पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

एलएनजी’ चे इंधन म्हणून असणारे फायदे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवणे आवश्यक –धर्मेंद्र प्रधान

Posted On: 06 NOV 2020 5:59PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 नोव्‍हेंबर 2020

 

एलएनजी म्हणजे-द्रवरूप नैसर्गिक वायू इंधनाचे लाभ ग्राहक आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, एक जनजागृती मोहीम राबवायला हवी, अशी सूचना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली. या क्षेत्राशी संबंधित विविध हितसंबंधी गटांसमोर आयोजित ‘एलएनजी-वाहतुकीचे इंधन’ या विषयावरील वेबिनारमध्ये ते आज बोलत होते. एलएनजी हे भविष्यातील इंधन आहे. ते तुलनेने स्वस्त असून त्याचे इतर फायदेही लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हे स्वस्त इंधन असल्यामुळे अनेक ग्राहक त्याकडे आकर्षित होऊ शकतात, आणि जर त्याचा योग्यप्रकारे प्रसार आणि प्रचार केला, तर त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, असे प्रधान म्हणाले.

देशात एलएनजी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्याच्या वाढीसाठी सरकार सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत आहे, अशी माहिती प्रधान यांनी दिली. एलएनजीचा वापर वाढवण्यासाठी मिळालेल्या प्रत्येक संधीचा उपयोग करायला हवा, असा सल्ला त्यांनी दिला. एलएनजीशी निगडीत पर्यावरणीय लाभांश, आर्थिक लाभांश आणि वापराची सुविधा या बाबींवर भर देऊन त्या ग्राहकांपर्यंत पोचवायला हव्यात, असेही ते म्हणाले.

देशाला वायू आधारित अर्थव्यवस्था म्हणून विकसित करण्यावर सरकारचा भर असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा, जसे गॅस पाईपलाईन, टर्मिनल, स्टेशन्स इत्यादींवर प्रचंड खर्च केला जात आहे. एलएनजी ला प्रोत्साहन हा ही त्याच धोरणाचा भाग आहे, असे ते म्हणाले. भारताला वायू आधारित अर्थव्यवस्था बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, दूरदृष्टीनुसार आम्ही या विषयाकडे लक्ष केंद्रित केले आहे, असे प्रधान यांनी सांगितले.

इंधनावरील अनुदान आधारित मॉडेलच्या पारंपरिक पद्धतीतून बाहेर पडत, एलएनजीच्या व्यावसायिक उपयुक्ततेवर भर द्यावा, असा सल्ला त्यांनी या क्षेत्रातील उद्योजकांना दिला. एलएनजीला जीएसटीच्या कक्षेत आणले जावे ही महत्वाची आणि वाजवी मागणी आहे, असे सांगत यावर लवकरच सर्वसहमतीने निर्णय होईल, अशी माहिती प्रधान यांनी दिली.


* * *

S.Thakur/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1670708) Visitor Counter : 131