पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या आभासी उपस्थितीमध्ये गुजरातमधल्या गांधीनगर इथल्या पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाचा 8वा दीक्षांत समारंभ
विद्यापीठामधील विविध सुविधांचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ
भारताच्या कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण 30 ते 35 टक्क्यांनी कमी करून, नैसर्गिक वायूचा हिस्सा चारपटीने वाढविण्याचे आमचे उद्दिष्ट : पंतप्रधान
21व्या शतकातल्या युवकांनी स्पष्ट विचारांसह पुढे वाटचाल करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
Posted On:
21 NOV 2020 3:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी उपस्थितीमध्ये गुजरातमधल्या गांधीनगर इथल्या पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाचा 8 वा दीक्षांत समारंभ आज झाला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते मोनोक्रिस्टलाइन सौर ऊर्जा निर्मितीच्या 45 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाचा, त्याचबरोबर जल तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्राचा शिलान्यास करण्यात आला. याप्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते विद्यापीठातल्या ‘इनोव्हेशन आणि इनक्यूबेशन सेंटर- टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्यूबेशन’, ‘भाषांतर संशोधन केंद्र’ आणि क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, संपूर्ण जगापुढे एका खूप मोठ्या समस्येचे आव्हान असताना तुम्ही पदवी संपादन करीत आहात, ही काही फार सोपी गोष्ट नाही. मात्र तुमच्यामध्ये असलेली क्षमता या आव्हानांपेक्षा खूप मोठी, प्रचंड आहे. महामारीच्या उद्रेकामुळे संपूर्ण जगातल्या ऊर्जा क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणावर बदल घडून येत आहेत. अशा काळामध्ये तुम्ही नवपदवीधर या उद्योगामध्ये प्रवेश करणार आहे.
आज भारतातल्या ऊर्जा क्षेत्रामध्ये उद्योजकता वृद्धी आणि रोजगार निर्मिती यादृष्टीने अपार संधी आहेत. भारताने कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण 30 ते 35 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे आणि त्यासाठी उपाय योजना सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर या दशकामध्ये आपल्या ऊर्जेच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी नैसर्गिक वायूचा हिस्सा चारपटीने वाढविण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षांमध्ये तेल शुद्धीकरणाची क्षमता दुप्पट करण्याच्या दृष्टीने कार्य सुरू करण्यात आले आहे. ऊर्जा उपलब्धतेविषयी सुनिश्चितता निर्माण करण्यासाठी स्टार्टअप परिसंस्था अधिक बळकट करण्यात येत आहे आणि त्यासाठी विद्यार्थी, व्यावसायिकांसाठी निधी तयार केला आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली.
आपल्याला आयुष्यात नेमके काय करायचे आहे, याचे एक ध्येय विद्यार्थ्यांनी निश्चित करावे, असा सल्ला देवून पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, यशस्वी लोकांना अडचणी आल्याच नाहीत, असे कधीही नसते, परंतु एकदा का ध्येय निश्चित केले की, येणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा सामना करून, समस्यांवर मात करून, प्रश्न सोडवले तर यश तुमचेच असते. जो कोणी आव्हानांना सामोरा जातो, तोच आपल्या आयुष्यात यशस्वी ठरतो, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. 1922 ते 1947 या कालखंडातल्या युवकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. आताच्या युवावर्गाने देशासाठी जगताना आत्मनिर्भर भारत चळवळीमध्ये सहभागी व्हावे आणि आपल्यामध्ये जबाबदारीची भावना विकसित करावी, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
कोणत्याही क्षेत्रामध्ये यश सहजतेने मिळत नाही, तुम्ही ते काम किती जबाबदारीने करता त्यावरच यश अवलंबून असते. जबाबदारीची भावनाच तुमच्या जीवनाचा उद्देश बनले तर तुम्ही अधिक जबाबदारीने काम करून यशस्वी होऊ शकणार आहात, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. जे जीवनात अपयशी ठरतात, त्यांच्यावर एकप्रकारचा ताण येतो. ते तणावामध्ये राहतात. जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आणि तशी भावना असेल तर त्या व्यक्तीला जीवनात नवनव्या संधींचीही दारे उघडतात. भारत अनेक क्षेत्रामध्ये प्रगतिपथावर आहे. तरूण पदवीधरांनी कार्याविषयी वचनबद्ध राहून पुढे वाटचाल करायला हवी. त्याचबरोबर सर्वांनी निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण करावे, यावर पंतप्रधानांनी भर दिला.
21 व्या शतकातल्या युवकांनी आपल्या विचारांची पाटी अगदी कोरी, स्वच्छ ठेवून पुढे वाटचाल करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी नवीन पिढीला केले. ज्यावेळी तुमच्या विचारांची पाटी स्वच्छ असेल, मनामध्ये हेतू स्वच्छ असेल, तर कार्याचे ध्येयही स्पष्ट होईल. 21व्या शतकामध्ये भारताकडून संपूर्ण जगाच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. भारताच्या आशा आणि अपेक्षा या विद्यार्थी आणि व्यावसायिक यांच्याशी निगडीत आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले.
* * *
S.Thakur/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1674681)
Visitor Counter : 268
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam