जलशक्ती मंत्रालय

‘स्मार्ट पाणीपुरवठा आणि देखरेख व्यवस्था’विकसित करण्यासाठी भव्य स्पर्धा –आवेदनपत्रांची छाननी सुरु


सध्याच्या समस्यांचे निवारण आणि भविष्यातील प्रश्न हाताळण्यासाठी पाणीपुरवठा पायाभूत सुविधांचे डिजिटलीकरण करणार

Posted On: 05 NOV 2020 11:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 नोव्‍हेंबर 2020

 

देशातील ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरामध्ये वर्ष 2024 पर्यंत नळाने पाणीपुरवठा करण्याचे  जलजीवन अभियानाचे उद्दिष्ट आहे. यात विशेषतः उत्तम सेवा देण्यावर भर असून, पुरेशा प्रमाणात आणि दीर्घकाळ पाणीपुरवठा करण्यासाठीच्या पायाभूत व्यवस्था तयार केल्या जात आहेत. यामुळेच, या योजनेसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणे आवश्यक ठरले आहे, ज्याद्वारे सेवावितरणाची  आकडेवारी आपोआप संकलित होऊ शकेल. या सुविधेत येणाऱ्या अडचणींचा मागोवा घेणे आणि त्यावर उपाययोजना यांसाठी पाणीपुरवठा योजनेचे  डिजिटलीकरण करणे आवश्यक आहे. त्याद्वारे भविष्यातील प्रश्न हाताळणेही सोपे जाईल.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001XFUS.jpg

जलव्यवस्थापनात तंत्रज्ञानाच्या शक्तीचा वापर करणे ही काळाची गरज असून त्यासाठी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जल शक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जलजीवन अभियानाशी भागीदारी करत, “स्मार्ट पाणीपुरवठा उपाययोजना आणि देखरेख व्यवस्था’ विकसित करण्यासाठी आयसीटी भव्य स्पर्धेची घोषणा केली आहे. जल जीवन अभियान या भव्य स्पर्धेतल्या व्यवस्थेचा वापरकर्ता असेल आणि बंगरूळूची C-DAC संस्था ही अंमलबजावणी यंत्रणा म्हणून स्पर्धेसाठी सर्व तांत्रिक सहकार्य करेल. या स्पर्धेसाठी आलेल्या अर्जांची छाननी करण्यासाठी देखील C-DAC सहकार्य करेल. त्याशिवाय सहभागी स्पर्धकांना मार्गदर्शन आणि तांत्रिक मदतही केली आहे.

या स्पर्धेसाठी देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 218 आवेदने आली आहेत. विविध क्षेत्रे, कंपन्या यांच्याकडून हे अर्ज आले आहेत. यापैकी 46 अर्ज वैयक्तिक उद्योजकांचे आहेत, 33 कंपन्या,76 तंत्रज्ञान स्टार्ट अप, 15 एलएलपी कंपन्या आणि 43 अर्ज एमएसएमई कंपन्यांकडून आलेले आहेत.  

सध्या सर्व अर्जांची पडताळणी आणि छाननी सुरु आहे. यातून निवड झालेल्या कंपन्या/उद्योजकांना ज्युरी सदस्यांसमोर सादरीकरण करण्यास सांगितले जाईल, त्यातून पुढच्या फेरीसाठी उत्कृष्ट दहा जणांची निवड केली जाईल.  

यात फोटोटाईप पातळी, फोटोटाईप ते उत्पादन पातळी, उत्पादन ते त्याची स्थापना अशा विविध पातळ्यांवर स्पर्धा घेतली जाईल आणि त्यातून तीन अंतिम विजेत्यांची घोषणा केली जाईल.या स्पर्धेसाठी MeitY आणि जल जीवन अभियानाने निधी दिला आहे.अंतिम विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कंपनीला 50 लाख रुपये, तर इतर दोन विजेत्यांना प्रत्येकी 20 लाख रुपये पुरस्कार दिला जाईल.

या भव्य स्पर्धेतून भारतात स्मार्ट ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्था विकसित करण्यासाठी एक उत्तम दर्जाची, आधुनिक माहिती तंत्रज्ञान व्यवस्था विकसित होऊ शकेल. नव उद्योजक आणि स्टार्ट अप कंपन्यांना संधी मिळेल. या स्पर्धेमुळे जल जीवन अभियानासाठी काम करण्याची संधी देखील स्पर्धकांना मिळू शकेल.


* * *

U.Ujgare/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1670599) Visitor Counter : 147