांधत होते, अंदाज वर्तवत होते; आज ज्याप्रकारे उत्तर प्रदेशात एकापाठोपाठ एक योजना लागू होत आहेत, उत्तर प्रदेशची, उत्तर प्रदेश सरकारची, उत्तर प्रदेश सरकारच्या कर्मचाऱ्यांची छबी पूर्णपणे बदलत आहे.
या काळात ज्याप्रकारे उत्तर प्रदेशात कोरोनाचा सामना केला जात आहे, बाहेरून गावी परतलेल्या श्रमिक कामगारांकडे लक्ष देण्यात आले, त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करण्यात आली, हे काही सामान्य काम नाही आहे. एवढ्या मोठ्या प्रदेशात एवढ्या बारकाईने प्रत्येक आघाडीवर काम करणे, उत्तर प्रदेशाने कमाल करून दाखवली आहे. मी उत्तर प्रदेशच्या जनतेचे, उत्तर प्रदेश सरकारचे आणि योगी यांच्या संपूर्ण टीमचे खूप-खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
प्रत्येक घरात पाणी पोहचवण्याच्या अभियानाला आता सुमारे एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. या काळात देशात 2 कोटी 60 लाख पेक्षा अधिक कुटुंबांना त्यांच्या घरात नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आणि यामध्ये लाखो कुटुंबे आपल्या उत्तर प्रदेशातील आहेत.
आम्ही आपल्या गावांमध्ये राहणारे गावकरी, आपल्या बंधू आणि भगिनींसाठी शहरांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निरंतर प्रयत्न करत आहोत. आज जे प्रकल्प सुरु होत आहेत त्यामुळे या अभियानाला अधिक गती मिळेल. याशिवाय अटल भूजल योजने अंतर्गत पाण्याची भूजल पातळी वाढवण्यासाठी जे काम होत आहे ते देखील या भागाला खूप मदत करणार आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आपल्याकडे म्हटले जाते --- एक पंथ, दो काज. मात्र आज ज्या योजना बनवल्या जात आहेत तिथे तर एक पंथ अनेक काज, त्यातून अनेक उद्दिष्टे साध्य होत आहेत. जल जीवन अभियानांतर्गत घरोघरी पाणी पोहचवण्यामुळे आपल्या माता -भगिनींचे आयुष्य सुकर होणार आहे. याचा एक मोठा लाभ गरीब कुटुंबाच्या आरोग्याला देखील झाला आहे. यामुळे अस्वच्छ पाण्यामुळे होणारे कॉलरा, टायफाईड, इंसेफ्लाइटिस सारख्या अनेक आजारांमध्ये घट झाली आहे.
एवढेच नाही, या योजनेचा लाभ माणसांबरोबर पशुधनाला देखील होत आहे.जनावरांना स्वच्छ पाणी मिळाले तर ते देखील निरोगी राहतील. जनावरे निरोगी राहिली आणि शेतकऱ्यांना , पशुपालन करणाऱ्यांना त्रास होऊ नये या उद्देशाने आम्ही पुढे जात आहोत. इथे उत्तर प्रदेशात तर योगी सरकारच्या प्रयत्नांमुळे ज्याप्रकारे इंसेफ्लाइटिस च्या आजारात घट झाली आहे त्याची चर्चा दूर-दूर पर्यंत होत आहे. तज्ञ मंडळीही याची चर्चा करत आहेत. निष्पाप मुलांचे प्राण वाचवल्याबद्दल योगी आणि त्यांच्या पूर्ण टीमला मला वाटते प्रत्येक उत्तर प्रदेशवासी इतके आशीर्वाद देत असेल, इतके आशीर्वाद देत असेल ज्याची कल्पना देखील आपण करू शकणार नाही. जेव्हा विंध्यांचलच्या हजारो गावांमध्ये पाणी पोहचेल तेव्हा यामुळे या भागातील निष्पाप मुलांचे आरोग्य सुधारेल, त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास अधिक चांगला होईल. एवढेच नाही, जेव्हा शुद्ध पाणी मिळते तेव्हा कुपोषणाविरोधात जी आपली लढाई आहे, पोषणासाठी आपण जी मेहनत करत आहोत त्याचीही चांगली फळे यामुळे मिळू शकतील.
