पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी सरहद्दीवर जवानांसोबत केली दिवाळी साजरी


माझी दिवाळी जवानांबरोबर असल्याशिवाय पूर्ण होऊ शकतच नाही: पंतप्रधान लोंगोवाला ठाणे येथून म्हणाले

विस्तारवादी शक्तींसमोर भारत प्रबळपणे उभा ठाकेल

आमची परीक्षा घ्याल, तर त्याचा परीणाम तेवढाच उग्र होईल

दहशतवाद्यांच्या निर्मात्यांना आज भारत त्यांच्या घरात जाऊन प्रत्युत्तर देत आहे

Posted On: 14 NOV 2020 5:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  14 नोव्हेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, त्यांची सैन्यदलासोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम राखत, भारताच्या सरहद्दीवरील  लोंगोवाला ठाण्यावर जाऊन जवांनासोबत संवाद साधला आणि त्यांना संबोधित केले. ते म्हणाले, त्यांची दिवाळी ते जेव्हा जवांनांसोबत असतील तेव्हाच पूर्ण होऊ शकते, मग ती हिमाच्छादित पर्वतावर असो वा वाळवंटात. प्रत्येक भारतीयांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि आकांक्षा त्यांनी सरहद्दीवरील सैन्यदलातील कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या. त्यांनी वीरमाता आणि भगिनींना देखील शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या त्यागाला आदरांजली वाहिली. त्यांनी सैन्यदलाबद्दल सर्व भारतीय बांधवाना वाटणारी कृतज्ञता प्रदर्शित केली आणि ते म्हणाले, 130 कोटी भारतीय सैन्यदलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

ज्या देशाची हल्ला करणाऱ्यांविरूध्द आणि घुसखोरांविरुध्द लढण्याची ताकद आहे तोच देश सुरक्षित असतो, यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले, की आंतरराष्ट्रीय साहचर्यात सकारात्मक स्थिती असली तरी  आणि बदललेली समीकरणे लक्षात घेता, दक्षतेची आपल्या सुरक्षिततेत  महत्वपूर्ण भूमिका आहे हे विसरता कामा नये ,तसेच तत्परता हा आनंदाचा पाया आहे आणि यशाबद्दल आत्मविश्वास हे आपले सामर्थ्य आहे.

आजचा भारत हा समजूतदारपणा आणि स्पष्टीकरणावर विश्वास ठेवतो परंतु आमची परीक्षा घ्यायचा प्रयास केल्यास, आमचा प्रतिसाद तितकाच उग्र असेल,  हे भारताचे स्पष्ट धोरण  आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.

जगाला माहित झाले आहे, की हा देश आपल्या राष्ट्रहिताबाबत कोणतीही तडजोड करणार नाही.भारताचा हा दर्जा त्याला त्याचे शौर्य आणि शक्ती यामुळे प्राप्त झाला आहे.सैन्यदलाने दिलेल्या सुरक्षिततेमुळे आंतरराष्ट्रीय वातावरणात भारताची स्थिती दमदार राहिलेली आहे, भारताच्या सैन्यबळाने आपली वाटाघाटी  करण्याची ताकद विकसित केली आहे,असे पंतप्रधान म्हणाले.आज भारत दहशतवाद्यांच्या निर्मात्यांना त्यांच्या घरात जाऊन प्रत्युत्तर देत आहे असे पंतप्रधान म्हणाले.

विस्तारवादी विचारधारेविरुध्द भारताने जोरदार आवाज उठविला आहे. संपूर्ण जग विस्तारवादी शक्तींमुळे त्रासून गेले असून ,ते अठराव्या शतकातील विकृत  मानसिकतेचे प्रतिबिंब आहे,असेही ते म्हणाले.

आत्मनिर्भरतेचा  उल्लेख  करत  आणि व्होकल ते लोकल यावर भर देत पंतप्रधान म्हणाले , आता सैन्यदलाने असा निश्चय केला आहे, की  100 हून अधिक शस्त्रास्त्रे आणि त्यांचे पूरक भाग आता आयात केले जाणार नाहीत. त्यांनी व्होकल फाँर लोकल पध्दतीचा अवलंब केल्याबद्दल सैन्यदलाचे अभिनंदन केले.

देशातील युवकांना पुकारत, सैन्यदलासाठी गरजा पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त स्टार्ट अप्स सुरू करण्याचे आवाहन मोदी यांनी यावेळी केले. संरक्षण क्षेत्रात युवकांनी सुरू केलेल्या स्टार्ट अप्समुळे आत्मनिर्भरतेच्या वाटेवरून पुढे जात देशाची प्रगती होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान म्हणाले की, सैन्यदलाकडून स्फूर्ती घेत देश या महामारीच्या काळात प्रत्येक नागरीकाचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्येकाला अन्न मिळेल याची काळजी घेत, देश आपली अर्थव्यवस्था परत मार्गावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.

पंतप्रधानांनी जवानांना तीन गोष्टीं अंगिकारण्याचे आवाहन केले ,पहिली, नवनिर्मितीला आपल्या रोजच्या जीवनात स्थान द्यावे, दुसरे योग जीवनाचा भाग बनवावा आणि अखेरीस तिसरे म्हणजे हिंदी आणि इंग्रजी याव्यतिरिक्त एकतरी भाषा शिकावी. यामुळे तुमच्या जीवनात नवे  चैतन्य निर्माण होईल, असेही पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी लोंगोवाला युध्दाचे स्मरण करताना ते म्हणाले, हे युद्ध धोरणात्मक नियोजनबद्ध इतिहास आणि सैन्यदलाच्या शौर्यासाठी सदैव स्मरणात राहील. ते म्हणाले की, या युध्दाच्या वेळी पाकिस्तानचा कुरुप चेहरा उघडकीस आला, कारण त्यांच्या सैन्याने निरपराधी बांग्लादेशी नागरिकांना घाबरून सोडले आणि त्यांच्या माता आणि भगिनींवर अत्याचार केले. पाकिस्तानने जगाचे लक्ष विचलीत करण्यासाठी पश्चिम सीमेवर आघाडी उघडली परंतु आपल्या सैन्याने त्याला जशास तसे उत्तर दिले.

 

Jaydevi P. S./S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1672925) Visitor Counter : 178