विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि संजय धोत्रे यांच्या हस्ते विज्ञान व तंत्रज्ञान (DST)विभागाचा सुवर्णमहोत्सव दर्शवणाऱ्या टपालखात्याचे विशेष कव्हर प्रकाशित
भारताच्या विकासात आपल्या शास्त्रज्ञांचा सिंहाचा वाटा: संजय धोत्रे
Posted On:
02 NOV 2020 6:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2020
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विज्ञान व तंत्रज्ञान विभाग तसेच आरोग्य व कुटुंबकल्याण आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि टपाल, शिक्षण आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आज नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात विज्ञान व तंत्रज्ञान (DST) विभागाचा सुवर्णमहोत्सव दर्शवणारे टपालखात्याचे विशेष कव्हर प्रकाशित केले.
या प्रसंगी बोलताना डॉ. हर्षवर्धन यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अभिनंदन केले. “कृत्रिम बुद्धीमत्ता असो वा नॅनो तंत्रज्ञान, डेटा अँनालिटीक्स, अंतराळ-भौतिकी, अंतराळविज्ञान, अण्विक घड्याळ अशा विज्ञानाच्या सर्व शाखांमध्ये आपल्या संशोधकांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेची चुणूक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सिद्ध केली आहे” , असे ते यावेळी म्हणाले. आज भारत हा विविध विज्ञान क्षेत्रात 80 देशांशी सहयोगाने काम करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दूरस्थ आणि दुर्गम भागातील रहिवाश्यांपर्यंत वेळेवर आणि अधिक कार्यक्षमतेने सेवा पोहोचवण्यासाठी टपालखात्याला विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने सहकार्य करावे अशी सूचनाही केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी केली.
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे कौतुक करुन संजय धोत्रे म्हणाले, ”विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे हे खास यश साजरे करण्यासाठी विशेष कव्हर प्रदर्शित करताना टपाल खात्याला अभिमान वाटत आहे.”
“भारताच्या विकासात आपल्या शास्त्रज्ञांचाचा सिंहाचा वाटा आहे असे संजय धोत्रे यांनी सांगितले. “देशभर सर्वदूर पोहोचणाऱ्या टपालखात्याच्या माध्यमातून हे विशेष कव्हर सर्वांनाच शास्त्रन्यांनी देशाच्या विकासासाठी तसेच गरीबांच्या कल्याणासाठी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीची जाणीव करून देईल. भारत सरकारची सर्वाधिक विश्वासार्ह संस्था म्हणून टपाल खात्याची ओळख आहे. हे खाते कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीही सर्व लोकांना जोडण्याचे काम करत असते”, असे नमूद करून सेवांचे आदानप्रदान जलदगतीने होण्यासाठी टपालखात्याला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाला केले.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग 3 मे 2020 ते 3 मे 2021 या कालावधीत आपला सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन साजरा करत आहे. हे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी विभागाने अनेक कार्यक्रमांची आखणी केली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवनवीन क्षेत्रांना प्रोत्साहन देँण्यासाठी तसेच या क्षेत्रांमधील उपक्रमांना व्यवस्थापन, सहकार्य व प्रोत्साहन पुरवण्यासाठीचा केंद्रीय विभाग म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची मे 1971 मध्ये सुरूवात झाली.
S.Tupe/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1669536)
Visitor Counter : 661