मित्रांनो,
जल जीवन अभियान सरकारच्या त्या संकल्पाचा देखील भाग आहे ज्या अंतर्गत स्वराज्याच्या शक्तीला गावातील विकासाचे माध्यम बनवले जात आहे. याच विचारासह ग्राम पंचायतीला , स्थानिक संस्थांना जास्तीत जास्त अधिकार दिले जात आहेत. जलजीवन अभियानात पाणी पोहचवण्यापासून पाण्याचे व्यवस्थापन आणि देखभालीवर देखील पूर्ण भर दिला आहे आणि यातही गावातील लोकांची भूमिका खूप महत्वाची आहे. गावांमध्ये पाण्याच्या स्रोतांच्या संरक्षणाबाबत देखील काम केले जात आहे.
सरकार एखाद्या मित्राप्रमाणे, एका सहायकाप्रमाणे तुमच्या विकास प्रवासात एखाद्या भागीदाराप्रमाणे तुमच्याबरोबर आहे. जल जीवन अभियानच नाही तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जी गरीबांची पक्की घरे तयार होत आहेत, त्यातूनही हाच विचार दिसून येतो. कुठल्या भागात कसे घर असावे, घरासाठी कुठले सामान वापरावे हे आता दिल्लीत बसून ठरत नाही. जर एखाद्या आदिवासी गावात विशेष परंपरेनुसार घर बांधले जात असेल तर तशीच घरे बांधण्यात यावीत- दिल्लीवाले विचार करतात तशी नाहीत, तिथल्या आदिवासीला जसे हवे असेल, जशी त्याची राहणी असेल तसे घर बनेल, ही सुविधा देण्यात आली आहे.
बंधू आणि भगिनींनो,
जेव्हा आपल्या गावच्या विकासासाठी , स्वतः निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळते, त्या निर्णयांवर काम होते, तेव्हा त्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. आत्मनिर्भर गाव,आत्मनिर्भर भारत अभियानाला यामुळे खूप मोठे बळ मिळते. यामुळे स्थानिक पातळीवर तयार केल्या जाणाऱ्या सामानाचा खप देखील वाढतो. स्थानिक पातळीवर जे कुशल लोक आहेत, त्यांना रोजगार मिळतो. राजमिस्त्री असेल, फिटर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन असेल, अशा अनेक सहकाऱ्यांना गावात किंवा गावाच्या आसपास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
मित्रांनो,
आपल्या गावांना, गावांमध्ये राहणाऱ्या गरीबांना , आदिवासींना जितके प्राधान्य आमच्या सरकारने दिले, तेवढे यापूर्वी देण्यात आले नव्हते. गरीबातील गरीबाला एलपीजी गॅस सिलेंडर देण्याच्या योजनेमुळे गावात, जंगलालगतच्या भागाला दुहेरी लाभ झाला आहे. एक लाभ म्हणजे आपल्या भगिनींना धुरापासून, लाकूडफाट्याच्या शोधासाठी लागणारा वेळ आणि श्रमापासून मुक्ती मिळाली आहे. इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या माता-भगिनी बसल्या आहेत, पूर्वी जेव्हा त्या लाकडी चूल पेटवायच्या, स्वयंपाक करायच्या तेव्हा आपल्या माता भगिनीच्या शरीरात एका दिवसात 400 सिगरेट एवढा धूर जात होता. घरात लहान मुले रडायची. आई जेवण बनवायची, 400 सिगरेट एवढा धूर त्या माता भगिनीच्या शरीरात जात होता. काय होत असेल, त्यांच्या शरीराचे काय हाल होत असतील. त्यांना मुक्ती देण्याचे एक खूप मोठे अभियान आम्ही राबवले आणि घराघरात गॅसची चूल, गॅसचा सिलेंडर जेणेकरून माझ्या या माता भगिनींना त्या 400 सिगरेट एवढा धूर आपल्या शरीरात घ्यावा लागू नये , हे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे इंधनासाठी जंगलतोड देखील थांबली आहे.
