आदिवासी विकास मंत्रालय
ट्राइब्स इंडियाच्या माध्यमातून आदिवासींच्या नव्या ताज्या 100 सेंद्रिय उत्पादनांची श्रेणी बाजारात
Posted On:
26 OCT 2020 5:28PM by PIB Mumbai
आदिवासी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या ‘ट्रायफेड’ने ट्राइब्स इंडियाच्या माध्यमातून आदिवासींच्या नव्या ताज्या 100 सेंद्रिय उत्पादनांची श्रेणी बाजरात आणली आहे. या ’फॉरेस्ट फ्रेश नॅचरल्स अँड ऑरगॅनिक’उत्पादनांचे अनावरण ट्रायफेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रविर कृष्णा यांनी आभासी पद्धतीने केले. दर आठवड्याला नवीन 100 उत्पादने बाजारात आणण्याची तयारी ट्रायफेडने केली आहे. त्यामुळे आता ट्राइब्स इंडियाच्या कॅटलॉगमध्ये या सर्व नवीन उत्पादनांचा समावेश करण्यात येईल. यापैकी पहिल्या 100 उत्पादनांची श्रेणी आज बाजारात आणण्यात आली आहे. ही उत्पादने ट्राइब्स इंडियांच्या देशभरातील 125 शोरूममध्ये उपलब्ध असतील त्याचबरोबर त्यांची ऑनलाइन खरेदीही ग्राहकांना करता येणार आहे. तसेच ट्राइब्स इंडियाच्या फिरत्या वॅनमध्येही सर्व उत्पादने उपलब्ध असणार आहेत. ट्राइब्स इंडिया डॉट कॉमवर ई-मार्केटप्लेसवर आणि ई-टेलर्सच्या माध्यमातूनही खरेदी करणे शक्य आहे. यामुळे आदिवासी कारागीर, वनवासी यांच्यासाठी उत्पन्नाचे साधन असलेली ही उत्पादने असंख्य लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे. आदिवासी समाजाच्या शाश्वत विकासासाठी त्यांनी तयार केलेली सेंद्रिय उत्पादने, वनोपज आणि कलाकृती यांची विक्री करण्याचे काम केले जात आहे.
याप्रसंगी बोलताना प्रवीर कृष्णा म्हणाले, ‘‘विविध माध्यमांव्दारे सेंद्रिय उत्पादनांचा वापर केला गेला तर सध्या सर्वांना ज्याची आवश्यकता आहे, अशा प्रतिकार शक्तीमध्ये नैसर्गिक पद्धतीने वाढ करणे शक्य होणार आहे. पौष्टिक आहार आणि शाश्वत जीवनशैलीचा स्वीकारणे आज गरजेचे आहे. त्याचबरोबर देशातल्या आदिवासी कारागीर आणि वनवासी बांधवांना प्रोत्साहन मिळू शकणार आहे. त्यांच्या उत्पादनांचा खप झाला तर त्यांना आर्थिक बळकटी देणारे ठरणार आहे. या वस्तूंच्या विक्रीमुळे त्याचा लाभ थेट आदिवासींना मिळू शकणार आहे.’’
आज बाजारामध्ये दाखल झालेल्या ट्राइब्स इंडियाच्या नवीन 100 सेंद्रिय उत्पादनांमध्ये देशभरातील वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये मध्य प्रदेशातल्या गोंड, भिल या आदिवासी समाजामध्ये बनविण्यात येणा-या रोग प्रतिकारशक्ती वाढविणारे चूर्ण आणि काढा आहे. मध्य प्रदेशातल्या झाबुआ जिल्ह्यातल्या शिवगंगा इथल्या भिलला जमातीने बनविलेल्या महुआ बांबू मेणबत्या, सेंद्रिय, रोग प्रतिकारशक्ती वाढविणारी पावडर, गिलोय पावडर, जामून पावडर, महाराष्ट्र आणि गुजरात येथील डाळी आणि खिचडी मिक्स यांचा समावेश आहे.
‘गो वोकल फॉर लोकल’ या मंत्रामध्येच सध्याच्या अवघड काळामध्ये ‘गो वोकल फॉर लोकल गो ट्रायबल’ असा बदल करून तो ट्रायफेडने स्वीकारला आहे. त्यामुळे आदिवासी समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. नव्याने तयार करण्यात आलेली उत्पादने ही अनेक गोष्टींवर रामबाण औषधे म्हणून काम करणारी आहेत. तसेच लोकांना त्यांच्यात प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा दिसून येणार आहे, असे प्रवीर कृष्णा यांनी यावेळी सांगितले.
*****
M.Iyengar/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1667607)
Visitor Counter : 212