राष्ट्रपती कार्यालय

जेएनयू समावेशकता, विविधता आणि उत्कृष्टता यांच्या मिलाफाचे प्रतिनिधित्व करते: राष्ट्रपती कोविंद


राष्ट्रपतींनी जेएनयूच्या 4 थ्या वार्षिक दीक्षांत समारंभाला एका व्हिडिओ संदेशाद्वारे केले संबोधित

Posted On: 18 NOV 2020 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 नोव्‍हेंबर 2020

 

उत्कृष्टतेसाठी समान संधी असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) देशातील सर्व भागातून आणि समाजातील सर्व स्तरातून विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. अतिशय वेगळ्या करिअर मार्गांची आकांक्षा बाळगणारे  विद्यार्थी जेएनयूमध्ये एकत्र येतात. हे विद्यापीठ समावेशकता, विविधता आणि उत्कृष्टतेचा मिलाफ  आहे, असे राष्ट्रपती  राम नाथ कोविंद यांनी आज (18 नोव्हेंबर, 2020) जेएनयूच्या चौथ्या वार्षिक दीक्षांत समारंभाला एका व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित करताना सांगितले.

राष्ट्रपती म्हणाले की भारतीय संस्कृतीच्या सर्व छटा जेएनयूमध्ये प्रतिबिंबित होतात. संकुलातील  इमारती, वसतिगृहे, रस्ते आणि सुविधांची नावे भारतीय वारशावरून देण्यात आली  आहेत. हे सर्वोत्कृष्ट भारताचे सांस्कृतिक आणि भौगोलिक चित्र दर्शवते. हे भारतीयत्व हा जेएनयूचा ठेवा आहे आणि तो  बळकट करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.

राष्ट्रपती म्हणाले की जेएनयूचे  उत्कृष्ट अध्यापकगण  मुक्त वादविवादाला प्रोत्साहन देतात आणि मत भिन्नतेबद्दल आदर व्यक्त करतात.  विद्यार्थ्यांना शिकण्यात भागीदार  मानले जाते जे उच्च शिक्षणासाठी आवश्यक आहे.  विद्यापीठ उत्स्फूर्त चर्चेसाठी प्रख्यात आहे जी वर्गांबाहेर, कॅफेटेरियात आणि ढाब्यावरही तासन तास  चालते.

प्राचीन भारतातील अध्यापन व संशोधनाच्या वैभवशाली भूतकाळाचा उल्लेख करताना राष्ट्रपती म्हणाले की आजच्या आव्हानांना तोंड देताना आपण तक्षशिला, नालंदा, विक्रमशीला आणि वल्लभी  विद्यापीठाकडून  प्रेरणा घेऊ शकतो, ज्यांनी अध्यापन व संशोधनाचे उच्च मापदंड निश्चित केले आहेत. जगभरातील विद्वान आणि विद्यार्थी विशेष ज्ञान मिळविण्यासाठी या  केंद्रांवर आले. त्या प्राचीन व्यवस्थेमध्ये ज्यात आधुनिकतेचे अनेक घटक आहेत, त्यांनी चरक, आर्यभट्ट, चाणक्य, पाणिनी, पतंजली, गार्गी, मैत्रेयी आणि तिरुवल्लुवर यासारखे थोर विद्वान घडवले. त्यांनी वैद्यकीय विज्ञान, गणित, खगोलशास्त्र, व्याकरण आणि सामाजिक विकासात अमूल्य योगदान दिले. जगातील इतर भागांतील लोकांनी भारतीय विद्वानांच्या साहित्याचा अनुवाद केला आणि या शिक्षणाचा पुढील ज्ञानाच्या प्रगतीसाठी उपयोग केला. आजच्या भारतीय विद्वानांनी अशा प्रकारची ज्ञानाची मूळ संस्था तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्याचा उपयोग समकालीन जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी केला जातो. जेएनयू ही उच्च शिक्षणाच्या निवडक संस्थांपैकी एक आहे जी जागतिक स्तरावर तुलनात्मक उत्कृष्टतेपर्यंत पोहोचू शकते.

कोविड -19 महामारीबाबत  बोलताना राष्ट्रपती म्हणाले की, आज या साथीच्या रोगामुळे जग संकटात सापडले आहे. साथीच्या आणि महामारीच्या सद्यस्थितीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये नमूद केले आहे की उच्च शिक्षण संस्थानी  संसर्गजन्य रोग, साथीचे रोग, विषाणूविज्ञान , निदान, इंस्ट्रुमेंटेशन, लसनिर्मिती  आणि इतर संबंधित क्षेत्रात संशोधन करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. शक्यतो बहु-शाखीय दृष्टिकोनातून संबंधित सामाजिक समस्यांचा अभ्यास करणे देखील आवश्यक आहे. या प्रयत्नात जेएनयू सारख्या विद्यापीठांनी विशिष्ट मार्गदर्शन यंत्रणा विकसित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमधील नवसंशोधनाला  चालना देण्यासाठी आघाडीवर असायला हवे, असेही ते म्हणाले.

 

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा


* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1673796) Visitor Counter : 209