देशातील इतर गावांप्रमाणे इथे देखील विजेची खूप मोठी समस्या होती. आज हा भाग सौर ऊर्जा क्षेत्रात जगात अग्रेसर बनत चालला आहे, भारताचे महत्वाचे केंद्र आहे. मिर्झापूरचा सौर ऊर्जा प्रकल्प इथे विकासाचा नवा अध्याय लिहीत आहे. याचप्रमाणे सिंचनाशी निगडित सुविधांच्या कमतरतेमुळे विंध्यांचल सारखी देशातील अनेक क्षेत्र विकासाच्या शर्यतीत मागे पडली आहेत. मात्र या भागातील अनेक वर्षे प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण केले जात आहेत, तर दुसरीकडे ओसाड जमिनीवर शेतकऱ्यांना सौर ऊर्जेद्वारे अतिरिक्त कमाई करता यावी यासाठी देखील मदत केली जात आहे. आपला अन्नदाता ऊर्जा दाता बनावा . तो अन्न पिकवतो, लोकांचे पोट भरतो. आता तो आपल्याच शेतात वीज निर्मिती देखील करू शकेल आणि लोकांना प्रकाश देखील देऊ शकेल.
आम्ही विंध्य क्षेत्रासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत. मग ते वैद्यकीय पायाभूत सुविधा निर्मिती असेल, किंवा मग या भागात रस्ते निर्मिती या सर्व बाबींवर अतिशय जलद गतीने काम सुरु आहे. विजेची स्थिती पूर्वी काय होती आणि आता किती चांगली आहे , हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे.
बंधू-भगिनींनो,
गावात विश्वास आणि विकासाच्या कमतरेत आणखी एक मोठी समस्या आहे घर आणि जमिनीशी निगडित वाद. ही समस्या उत्तर प्रदेशच्या या भागात राहणाऱ्यांपेक्षा चांगले आणखी कोण जाणू शकेल. कारण हे आहे कि पिढ्यानपिढ्या राहिल्यानंतर देखील गावातील जमिनीची कायदेशीर कागदपत्रे नव्हती. जर त्यांचे घर आहे तर घरासंबंधित किती लांबी आहे, किती रुंदी आहे , किती उंची आहे , कागद कुठे आहेत, काहीही नव्हते. गेली अनेक दशके लोक असेच जगत राहिले, समस्या झेलत राहिले. वाद वाढत चालले आणि कधीकधी तर मारहाण देखील व्हायची, खून करण्यापर्यंत प्रकरण जायचे, भावाभावांमध्ये भांडणे व्हायची. एक फूट जमिनींसाठी एक शेजारी दुसऱ्या शेजाऱ्यांशी भांडायचा.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्वामित्व योजने अंतर्गत उत्तर प्रदेशात ड्रोन तंत्रज्ञान वापरून घर आणि जमिनीचे नकाशे तयार केले जात आहेत. या नकाशांच्या आधारे घर आणि जमिनीचे कायदेशीर दस्तावेज़ घर आणि ज़मीन मालकाकडे सोपवले जात आहेत. यामुळे गावात राहणारे गरीब, आदिवासी, वंचित लोक देखील घरावर कब्जा होण्याच्या भीतीपासून निश्चिंत होऊन आपले आयुष्य जगू शकतील. मला तर ठाऊक आहे गुजरात मध्ये तर तुमच्या भागातील अनेक लोक काम करतात . कधीतरी मी त्यांच्याशी बोलायचो, का निघून गेलात? तर सांगायचे नाही- नाही तिथे आमचे जमिनीवरून भांडण झाले, आमचे घर कुणीतरी हडपले. मी इथे काम करत होतो, कुणीतरी घरात घुसले. आता हे कागद मिळाल्यानंतर या सर्व संकटांपासून तुम्ही मुक्त व्हाल. एवढेच नाही तर गरज भासली तर गावातील तुमच्या घराची जी कागदपत्रे आहेत, तर त्यावर तुम्हाला कर्जाची आवश्यकता भासली तर कर्ज मिळू शकेल. तुम्ही जाऊ शकता, कागद दाखवून बँकेकडून कर्ज घेऊ शकता.
