पंतप्रधान कार्यालय

शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) मंडळातल्या देशांच्या सरकारप्रमुखांची 20 वी शिखर परिषद

Posted On: 10 NOV 2020 9:05PM by PIB Mumbai

 

शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) मंडळातल्या देशांच्या सरकारप्रमुखांच्या  20 व्या शिखर परिषदेचे  व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज (10 नोव्हेंबर,2020) आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रशियाचे राष्ट्रप्रमुख व्लादिमिर पुतिन होते. भारतीय प्रतिनिधी मंडळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतृत्व केले. एससीओच्या इतर सदस्य देशांचे प्रतिनिधित्व त्यांच्या राष्ट्रपतींनी केले. भारत आणि पाकिस्तानचे नेतृत्व उभय देशांच्या पंतप्रधानांनी केले. या परिषदेला एससीओ सचिवालयाचे महासचिव, एससीओ क्षेत्रीय दहशतवादविरोधी संरचनेचे कार्यकारी संचालक, अफगाणिस्तान, बेलारूस, इराण, मंगोलिया या चार देशांचे निरीक्षक उपस्थित होते.

शांघाय सहकार्य संघटनेची पहिल्यांदाच आभासी स्वरूपामध्ये शिखर परिषद यंदा झाली आहे. भारताला या संघटनेचे 2017 मध्ये पूर्ण सदस्यत्व मिळाले, त्यानंतर भारत सहभागी होत असलेली ही तिसरी बैठक आहे. कोविड-19 महामारीचा उद्रेक असतानाही या परिषेदेचे आयोजन करण्यात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे या परिषदेमध्ये केलेल्या भाषणात अभिनंदन केले.

संपूर्ण विश्वाला महामारीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा सामाजिक आणि आर्थिक संकटाच्या काळामध्ये संघटनेने बहुउपयोगित्वाचा विचार करून सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, हा मुद्दा पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केला. आगामी 1 जानेवारी, 2021 पासून भारत संयुक्त राष्ट्र संघाचा अस्थायी सदस्य म्हणून कार्यरत होणार आहे. त्यावेळी सुधारित बहुपक्षीय संकल्पनेवर लक्ष केंद्रीत करून वैश्विक प्रशासनात आवश्यक असणारे परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न भारत करणार असल्याचेही मोदी यांनी यावेळी सांगितले.

क्षेत्रिय शांतता, सुरक्षा आणि समृद्धता यांच्यावर भारताचा दृढ विश्वास असून दहशतवाद, हत्यारांची तस्करी, अंमली पदार्थांचा अवैध व्यापार, पैशाचा अपहार यांच्याविरोधात भारत सातत्याने आवाज उठवत असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.  कोविड महामारीच्या काळामध्ये भारताने 150 पेक्षा जास्त देशांना जीवनावश्यक औषधांचा पुरवठा केला तसेच संयुक्त राष्ट्राच्या जवळपास 50 शांतता अभियानामध्ये भारताचे वीर सैनिक सहभागी झाले आहेत, असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

एससीओ क्षेत्राबरोबर भारताचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध दृढ आहेत, याची साक्ष आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक पट्टा, चाबहार बंदर, अश्गाबात सामंजस्य  करार यांच्यामुळे मिळते, हे अधोरेखित करून पंतप्रधानांनी एससीओबरोबर अधिक मजबूत संबंध निर्माण करण्यासाठी आपण प्रतिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.  2021 मध्ये एससीओचा  20 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त ‘‘एससीओ संस्कृती वर्ष’’ म्हणून साजरे करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पाठिंबा दर्शवला. या वर्षात एससीओ पाककृती महोत्सव, भारतीय संग्रहालयाच्यावतीने पहिले बौद्ध वारसा प्रदर्शन भारतामध्ये आयोजित करण्यात येईल, असेही जाहीर केले. तसेच रशियन आणि चीनी भाषेमध्ये 10 भारतीय प्रादेशिक भाषेतल्या साहित्य कृतींचा अनुवाद प्रकाशित करण्यात येणार असल्याचे सांगितले.

आगामी 30 नोव्हेंबर,2020 रोजी एससीओ मंडळाच्या सरकार प्रमुखांची नियमित बैठक आभासी स्वरूपात होणार असून त्याचे यजमानपद भूषविण्यासाठी भारत सिद्ध असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. नवसंकल्पना आणि स्टार्टअप्स यांच्याविषयी विशेष कृती दल स्थापन करण्याचा प्रस्ताव भारताचा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पारंपरिक औषधांविषयी एससीओचा उपगट स्थापण्याचा प्रस्तावही मांडला. भारताने सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानाची माहिती त्यांनी यावेळी दिली. आत्मनिर्भरतेच्या दृष्टीकोनामुळे महामारीच्या संकटानंतर जागतिक अर्थव्यवस्था आणि एससीओच्या क्षेत्रीय आर्थिक प्रगतीसाठी अनेकपटीने शक्ती निर्माण करणारे दल म्हणून भारत कार्य करू शकणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढच्या वर्षी एससीओचे अध्यक्षपद ताजिकिस्तानकडे असणार आहे, त्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी ताजिकिस्तानचे प्रमुख इमोमाली रहेमान  यांचे अभिनंदन केले आणि भारताकडून त्यांना पूर्ण सहकार्य देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

------

M.Chopade/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1671813) Visitor Counter : 2187