पंतप्रधान कार्यालय

आयआयटी दिल्लीच्या 51 व्या दीक्षांत सोहळ्यात पंतप्रधानांचे भाषण


देशाच्या गरजा ओळखून तळागाळापर्यंत होत असलेल्या बदलांबरोबर जोडले जाण्याचे पंतप्रधानांचे नव-पदवीधरांना आवाहन

भारत आपल्या युवकांना उद्योग सुलभता प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे, त्यामुळे त्यांनी आता देशाच्या नागरिकांचे जीवनमान सुकर बनविण्यावर लक्ष केंद्रीत करावे: पंतप्रधान

गुणवत्ता, प्रमाणता, विश्वासार्हता आणि अनुकूलन क्षमता यांचा मंत्र आयआयटीयन्सनी जपावा - पंतप्रधान

Posted On: 07 NOV 2020 6:00PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटीच्या नवीन पदवीधरांना देशाच्या गरजा ओळखून तळागाळापर्यंत होत असलेल्या बदलांबरोबर जोडले जाण्याचे आवाहन केले. आत्मनिर्भर भारताच्या संदर्भामध्से सर्वसामान्यांच्या आकांक्षा जाणून घेण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. आयआयटी दिल्लीच्या 51 व्या दीक्षांत सोहळ्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रमुख पाहुणे म्हणून भाषण झाले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी नवपदवीधरांना मार्गदर्शन केले.

या दीक्षांत समारंभामध्ये 2000पे क्षा जास्त आयआयटीयन्सनी पदवी ग्रहण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर मोहीम ही एक मिशन आहे, त्यामुळे देशातल्या तरूण तंत्रज्ञ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्यांना संधी देत आहे, असे सांगितले. आज नवीन तंत्रज्ञानाचा विचार करून त्याची अंमलबजावणी करणे, नवसंकल्पनांना मुक्तपणे प्रत्यक्षात आणणे तसेच त्यांचे प्रमाण वाढवून बाजारपेठ निर्माण करण्यासाठी अनुकूल वातावरण सध्या असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. आजचा भारत आपल्या युवकांना उद्योग सुलभता प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे  त्यांना नवसंकल्पांच्या माध्यमातून कोट्यवधी देशवासियांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे शक्य होणार आहे. ‘‘देश तुम्हाला उद्योग सुलभता प्रदान करतोय आता तुम्ही फक्त देशातल्या लोकांचे जीवनमान सुकर बनवायचे आहे’’, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. अलिकडच्या काळामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्रांमध्ये मोठमोठ्या सुधारणा घडवून आणल्या आहेत, त्यामागे एक विशिष्ट विचार प्रक्रिया आहे, असे स्पष्ट करून पंतप्रधान म्हणाले, या सुधारणांमुळेच पहिल्यांदाच नाविन्य आणि नवीन स्टार्ट-अप्ससाठी ज्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत, त्याची एक सूची पंतप्रधानांनी यावेळी सादर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात ओएसपी म्हणजे अन्य सेवा प्रदाता मार्गदर्शक तत्वांचे सरलीकरण केले आहे. बीपीओ व्यवसायावर अतिरिक्त भार कमी करण्यासाठी अनेक निर्बंध हटविण्यात आले आहेत. आता बीपीओ व्यवसायालाही बँकेच्या हमीसह इतर विविध गोष्टींची आवश्यकता असणार नाही. अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. तंत्रज्ञाना उद्योगाला वर्क फ्रॉम होम किंवा वर्क फ्रॉम एनिव्हेअर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे देशातले आयटी क्षेत्र जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकणार आहे आणि तरूणांच्या प्रतिभेला अधिक संधी मिळू शकणार आहे.

कॉर्पोरेट कर सर्वात कमी असलेल्या देशांमध्ये भारत एक असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, स्टार्ट-अप इंडिया मोहिमेनंतर देशामध्ये 50 हजारांहून जास्त स्टार्टअप्स सुरू झाले आहेत. स्टार्टअपला प्रोत्साहन दिले जात असल्याचा परिणाम म्हणजे, देशात गेल्या पाच वर्षात आपल्या नवीन उत्पादन-सेवेचे बौद्धिक स्वामित्व -पेटंट घेणा-यांच्या संख्येत चैापट वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तसेच व्यवसायाचा ट्रेडमार्क नोंदविणाऱ्यांच्या संख्येमध्ये पाचपट वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षात 20 पेक्षा जास्त भारतीय युनिकॉर्नची स्थापना झाली आहे. तसेच येत्या एक-दोन वर्षात ही संख्या आणखी वाढणार आहे.