मित्रांनो,
आज सबका साथ, सबका विकास,सबका विश्वास, हा मंत्र देशातील प्रत्येक भागात प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा मंत्र बनला आहे. आज देशातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक भागाला वाटत आहे कि त्याच्यापर्यंत सरकार पोहचत आहे आणि तो देखील देशाच्या विकासात भागीदार आहे. आपल्या मागास भागातही आज हा आत्मविश्वास आहे, त्याच्यात एक नवी ताकद आली आहे आणि मला ती दिसत आहे. आदिवासी भागात मूलभूत सुविधा तर आज पोहचत आहेतच शिवाय या क्षेत्रांसाठी विशेष योजनांच्या अंतर्गत देखील काम केले जात आहे. आदिवासी युवकांच्या शिक्षणासाठी देशात शेकडो नवीन एकलव्य मॉडल निवासी शाळांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये आपल्या आदिवासी भागातील मुलाना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध होईल. यापैकी अनेक शाळा उत्तर प्रदेशात देखील सुरु होत आहेत. प्रत्येक आदिवासी बहुल तालुक्यात ही व्यवस्था पोहचवण्याचा प्रयत्न आहे.
शिक्षणाबरोबरच उत्पन्नाच्या संधींचा देखील शोध घेतला जात आहे. वन उत्पादनांची जास्त किंमत आदिवासी मित्रांना मिळावी यासाठी साडे बाराशे वनधन केंद्र संपूर्ण देशात उघडण्यात आली आहेत. या माध्यमातून शेकडो कोटी रुपयांचा व्यवसाय देखील झाला आहे.
एवढेच नाही, आता आत्मनिर्भर भारत अभियानातंर्गत वन उत्पादन आधारित उद्योग देखील आदिवासी भागात उभारले जावेत यासाठी आवश्यक सुविधा उभारल्या जात आहेत. आदिवासी भागांच्या विकासासाठी पैसे कमी पडू नयेत यासाठी जिल्हा खनिज निधी स्थापन करण्यात आला आहे. यामागे हा विचार आहे कि आदिवासी भागातून निर्माण होणाऱ्या या संपत्तीचा एक हिस्सा त्याच क्षेत्राला मिळेल. उत्तर प्रदेशात देखील या निधीत आतापर्यन्त सुमारे 800 कोटी रुपये जमले आहेत. या अंतर्गत साडे 6 हज़ार पेक्षा अधिक प्रकल्पाना मान्यता देण्यात आली असून शेकडो प्रकल्प पूर्ण देखील झाले आहेत.
मित्रांनो,
अशीच कामे आज भारताचा आत्मविश्वास दररोज वाढवत आहेत. याच आत्मविश्वासाच्या बळावर आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यात आपण सर्वजण सहभागी झालो आहोत. मला विश्वास आहे कि विंध्य पाणीपुरवठा योजनेमुळे हा आत्मविश्वास अधिक मजबूत होईल.
आणि हो, यामध्ये तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे आहे कि कोरोना संसर्गाचा धोका अजूनही कायम आहे. सुरक्षित अंतर, मास्क आणि साबणाने हात स्वच्छ धुण्याचे नियम कुठल्याही परिस्थितीत विसरायचे नाहीत. जरासा हलगर्जीपणा स्वतःला, कुटुंबाला, गावाला संकटात टाकू शकतो. लस बनवण्यासाठी आपले वैज्ञानिक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. जगभरातील वैज्ञानिक या कामात गुंतले आहेत, सर्वात श्रीमंत देशाचे लोक देखील यात आहेत आणि गरीब देशाचे लोक देखील आहेत. मात्र जोवर औषध नाही तोवर हलगर्जीपणा नाही.
तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्याल या विश्वासासह तुम्हाला खूप-खूप धन्यवाद आणि खूप-खूप शुभेच्छा.
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1674949)
Visitor Counter : 296
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam