पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जोसेफ आर. बायडेन यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण


पंतप्रधानांनी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सिनेट सदस्य कमला हॅरिस यांचेही हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या

सामायिक मूल्ये आणि समान हितसंबंधांवर आधारित सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याबाबत उभय नेत्यांमध्ये सहमती

Posted On: 17 NOV 2020 11:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 नोव्‍हेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जोसेफ आर. बायडेन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

बायडेन यांचा विजय अमेरिकेतील लोकशाही परंपरेचे सामर्थ्य आणि लवचिकतेचा पुरावा असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष बायडेन यांच्या निवडीबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सिनेट सदस्य श्रीमती कमला हॅरिस यांचेही हार्दिक अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

2014 आणि  2016 मध्ये अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यादरम्यान महामहीम जोसेफ बायडेन यांच्याबरोबर झालेल्या संवादाची पंतप्रधानांनी मनापासून आठवण काढली. 2016 च्या दौऱ्यात पंतप्रधानांनी अमेरिकन कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले तेव्हा जोसेफ बायडेन त्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष होते.

सामायिक मूल्ये आणि समान हितसंबंधांवर आधारित सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याबाबत उभय नेत्यांनी सहमती दर्शवली. कोविड 19 महामारीला आळा घालणे, परवडणारी लस उपलब्ध करुन देणे, हवामान बदलाचा सामना करणे आणि हिंद -प्रशांत क्षेत्रात सहकार्यासह विविध प्राधान्यतेच्या मुद्द्यांवर उभय नेत्यांनी चर्चा केली.

 

* * *

U.Ujgare/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1673679) Visitor Counter : 137