आता आपल्याकडे इनक्यूबेशनपासून ते स्टार्टअप्सपर्यंत वित्तीय मदत केली जाते, असे निदर्शनास आणून देत पंतप्रधानांनी देशात स्टार्टअप्ससाठी 10 हजार कोटी रुपयांचा निधी तयार करण्यात आला आहे, हे स्पष्ट केले. या व्यक्तिरिक्त स्टार्टअप्सना पहिल्या तीन वर्षांच्या कालावधीत अनेक प्रकारच्या कर सवलती देण्यात येत आहेत. स्वप्रमाणन आणि सहजपणे बाहेर पडता येण्याची सुविधाही यामध्ये आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, राष्ट्रीय पायाभूत सुविधांच्या निर्माणासाठी एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक देशात करण्यात येणार असून त्याची संपूर्ण योजना तयार झाली आहे. यामुळे संपूर्ण देशात अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. त्यामुळे वर्तमान आणि भविष्यांमध्ये देशांच्या असलेल्या गरजा पूर्ण होवू शकणार आहेत. देश आता नवनवीन मार्गांनी प्रत्येक्ष क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त क्षमतेने काम करण्याचा प्रयत्न करीत आहे.

सर्व विद्यार्थी वर्गाने आपल्या कामाच्या ठिकाणी चार मंत्र जपावेत, असा सल्ला पंतप्रधानांनी यावेळी दिला.

1.   गुणवत्तेकडे लक्ष केंद्रीत करावे, त्यामध्ये कधीच तडजोड करू नये.

2.  प्रमाणता सुनिश्चित करावी. आपल्या नवसंकल्पना प्रत्यक्षात आणून मोठ्या प्रमाणावर काम करावे.

3.   विश्वासार्हतेची हमी देवून बाजारपेठेमध्ये प्रदीर्घकाळापर्यंत स्थान कायम ठेवावे.

4.  अनुकूलनता, नवीन बदलांना स्वीकारण्यासाठी तसेच जीवनामध्ये अस्थिरताही येणार आहे, हे लक्षात घेवून लवचिक धोरणासह मुक्त जीवनशैली ठेवा.

या चार मुलभूत मंत्रांनुसार तुम्ही काम केले तर तुमची कामगिरी चमकदार होईल आणि तुमची एक स्वतंत्र ओळख निर्माण होवून भारताचे ब्रँडबनू शकणार आहे, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. वास्तविक भारताचे विद्यार्थी हे बाहेर देशाचे सर्वात मोठे ब्रॅंड अँबेसेडर आहेत. विद्यार्थ्‍यांनी केलेली कामे देशाच्या उत्पादनाला जागतिक मान्यता देणारे आहे आणि त्याचबरोबर देशाच्या प्रयत्नांना वेग देईल, असेही मोदी म्हणाले.

कोविड-19 महामारीच्या उदे्रकानंतर संपूर्ण जगामध्ये अनेक प्रकारे बदल घडून येत आहेत. आणि यामध्ये तंत्रज्ञान अतिशय महत्वाची भूमिका पार पाडणार आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आभासी वस्तुस्थितीयाविषयी आत्तापर्यंत कधीच विचार केला गेला नव्हता, मात्र आता आभासी वस्तुस्थिती आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती कार्य यांचा अनुभव आपण घेत आहोत. ते म्हणाले, विद्यार्थ्‍यांच्या या तुकडीला शिकणे आणि कामाच्या ठिकाणी नव्याने तयार करण्यात आलेले मापदंड यांच्या अनुकूलतेचा लाभ घेता आला आहे.  त्यामुळे मुलांनी त्याचा अधिकाधिक उपयोग करून घ्यावा, असा आग्रह पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले या कोविड-19 महामारीने आपल्याला सर्वात मोठा धडा दिला, तो म्हणजे जागतिकीकरण महत्वाचे आहे मात्र आत्मनिर्भरताही तितकीच महत्वाची आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशाने अलिकडच्या काळामध्ये दाखवून दिले आहे की, शासनाला सर्वाधिक गरीबांपर्यंत पोहोचायचे असेल आणि मदत करायची असेल तर तंत्रज्ञान हेच सर्वात शक्तीशाली साधन आहे. सरकारच्या अनेक योजना तंत्रज्ञानाच्या मदतीने जास्तीत जास्त गरीबांपर्यंत पोहोचल्या आहेत, हे सांगताना मोदी म्हणाले, शौचालय निर्माण, गॅस जोडणीसारख्या योजना तंत्रज्ञानामुळे सर्वांपर्यंत पोहोचल्या आहेत. डिजिटल सेवेमध्ये देश वेगाने प्रगती करीत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुकर बनत आहे. तंत्रज्ञानामुळे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवणे शक्य झाले आहे आणि भ्रष्टाचार कमी झाला आहे. डिजिटल देव-घेवीच्या व्यवहारामध्येही भारत  जगातल्या अनेक देशांपेक्षा खूप पुढे गेला आहे. इतकेच नाही तर विकसित देशही आता आपल्या यूपीआयसारखे भारतीय डिजिटल मंच स्वीकारू इच्छित आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तंत्रज्ञानाची स्वामित्व योजनेमध्ये मोठी भूमिका आहे. त्याचा अलिकडेच प्रारंभ करण्यात आला. यानुसार प्रथम निवासी आणि जमीन मालमत्तेचे मॅपिंगकेले जात आहे. आधी हे काम प्रत्यक्षपणे मोजणी करून केले जात होते. त्यामुळे अनेकांना यामध्ये काही गडबड केली जात असल्याबद्दल शंका वाटत असे, अर्थात अशा शंका उत्पन्न होणेही स्वाभाविक होते. आता ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून भूमीचा नकाशा तयार केला जात आहे. ग्रामीण भागातले नागरिकही या पद्धतीमुळे समाधानी आहेत. यावरून लक्षात येते की, भारतातले सामान्य नागरिक तंत्रज्ञानावर भरवसा ठेवतात. पंतप्रधान म्हणाले, तंत्रज्ञानामुळे आपत्ती काळानंतर व्यवस्थापन, भूजल स्तर कायम राखणे, दूर-वैद्यकीय सेवा आणि दूर नियंत्रकाच्या मदतीने शस्त्रक्रिया, व्यापक डेटा विश्लेषण यासारख्या प्रश्नांवर उत्तर शोधता येत आहे.

पंतप्रधानांनी विद्यार्थी वर्गामध्ये असलेल्या असामान्य क्षमतांचे कौतुक केले. मुलांनी लहान वयातच अवघड परीक्षांपैकी एक परीक्षा उत्तीर्ण केली आहे, याबद्दल प्रशंसा केली. त्याचबरोबर पंतप्रधानांनी त्यांना आपल्या क्षमता अधिकाधिक वाढविण्यासाठी विचारांमध्ये लवचिकता ठेवावी आणि वागण्यात नम्र असावेअसा सल्ला दिला. पंतप्रधान म्हणाले, विचारांमध्ये लवचिकता कायम ठेवली तर प्रत्येक स्तरावर आपली ओळख कायम टिकवून, एका समूहामध्ये राहून काम करणे अवघड जाणार नाही. त्याचबरोबर विनम्रतेने आपले मत मांडले तर, त्याचा विचार केला जाईल तसेच स्वतःला अहंकारापासून दूर ठेवले तर जमिनीशी जोडले राहणे शक्य होईलअसेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिलेल्या विद्यार्थी वर्गाच्या पालकांना आणि मार्गदर्शकांना तसेच प्राध्यापकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आयआयटी दिल्लीच्या हीरक जयंती समारंभालाही शुभेच्छा दिल्या. या दशकामध्ये संस्थेने निश्चित केलेले लक्ष्य प्राप्त करण्यासाठी यश मिळावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.

***

S.Thakur/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1671012) Visitor Counter : 245