पंतप्रधान कार्यालय

जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वर जी महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते ‘स्टॅच्यु ऑफ पीस’ चे अनावरण


आत्मनिर्भरतेसाठी "व्होकल फॉर लोकल" चा प्रसार करण्याचे केले धार्मिक नेत्यांना आवाहन

Posted On: 16 NOV 2020 5:06PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून   जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज यांच्या 151व्या जयंती उत्सवानिमित्त स्टॅच्यू ऑफ पीसचे अनावरण  करण्यात आले. जैन आचार्यांच्या सन्मानार्थ अनावरण करण्यात आलेल्या पुतळ्याला स्टॅच्यु ऑफ पीसअसे नाव देण्यात आले आहे. 151 इंच उंचीचा पुतळा अष्टधातूपासून तयार करण्यात आला आहे, यात तांब्याचे प्रमाण जास्त आहे आणि विजय वल्लभ साधना केंद्र, जेतापूर, पाली, राजस्थान येथे उभारण्यात आला आहे.

पंतप्रधानांनी यावेळी जैनाचार्य आणि उपस्थित धर्मगुरूंना अभिवादन केले. सरदार वल्लभ भाई पटेल आणि जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज  या  दोन वल्लभ नावाच्या व्यक्तींचा , सरदार वल्लभ भाई पटेल आणि जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वर जी महाराज यांचा उल्लेख करुन पंतप्रधान म्हणाले, सरदार पटेलांचा जगातील सर्वात उंच पुतळा- स्टॅच्यु ऑफ युनिटीचे आणि आता जैनाचार्च श्री विजय वल्लभ यांच्या स्टॅच्यु ऑफ पीसचे अनावरण करायला मिळाले  हे मी माझे भाग्य समजतो. . 

व्होकल फॉर लोकलवरभर देताना पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यलढ्यावेळी ज्याप्रमाणे घडले होते तसेच धर्मगुरुंनी  आत्मनिर्भरतेचा संदेश सर्वदूर पोहचवा, अशी विनंती केली. दिवाळीच्या सणात देशाने स्थानिक उत्पादनांना दिलेला पाठिंबा उत्साही आहे, असे ते म्हणाले.   

पंतप्रधान म्हणाले, भारताने जगाला नेहमीच शांती, अहिंसा आणि मैत्रीचा मार्ग दाखवला आहे. अशाच मार्गदर्शनासाठी आज जग भारताकडे पाहत आहे. जर, तुम्ही भारताचा इतिहास पाहिला तर, ज्या ज्या वेळी आवश्यकता निर्माण झाली त्यावेळी समाजात काही संतांचा उदय झाला, आचार्य विजय वल्लभ असेच एक संत होते. जैनाचार्य यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांचा उल्लेख करुन पंतप्रधानांनी शैक्षणिक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर केल्याबद्दल प्रशंसा केली, जैनाचार्यानी ,भारतीय मुल्ये जोपासत पंजाब, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश याठिकाणी अनेक संस्था उभा केल्या आणि या संस्थांमधून अनेक उद्योजक, न्यायाधीश, डॉक्टर आणि अभियंते तयार झाले आणि त्यांनी राष्ट्राची सेवा केली, असे पंतप्रधान म्हणाले.

या संस्थांनी महिलांसाठी केलेल्या शैक्षणिक कार्याचे देशावर ऋण आहेत , असे पंतप्रधान म्हणाले. या संस्थांनी कठीण काळात महिलांच्या शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली. जैनाचार्यांनी मुलींसाठी अनेक संस्थांची स्थापना करुन महिलांना मुख्य प्रवाहात आणले. आचार्य विजय वल्लभ जी हे  दयाळू, कनवाळू आणि सर्व जीवांवर प्रेम करणारे होते, त्यांच्या आशीर्वादाने पक्षी रुग्णालय आणि अनेक गोशाळा देशभर कार्यरत आहेत. या काही सामान्य संस्था नाहीत. या भारताचा आत्मा आणि भारतीय मुल्यांचे मुर्त स्वरुप आहेत, अशा शब्दात पंतप्रधानांनी  जैनाचार्यांच्या कार्याचा गौरव केला.

***

Jaydevi PS/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1673201) Visitor Counter : 217